नृत्यनिपुणा ‘सोनिया’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2022   
Total Views |

Parchure
 
 
 
बालवयातच एखादं गाणं कानावर पडलं की, तिचे पाय थिरकायचे, गोल गिरक्या घेत ती नाचायची. पुढे वयाच्या सहाव्या वर्षी माघी गणेशोत्सवात नृत्यगुरू पूनम मुर्डेश्वर यांच्या कार्यक्रमांनी तिला भुरळ घातली अन् बघता बघता संगीतक्षेत्राला एक अभिनयकुशल नृत्यनिपुणा ‘सोनिया’ लाभली. त्या सुप्रसिद्ध सोनिया परचुरे यांच्या रोमांचकारी नृत्यवारीची ही चित्तरकथा...
 
भारतीय कलाक्षेत्रातील एक मराठी नर्तकी, नृत्यशिक्षक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यअभिनेत्री असलेल्या सोनिया परचुरे यांचा जन्म ठाण्यातील ब्राह्मण सोसायटीत दि. २० डिसेंबर, १९७३ साली झाला. एक भाऊ आणि एक बहीण असलेल्या सोनिया यांचे वडील गुरुनाथ भार्गव मुळे हे पेशाने भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यामुळे घरात पूर्णतः शैक्षणिक वातावरण असल्याने शालेय शिक्षणानंतर त्यांनी रुईया महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली. शिक्षण सोडले, तर इतर कोणत्याही कला क्षेत्राशी घरातील कुणाचाच तसा फारसा संबंध नव्हता.
 
 
 
ब्राह्मण सोसायटीत तेव्हा भरतनाट्यम नृत्याचे वर्ग चालायचे. नौपाडा माघी गणेशोत्सवानिमित्त नृत्यप्रभू पूनम मुर्डेश्वर यांचा एक नृत्याचा कार्यक्रम होता. त्यांच्या त्या कार्यक्रमाने प्रेरित होऊन सोनिया यांनी मनाशी पक्की खुणगाठ बांधली की, आपणही नृत्यकला शिकायला हवी. मुळात बालपणी कुठेही एखादं गाणं लागलं अथवा संगीताचे सूर कानावर पडले की, आपसुकच सोनियांचे पाय थिरकायचे... त्या स्वतःभोवती गोल गोल गिरक्या घेऊ लागत. नाही म्हणायला त्यांचा सख्खा आत्तेभाऊ सितार वाजवायचा. त्यानेच त्यांच्या कुटुंबीयांकडे आग्रह धरून शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी एका नृत्यशाळेत पाठवले आणि इथूनच सोनियांचे नृत्याचे शिक्षण सुरू झाले.
 
 
अनादी काळापासून भारताला नृत्याची महान परंपरा लाभली असली, तरी कुटुंबात नृत्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बालपणीपासूनच सोनियांनी नृत्याचे धडे गिरवले. भरतनाट्यमपासून श्रीगणेशा करून सगळेच नृत्य प्रकार आजमावून झाल्यावर ‘कथ्थक’ या नृत्यप्रकाराने त्यांच्या मनावर गारुड केले. त्यामुळे इयत्ता नववीपासून सोनिया यांचा खर्‍या अर्थाने कथ्थकचा प्रवास सुरु झाला. पहिल्या गुरु पूनमताईंनी दिशा दाखवल्यानंतर गुरु डॉ. मंजिरी देव यांच्याकडे १५ वर्षे त्यांनी कथ्थकचे शिक्षण घेतले.
 
 
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या ‘नृत्यविशारद’ आणि ‘नृत्यालंकार’ या दोनही परीक्षांमध्ये त्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध तबलावादक तालयोगी पं. पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्याकडून ’लयकारी’चे प्रशिक्षण घेत असून आजही ते सुरू आहे. भारतीय नृत्यशैली विशेषतः ‘कथ्थक’ या नृत्यप्रकारात त्या वाक्बगार आहेत. डॉ. सीतारादेवी यांच्या नृत्याने त्या कायमच प्रभावित होत असल्याचे सांगतात.
 
 
महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना रुईयाच्या ‘युथ फेस्टिव्हल’चे आकर्षण वाटू लागले. तिथे सहसा वरिष्ठांनाच संधी मिळायची. त्यामुळे अकरावीत असताना ’नाट्यवलय’मध्ये ‘ऑडिशन’साठी सोनिया यांना बोलावले गेले. १९९१ साली बारावीला गेल्यावर ‘आयएनटी’साठी जे नाटक बसवले जाते, त्या नाटकात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी त्यांना लाभली. चंद्रकांत कुलकर्णी त्या नाटकाचे दिग्दर्शक होते. त्या वर्षी एकांकिकेत ‘लीड रोल’ त्यांनी केला. त्यावर्षीच्या सर्व स्पर्धांमध्ये सोनिया यांचा चमू अव्वल ठरून ‘सर्वोत्कृष्ट नाटक’, ‘सर्वोत्कृष्ट कलाकार’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ आदी विविध सन्मान पटकावले. त्यावेळी ‘चतुरंग’च्या ‘सवाई एकांकिका’ स्पर्धेतही भाग घेऊन सोनिया ‘सवाई अभिनेत्री’ ठरल्या. अभिनय क्षेत्रातला हा त्यांचा पहिला ‘ब्रेक.’ या नाट्यअभिनयाचे श्रेय अलबत गुरुवर्य चंद्रकांत कुलकर्णी यांनाच सोनिया देतात.
 
