नवजात शिशुंचा आयुष्यदाता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2022   
Total Views |

MTB
नवजात बाळाला जन्मत:च काही वैद्यकीय समस्या निर्माण झाल्यास तर घरातील आनंदाच्या वातावरणावर अचानक विरजण पडते. भारताच्या या उमलणार्‍या भविष्याच्या उद्भवणार्‍या आरोग्य समस्यांचे निराकरण करता यावे, यासाठी परदेशातील अनेकोत्तम संधी सोडून भारतीयांसाठी वैद्यकीय सेवा करणार्‍या नाशिक येथील ‘निओकेअर हॉस्पिटल’चे डॉ. संजय म्हसूजी आहेर यांच्या कार्याविषयी...

घरात नवीन सदस्य येण्याची चाहूल लागताच घर आनंदाने मोहरून जाते. घरातील प्रत्येक सदस्य हा त्या गर्भवतीची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडत नसतो. लहानगे मुल घरात येणार म्हणून सर्वच जण अनेकविध प्रकारे आपले स्वप्न सजवत असतात. मात्र, नवजात बाळास आरोग्यसमस्या निर्माण झाल्यास सर्वच चिंताग्रस्त होतात. अशावेळी या नवजात बालकास नवआयुष्य प्रदान करणार्‍या डॉ. संजय आहेर यांचे कार्य मोलाचे ठरते.

जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी हे डॉ. संजय आहेर यांचे गाव. इयत्ता दहावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण मराठी माध्यमात झाले. वनखात्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेले वडील, शेतमजूर असणारी आई आणि चार भाऊ, एक बहीण असा त्यांचा परिवार. आपल्या आत्तेबहिणीसारखे डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांनी इयत्ता सातवीतच उराशी बाळगले. डॉ. आहेर हे दहावीला सायखेडा केंद्रात प्रथम, तर बारावीला केंद्रात दुसरे आले. त्यानंतर त्यांनी ‘एमबीबीएस’च्या शिक्षणासाठी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाची वाट निवडली. एम.डी. (बालरोगतज्ज्ञ) पर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच केले. त्यानंतर केईएम वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी ‘डीएम’ पर्यंतचे शिक्षण घेतले.

‘डीएम’ करत असताना त्यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केला. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया येथील ‘मेलबर्न युनिव्हर्सिटी’चे द्वार खुले झाले. येथेच त्यांना ‘फेलोशिप’ देखील प्राप्त झाली. तिथे असताना डॉ. आहेर यांनी कॅनडामध्ये जाऊन ‘युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो’चीदेखील ‘फेलोशिप’ मिळाली. येथे ते १५ देशातील १५ उमेदवारांत पहिले आले व त्यांना ‘बेस्ट आऊटगोईंग स्टुडंट’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर त्यांनी काही काळ ऑस्ट्रेलिया व लंडन येथे काम केले. मात्र त्यांना मातृभूमी सतत खुणावत होती.


भारतात विदेशात असलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा या उपलब्ध व्हायला हव्यात, तेथील तंत्रज्ञान भारतात आणणे आवश्यक आहे, असे विचार डॉ. आहेर यांच्यात मनात येतच होते. नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रातील अनेक बालकांना उपचारांसाठी मुंबई, पुणे येथे हलवावे लागत असल्याची जाणीव नाशिककर म्हणून डॉ. आहेर यांना होतीच. त्यातच नाशिक येथील एका लहान मुलांच्या रुग्णालयात कार्य करताना हे त्यांना प्रकर्षाने जाणवले.

२०१० मध्ये डॉ. आहेर यांनी ‘निओकेअर’ हे स्वत:चे हॉस्पिटल स्थापन केले. त्यावेळी नाशिकपासून जवळ असलेले पिंपळगाव येथून अत्यवस्थ लहान बाळाला नाशिक येथे आणताना ती बाळं रस्त्यातच दगावण्याच्या घटना कायम घडत. त्याचवेळी परदेशात आजारी बाळास ‘एअर अम्ब्युलन्स’द्वारे वैद्यकीय उपचारार्थ तातडीने हलविले जात होते.
हवाई मार्गे जरी शक्य नसले तरी रस्ते मार्ग आपण बाळांचे प्राण वाचवू शकतो, या धारणेतून डॉ. आहेर यांनी ‘एनआयसीयू ओन व्हील’ ही संकल्पना उत्तर महाराष्ट्रमध्ये राबविली. परवडेल अशा दरात ही रुग्णवाहिका आता बाळांचे प्राण वाचवू लागली आहे. इंदोरपर्यंत प्रवास करत या गाडीने २०० ते २५० बालकांचे प्राण आजवर वाचविले आहेत.

