‘देवदूत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2022   
Total Views |
 
 
gite
 
 
एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अथवा मदतीसाठी धावणार्‍या व्यक्तीला ‘देवदूत’ संबोधले जाते. या धर्तीवर ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानणारे ठाण्यातील वर्तकनगर येथील ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’चे सर्वेसर्वा डॉ. अमोल गीते हे लाखो रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. किंबहुना, वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाची गुढी उत्तरोत्तर उंचावत आहे. अशा या ‘अमोल’ व्यक्तीमत्त्वाची ही कीर्तीगाथा...
 
 
राठवाड्यासारख्या दुष्काळी भागात जन्मलेले डॉ. अमोल गीते यांचे बालपण तसे हलाखीतच गेले. वडील त्या काळातील पदवीधर असल्याने घरातील वातावरण तसे शैक्षणिक होते. त्यामुळे शालेय जीवनापासून अमोल यांची बुद्धिमत्ता कुशाग्र. लातूरमधील एका गावात त्यांचे शालेय शिक्षण झाले. वडिलांना वाटे त्यांनी प्रशासकीय सेवेत जावे. पण, लहानपणापासूनच त्यांना वैद्यकीय क्षेत्राबद्दल खूप आकर्षण होते. बारावीच्या परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाल्याने गुणवत्तेच्या जोरावर मुंबईतील प्रतिष्ठीत ‘केईएम’ रुग्णालय व ‘जी.एस.मेडिकल कॉलेज’मध्ये वैद्यकीय शिक्षणाची दारे खुली झाली. फार क्वचितच विद्यार्थ्यार्ंना ‘केईएम’ आणि ‘जी. एस. मेडिकल कॉलेज’मध्ये प्रवेश मिळतो. मिळालेल्या या संधीचे सोने करीत डॉ. अमोल गीते यांनी कुटुंबातील पहिले डॉक्टर होण्याचा मान मिळवला.
 
 
वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक सेवा करण्याची संधी सर्वाधिक असल्याने त्यांनी या क्षेत्रातच पाय रोवण्याचे निश्चित केले. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका नातलगाच्या मदतीने ठाण्यातील सावरकरनगरमध्ये छोटेखानी प्रसुती रुग्णालय सुरू केले. रुग्णसेवेचा वसा घेत उत्तम जनसंपर्क ठेवत आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी केल्यामुळे अल्पावधीतच नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. विशेष म्हणजे, रुग्ण दाखल करताना ‘डिपॉझिट’ घेतले जात नसल्याने व बिलासाठीदेखील कोणतीही अडवणूक होत नसल्याने रुग्णालयामध्ये रुग्णांचा ओघ वाढू लागला. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही जागादेखील कमी पडू लागल्याने रुग्णालयाचा विस्तार करून वर्तकनगरात सर्व सोईसुविधांनी सुसज्ज असे ६० बेडचे ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’ सुरू केले.
 
 
येथे एकाच छताखाली डायलिसिस, अतिदक्षता विभाग, सोनोग्राफी, टु डी ईको, ब्रेन अ‍ॅण्ड स्पाइन विभाग, जॉइंट रिप्लेसमेंट विभाग आणि इतरही सर्व शस्त्रक्रिया तसेच ओपीडी आदी सुविधा उपलब्ध केल्या. मेंदू, किडनीचे आजार आणि प्लास्टिक सर्जरी, अशा सुपर स्पेशालिटी सुविधादेखील इथे उपलब्ध केल्या. गरीब गरजू महिलांसाठी ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’ म्हणजे प्रसूतीसाठीचे दर्जेदार स्थान समजले जाते. त्याचप्रमाणे सर्व ‘मेडिक्लेम कॅशलेस सुविधा’, ‘कामगार कल्याण योजना’, ‘पोलीस कुटुंब कल्याण योजना’, केंद्र सरकारच्या आरोग्य योजना आदींच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास वाढला आणि ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’ची कीर्ती सर्वदूर पसरली. त्यामुळे आजघडीला ठाणे, पालघरसह रायगड ते पुणे जिल्ह्यातूनही रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. इथे रुग्ण बरा झाल्यानंतरही घरी जायचे नाव घेत नाही. अर्थात याचे सारे श्रेय डॉ. अमोल आपल्या स्टाफला देतात. येत्या काही दिवसांत अद्ययावत कार्डियाक सेंटर व कॅथलॅब उभारणी हे ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’चे ध्येय असून लवकरच हा विभाग नव्या जागेत कार्यन्वित होत असल्याचे ते सांगतात.
 
