स्वतःचा व्यवसाय सुरू करुन त्याला जागतिक पातळीवर यशस्वी करून दाखवणार्या श्वेता मॅकवान यांनी ‘शुभविधी’ ही कंपनी नावारुपाला आणली. तसेच, ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ संघटनेची स्थापना करून उद्योजिकांना मार्गदर्शन करण्याचे कामही त्या करतात. तेव्हा, आज जागतिक महिला दिनानिमित्ताने या यशस्वितेच्या यशस्वी कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...
श्वेता मॅकवान यांनी २०११ मध्ये त्यांची ’शुभविधी’ची नावाची संस्था स्थापन केली. ‘इव्हेंट ऑर्गनायझिंग’ क्षेत्रात यशस्वी झाल्यावर त्यांनी ’स्त्री उद्योगवर्धिनी’ या महिला उद्योजक संघटनेचे कामही सुरू केले. कोरोना काळात उद्योजिकांना भेडसावणार्या विविध अडचणींचा सामना करता यावा, यासाठी त्यांनी प्रामुख्याने या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. कौतुकास्पद बाब म्हणजे, वर्षभरात श्वेता यांनी दोन हजार सभासदांची नोंदणीही पूर्ण केली. तसेच श्वेता यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. मात्र, स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग त्यांनी निवडला.
श्वेता मॅकवान यांची कहाणी तशी विलक्षण. श्वेता यांचा जन्म दादरमधलाच. त्यांचे माहेरचे आडनाव सरवणकर. वैश्यवाणी समाजातल्या असल्याने शिकून नोकरी वगैरे करण्याची भानगड नको, सरळ व्यवसायात लक्ष द्या, असा त्यांच्या वडिलांचा आग्रह होता. त्यांच्या आई एका खासगी रुग्णालयात परिचारिका असल्याने मात्र शिक्षणाचं महत्त्व त्या जाणून होत्या.
श्वेता सांगतात की, “आई कायम मला सांगायची की तू शिक, शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नकोस, आपल्याला आयुष्यात फक्त पुड्या बांधायच्या नाहीत.” श्वेता यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर शाळेत झाले. नंतर महर्षी दयानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून त्यांनी पदवी मिळवली. ‘एलएलबी’साठी त्यांनी शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
दरम्यानच्या काळात एल्सी मॅकवान यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. कायद्याचे शिक्षण गाठीशी होतेच. परंतु, घरच्या जबाबदार्यांमुळे त्यांना ‘प्रॅक्टिस’ करता आली नाही. पती एल्सी हे नोकरीनिमित्ताने परदेश दौर्यांवर असायचे. सासू-सासरे, दोन जुळी मुलं, माहेरीही आई-वडिलांची जबाबदारी त्यांनी लिलया पेलली. तोपर्यंत उद्योग वगैरे करावा, याबद्दलचा साधा विचारही त्यांच्या मनात नव्हता.
हळूहळू आवड म्हणून त्यांनी छोटेखानी ‘इव्हेंट्स’ करायला सुरुवात केली. डोहाळेजेवण म्हणा, बारसं, लहान मुलांचे वाढदिवस, असे घरगुती कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. यामुळे श्वेता यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होत गेला. मग पुढे याच क्षेत्रात व्यवसाय करूया, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 2011 मध्ये ’शुभविधी’ या नावाने ‘इव्हेंट्स’ कंपनी स्थापन केली. त्यानंतर संधी दारावरच येऊन उभी होती. अकाल मनचंदा या सहकार्याच्या मदतीने त्यांनी अनेक परदेशी ‘इव्हेंट्स’चे यशस्वी आयोजन केले.
भारतासह श्रीलंका आणि इतर देशांमध्ये ’शुभविधी’ पोहोचली. सप्त तारांकित हॉटेल्ससाठी काम करता आले. श्रीलंकेत कँडी येथे असलेल्या ’रमाडा’ या सप्त तारांकित हॉटेलच्या ‘डेकोरेटिव्ह पॅनल’वर त्यांनी काम केले. असा बराचसा अनुभव त्यांना या काळात गाठीशी बांधता आला. मुंबईतही त्यांनी अनेक विवाह सोहळे यशस्वीरित्या पार पाडले. पुरस्कार समारंभ, राजकीय सभा, स्नेहसंमेलने आदी कार्यक्रमांद्वारे ’शुभविधी’चा पसारा वाढत होता.
