मुंबई: संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांन कामावर रुजू होऊ द्या. ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारे एसटी महामंडळाचे एक पत्र मंगळवारी उघड झाले. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी या पत्राची होळी केली. तसेच एसटी महामंडळाच्या विलीनिकरणाच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाचीही होळी करण्यात आली आहे.
या गोपनीय पत्रामुळे सरकारचा चेहरा उघड झाला आहे. हे सरकार दुटप्पी आहे. त्यांना कामगारांचा छळ करून एसटीत पैसे घेऊन त्यांच्या लोकांना भरती करायचे आहे. अधिवेशनात आम्ही त्यावर आवाज उठवणार आहोत, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर यांनी या पत्र आणि अहवालाची होळी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
कामगारांना कामावर हजर राहू द्या, हजर झाल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे अधिकाऱ्यांना आदेश देणारे गोपनीयतेचे पत्र आम्हाला उशिरा मिळाले. या पत्राची आम्ही चिरफाड करणार आहोत. माधव काळेंच्या सहीने पत्र दिल आहे. एकदा एसटी सुरळीत झाली की कारवाई करा, असेही त्यात म्हटल आहे. सरकार दुटप्पी आहे. त्यांचा दुतोंडीपणा उघड करणार आहोत, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. हे गोपनीयतेचे पत्र आणि त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कामगार विरोधी आहे. त्याची आम्ही होळी केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र एसटी कर्मचारी आणि भाजप आमदार आक्रमक झाल्यानंतर महामंडळाने हे पत्र खोटे असल्याचा खुलासा केला आहे. या पत्रात महामंडळाने सांगितलं आहे की, संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू झालेल्या/होत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे दि.७ मार्च या तारखेचे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (कर्मचारीवर्ग) यांच्या स्वाक्षरीने एक खोटे परिपत्रक समाजमाध्यमाव्दारे व्हायरल झाले आहे. सदर परिपत्रक पुर्णतः खोटे व बनावट असून, कर्मचाऱ्यांमध्ये हेतूपुरस्सर संभ्रम निर्माण करुन त्यांना आपल्या कर्तव्यावरून परावृत्त करण्याच्या गैर-उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्ती अथवा समुहाने प्रदर्शित केले आहे. संबंधित अज्ञात व्यक्ती अथवा समुहावर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार एसटी महामंडळाच्या वतीने पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच दि. १० मार्च पर्यंत हजर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा एसटी महामंडळाचा मानस नाही.