 
मधल्या काळात ‘आयएनटी’ला विनय आपटे परीक्षक असताना ’सवाल अंधाराचा’ हे पहिले व्यावसायिक नाटक सोनिया यांना मिळाले. अक्षरश: द्विधा मन:स्थितीत हे नाटक त्यांने स्वीकारले. त्याकाळी ठाण्यातून असे कुणी नाटकात वगैरे अभिनय क्षेत्रात जाण्याचा प्रघात विशेष रुळलेला नव्हता. व्यावसायिक नाटकात काम करणारी मंडळी हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढीच होती. तरीही धैर्याने सोनियांनी हेही आव्हान पेलले.
 
 
‘झी गौरव पुरस्कारा’सह अनेक पुरस्कारांना गवसणी घालणार्‍या सोनिया यांना भविष्यात खूप काही करायचे राहून गेल्याचे त्या सांगतात. “खूप ‘रियाझ’ करायचाय, चांगली चांगली ‘प्रॉडक्शन्स’ काढायची, नवीन पिढीमध्ये शास्त्रीय नृत्य उत्तम प्रकारे रुजेल, असे काम करायचे. सध्याची नवी पिढी खूप हुशार आहे. ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल’ अशा वृत्तीने पदोपदी या पिढीला पुरावे हवे असतात. त्यामुळे या पिढीकडून फार आशावादी चित्र वाटते. त्यामुळे या तरुण पिढीसोबत राहायला, तसेच कामही करायला आवडते,” असे सोनिया सांगतात.
 
 
सोनिया परचुरे यांनी ‘शरयू नृत्य कलामंदिर’ या नावाची नृत्यकलेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली आहे. शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देणारे हे नामवंत ठिकाण असून तेथे कथ्थकमधील एकूण एक बारकावे शिकवले जातात. सध्या त्यांच्याकडे अगदी पाच वर्षीय बालकांपासून ते थोरामोठ्यापर्यंत असे तब्बल २०० विद्यार्थी नृत्याचे धडे घेत आहेत. मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते अतुल परचुरे यांच्या पत्नी असलेल्या सोनिया परचुरे यानी ‘नाट्य अभिनेत्री’ म्हणून ’सवाल अंधाराचा’, ’प्रेमाच्या गावा जावे’, ’गेला माधव कुणीकडे’, ‘तुझं आहे तुजपाशी’ आदी नाटकांत भूमिका साकारल्या आहेत.
 
 
 
’आक्का’ नावाच्या चित्रपटांतले सोनिया परचुरे यांचा अभिनय समीक्षकांनी आणि प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. ’ही पोरगी कुणाची’ या मराठी चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे यांचेच. ’कृष्ण’ या नावाची श्रीकृष्णाचा जीवनपट दाखविणारी आणि रंगमंचावर सादर होत असलेली दोन तास कालावधीची एक नृत्यनाटिका तसेच गीतरामायण, संत ज्ञानेश्वर आदी कलाकृती सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. ‘खजुराहो डान्स फेस्टिव्हल-२०२२’ मध्येही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. कोरिओग्राफी करताना वेगळे कसब आणि आगळ्या शैलीचा वापर त्या करतात.
 
 
नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चमूसाठी मार्गदर्शन करण्यासोबतच येरवडा तसेच नाशिक कारागृहातील कैद्यांसाठी सोनिया यांनी आपल्यातील कलाकारी तसेच नृत्यातील अदाकारीचे प्रशिक्षण मोफत दिले आहे. कारागृहाच्या गजाआड शिक्षा भोगत असलेल्या पुरुष व महिला कैद्यांसाठीही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. आनंदवनात जाऊन कार्यक्रमदेखील सादर केले. मुंबईतील मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोफत नृत्यशिकवणी दिली असून कमलाबाई मेहता अंधशाळेतील विद्यार्थ्यांना नृत्यदिग्दर्शन केले आहे. याशिवाय ‘सेव्ह वॉटर’ आदींसारख्या मोहिमांमध्ये ‘बॅले’ नृत्याद्वारे सक्रिय सहभाग नोंदवला असून या उपक्रमाचे प्रयोग भारतभर करण्याचा मानस बाळगणार्‍या कर्तृत्ववान सोनियाला भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!









@@AUTHORINFO_V1@@