एकदा असेच गर्भातील अभ्रकाने त्याच्या आईच्या पोटात शौच केले. त्यामुळे ते सर्व हानिकारक घटक त्या नवजात बाळाच्या फुफ्फुसात गेले. त्यामुळे बाळाला ऑक्सिजनची मोठी कमतरता भासू लागली. ‘नायट्रिक ऑक्सिड’ नावाचा गॅसच त्या बाळाचे प्राण वाचवू शकत होता. पण, तो गॅस नाशिकमध्ये उपल्ब्ध नव्हता. त्यामुळे त्या बाळाला मुंबईत न्यावे लागले. मोठ्या प्रयत्नांनी ते बाळ वाचले. त्यानंतर हीच गरज ओळखून २०१८ साली डॉ. आहेर यांनी नाशिकमध्ये ‘नायट्रिक ऑक्सिड’ गॅसची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे ५० पेक्षा जास्त बाळांचे प्राण आजवर वाचले आहेत.


सन २००० पर्यंत एक किलो वजनाच्या खालील बाळांना वाचवण्यात देखील यश येत असे. मात्र, ५५० ग्रॅम वजनाच्या अवनी नाईक नामक बाळाचे प्राण वाचविण्याचे शिवधनुष्यदेखील डॉ. आहेर यांनी २०१३ मध्ये पेलले. हीच अवनी तीन वर्षांची झाल्यावर तिच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन डॉ. आहेर यांनी केले. छोट्या बाळांना वाचविण्यासाठी १५ लाखांच्या एक ‘इंक्यूबेटर’ची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

प्रत्येक बाळ हे स्वतःचेच बाळ आहे, असे समजून डॉ. आहेर व त्यांचे कर्मचारी बाळांची काळजी घेतात. नांदेडमधील एका दाम्पत्याला जुळे अपत्य झाले होते. मात्र, आर्थिक स्थिती खराब असल्याने त्यांनी त्या बाळास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचे एक बाळ अपुर्‍या वैद्यकीय सुविधेमुळे दगावले. त्यांनी आपली आपबीती डॉ. आहेर यांना कथन केली. त्यांची स्थिती लक्षात घेता, त्यांना ‘निओकेअर हॉस्पिटल’मध्ये मोफत उपचारांसाठी त्यांनी उपलब्ध करून घेतले. त्यामुळे त्यातील एका बाळाचे प्राण वाचू शकले. काही काळाने नांदेड येथील त्या दाप्मत्याने कष्ट करून कमविलेले रुपये दहा हजार आत्मीयभाव जपत डॉ. आहेर यांना देऊ केले. ज्यांची आर्थिक स्थिती नाही, अशांना सरकारी योजनेतून लाभ मिळवून देण्याचे कार्यदेखील डॉ. आहेर यांनी केले आहे.


उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय समाजात नवजात शिशूंच्या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे डॉ. आहेर सांगतात. यामागे अपत्यप्राप्तीचा उशिरा घेण्यात येणारा निर्णय हे एक मुख्य कारण असल्याचे ते सांगतात. सुदृढ बाळ जन्माला यावे, यासाठी आईचे पोषण आणि ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन हे आवश्यक असल्याचे ते आवर्जून नमूद करतात. सर्वांना अत्याधुनिक उपचार मिळण्यासाठी सरकारी रुग्णालये ही आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित डॉक्टर्स यांनी युक्त असावीत, अशी अपेक्षादेखील ते व्यक्त करतात.

भारतात उत्तम डॉक्टर असून, युकेमध्ये ६० टक्के डॉक्टर हे भारतीय आहेत. युकेसारखी ‘एनएचएस’ सुविधा भारतात सुरू होणे आवश्यक असल्याचे ते मानतात. ‘निओकेअर हॉस्पिटल’मध्ये सर्वात कमी संसर्ग असून कोणतेही प्रतिजैविक औषध न देता बाळ पूर्णपणे बरे होऊन घरी जात असल्याचे डॉ. आहेर आवर्जून नमूद करतात.

परदेशात बघितलेल्या सुविधा या आपल्या देशातील नागरिकांना मिळाव्यात म्हणून डॉ. आहेर यांनी कार्याचा वस्तुपाठ निर्माण केला आहे. परदेशात सहज स्थायिक होऊन आरामदायी आयुष्य त्यांना व्यतीत करता येणे सहज शक्य होते. मात्र, अनंत आर्थिक अडचणींचा सामना करत डोक्यावर कर्जाचा भार घेऊन डॉ. आहेर यांचे सरू असलेले प्रयत्न हे समाजात नक्कीच मानवतेची गुढी उभारण्यास दिशादर्शक ठरणारे आहेत. प्रत्येक बाळ हे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे बाळाचा जन्म होताच त्याची तपसणी होणे आवश्यक आहे. बाळांचे लसीकरण हे वेळोवेळी होणे आवश्यक आहे. पूर्वी बाळांना डायरिया, न्युमोनिया हे आजार होत. आता ९० टक्के बाळांना हे आजार होत नाहीत. कारण, लसीकरण होत आहे. यासाठी सरकारनेदेखील पुढाकार घेतला आहे. अविकसित बाळे जन्माला येऊ नये, म्हणून आईनेच काळजी घेणे आवश्यक आहे.




@@AUTHORINFO_V1@@