सुरुवातीला एक महिला असे भव्य कार्यक्रम आयोजित करते, हे म्हटल्यावर लोकांना आश्चर्यच वाटायचे. काहीजण साशंकही असायचे. काही ग्राहकांचा रोखही तसाच होता. त्यामुळे श्वेता यांना कामे मिळवताना अडचणींचाही सामना करावा लागत होता. पण, श्वेता मॅकवान डगमगल्या नाहीत. नेटाने आणि खंबीरपणे या आव्हानांवर त्यांनी मात केली. यश अशा व्यक्तींच्या केवळ दोन पावलेच दूर असते आणि झालेही तसेच! कामातून स्वतःला सिद्ध करत राहणे, हेच सूत्र कायम ठेवून त्या पुढे जातच राहिल्या. हळूहळू ग्राहकांचा श्वेता यांच्यावरील, त्यांच्या कामावरील विश्वास वाढू लागला. त्यांची कार्यक्षेत्रातील प्रगती अशीच सुरू होती. पण, मध्येच माशी शिंकली. कोरोना आला आणि सारेकाही ठप्प झाले.
कोरोना महामारीच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम, ‘इव्हेंट्स’वर पूर्णपणे बंदी आली. ’कोरोनाने हे क्षेत्र संपवलं,’ असं श्वेता खेदाने सांगतात. त्या म्हणतात, “सारेकाही ठप्प झाल्याने मी आणि माझ्याबरोबर काम करणारे कारागीर सगळेच घरीच बसून होतो. समोर काहीच भविष्य दिसत नव्हते. पुढे निर्बंध शिथिलतेमुळे कामे हळूहळू सुरू झाली खरी, पण 50 जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळे होत असल्याने अडचणी कायम होती.”
पण, संकटांशी झगडण्याची अंगभूत वृत्ती आणि संकटातसुद्धा कायम संधी शोधण्याची उर्मी, यामुळे श्वेता यांनी उद्योजकांचे छोट्या स्वरुपातील मेळावे घेण्यास सुरुवात केली. या मेळाव्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. मेळावे घेताना त्यांचा संबंध उद्योजिकांशी आला. अशा उद्योजिकांना एका संघटनेची नितांत आवश्यकता आहे, असे त्यांच्या लक्षात आले.
जिथे त्यांना एकत्र येऊन अशाच संकटांना धीरोदात्तपणे तोंड देता यावे, यासाठी एक व्यासपीठ मिळेल, याच विचारातून श्वेता आणि त्यांच्या 14 सहकार्यांनी एकत्र येऊन ’स्त्री उद्योगवर्धिनी’ ही संस्था स्थापन केली आणि अल्पावधीत सहकार्यांच्या साथीने ही संस्था त्यांनी प्रमुख प्रवाहातही आणली. सहा महिन्यांतच या संस्थेची सभासद नोंदणी दोन हजारांवर पोहोचली. महिलांना उद्योगांसाठी, कायदेशीर सल्ले देण्याचे काम ही संस्था करते.
येत्या काही काळात या संस्थेची स्वतःची पतसंस्थाही स्थापन केली जाणार आहे. श्वेता यांच्या प्रगतीत कुटुंबाची मोलाची साथ आहे, असे त्या सांगतात. त्यांचे पती एल्सी मॅकवान त्यांच्या मागे कायमच उभे असून त्यांना मदत करायला तत्पर असतात. त्यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा हा फोटोग्राफीच्या व्यवसायात असल्याने, श्वेता यांच्या व्यवसायाची ती बाजू आता तोच सांभाळतो.
“कोरोनाच्या काळालातील आव्हानांना मी स्वतः सामोरी गेली आहे. या अत्यंत कठीण काळातही संकटातून मी मार्ग काढला. त्यामुळे माझ्यासह मी माझ्या सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन पुढे जाईन. देशातील प्रत्येक स्त्रीला तिच्या ’स्वत्वा’ची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, हेच माझे ध्येय आहे,” असे त्या सांगतात.