मुंबई : "सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालीयान यांची हत्या झाल्यानंतर मला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोनदा फोन आला होता. तेव्हा त्यांनी, आपण सुशांत आणि दिशाच्या केस बद्दल बोलू नका. तिथे एका मंत्र्याची गाडी होती याबाबतही सांगू नका. तुम्हालाही मुलं आहेत, त्यामुळे असं काही करू नका; असं सांगितलं", असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवणी पोलीस स्थानकातून बाहेर येताच माध्यमांशी बोलताना शनिवारी रात्री (दि. ५ मार्च) मोठा गौप्यस्फोट केला. विशेष म्हणजे हे वाक्य त्यांच्या जबाबातून वगळलं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांची मालवणी पोलीस ठाण्यात तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर अनेक गोष्टींचा खुलासा केला. "दिशाला न्याय मिळावा एवढीच आमची मागणी आहे. मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर काही दिवसांपूर्वी दिशाच्या घरी गेल्या होत्या. राणे पिता-पुत्रांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे आपली बदनामी होतेय; अशा प्रकारची खोटी तक्रार दिशाच्या पालकांना करण्यास त्यांनी प्रवृत्त केलं. पुढे ती तक्रार पोलिसांकडून नोंदवण्यातही आली.", असेही राणे पुढे म्हणाले.