 
कोरोना विरूद्धच्या लढ्यामध्ये ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’ ‘कोविड’ बाधितांसाठी वरदान ठरले. प्रसिद्धीपासून दूर राहत ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’ने कोरोनाकाळात अद्वितीय कामगिरी बजावली. कोरोना महामारीने ठाण्यामध्ये थैमान घातले असताना नागरिकांची बेडसाठी धावपळ सुरू होती. अशा कठीण प्रसंगी ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’ने योद्ध्याप्रमाणे लढा दिला. डॉ. अमोल आणि त्यांच्या १५० जणांच्या टिमने अहोरात्र जागून असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार केले. खूप चांगल्या सोईसुविधा पुरवल्या. वेळेवर उपचार, सकस आहार, संवेदनशील नर्सिंग सेवा देण्याबरोबरच दुर्मीळ बनलेले रेमेडेसेवीर इंजेक्शन असो अथवा बेड उपलब्ध करणे असो, डॉ. अमोल गीते यांनी अत्यंत तत्परतेने जातीने लक्ष घालून रुग्णांना सेवा पुरवली.
 
 
अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये रुग्णालयात दाखल झालेले रुग्णसुद्धा त्यांनी बरे केले, रुग्णालयात काय उपचार होतात, हे रुग्णांच्या नातेवाईकांना समजावे, यासाठी व्हिडिओ कॉलची सुविधा पुरवत रुग्ण व नातेवाईकांमध्ये सुसंवाद साधण्याची तजवीज प्रथमतः त्यांनीच केली. तसेच, भरमसाट बिलांबाबत सर्वत्र बोभाटा सरू असताना ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’बद्दल मात्र एकही तक्रार आली नव्हती. त्यामुळे उपचार घेणारे असंख्य रुग्ण हेच त्यांचे खरे ब्रॅ्रण्ड अ‍ॅम्बेसेडर बनले. ठाणे शहरातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, आमदार, खासदार आदींचे फोन व पत्रांची दखल घेत सर्वांना बेड उपलब्ध करून देण्यास प्राध्यान्य दिले. रुग्णाला घरी सोडताना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाल्याचे ते सांगतात.
 
 
गोरगरीब जनतेला माफक दरामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने रुग्णालय ‘एनएबीएच’ (छअइक) अधिस्विकृत झाले. ठाणे महापालिकेनेही स्वच्छतेचे प्रमाणपत्र देऊन रुग्णालयाला गौरवले. महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते तसेच माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डॉ. अमोल यांना सन्मानित करण्यात आले. ‘मराठवाडा जनपरिषदे’च्यावतीने २०२१च्या ’मराठवाडा रत्न’ पुरस्काराचेही ते मानकरी ठरले. याशिवाय अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच नगरसेवकांनी गौरवण्यात आलेल्या डॉ. अमोल यांना ठाणे महापालिकेने नुकतेच ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
 
 
सामाजिक बांधिलकी जपत शेकडो आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, गोरगरिबांसाठी मोफत उपचार व डायलेसिस, शेकडो रुग्णांवर मोफत कॅन्सर व शस्त्रक्रिया आणि किडनीच्या आजारावर उपचार केले. वागळे इस्टेट परिसरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये रुग्णसंख्या वाढल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ‘मास स्क्रिनिंग’ कार्यक्रम राबवण्यामध्ये हिरीरीने सहभाग घेतला.
 
 
मराठवाड्यातील स्थलांतरीतांच्या छावण्या ठाण्यात आल्या असता डॉ. अमोल गीते यांच्या ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’नेच त्यांच्या औषधोपचाराचा खर्च उचलला होता. ‘कोविड’ लसीकरणात ठाणे मनपा व विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’ अग्रेसर होते. प्रारंभापासून ते आता बालकांच्या लसीकरणात शहराच्या प्रभागाप्रभागात लस मोहीम राबवली, असे विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम त्यांच्या रुग्णालयामार्फत वेळोवेळी राबवण्यात आले. याची दखल मुख्यमंत्री, महापौर व इतरही विविध मान्यवरांनी घेऊन प्रशस्तिपत्रके देत गौरवल्याचे ते सांगतात.
 
 
नवीन पिढीला संदेश देताना डॉ. अमोल गीते यांनी, सामाजिक बांधिलकीचा विसर पडू देऊ नका. त्याचबरोबर ’क्वालिटी केअर अ‍ॅट अफॉर्डेबल कॉस्ट’ हा नियम कसोशीने पाळल्यास समाज आपली दखल घेईलच, असा आत्मविश्वासपूर्ण संदेश देतात, अशा या तरुण, संवेदनशील, हरहुन्नरी, निष्णात समाजसेवी देवदूताला आणि त्यांच्या ‘सिद्धिविनायक हॉस्पिटल’ला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
"रुग्णालय चालवताना २४ तास उपलब्ध असले पाहिजे. दांडगा जनसंपर्क आणि उत्तम प्रकारे संवाद कौशल्य ठेवून उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा. वैद्यकीय क्षेत्र असो वा अन्य कोणत्याही क्षेत्रात ‘शॉर्टकट’ नसावा. मेहनतीच्या पायर्‍या चढूनच यशाला गवसणी घालावी. त्याचबरोबर जबाबदारीचे भान ठेवून रुग्णांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला की, यश तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही." - अमोल गीते  

@@AUTHORINFO_V1@@