मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबागच्या किनाऱ्यावर सागरी कासवांमधील ग्रीन सी टर्टल प्रजातीच्या पिल्लाचा जन्म झाला आहे. ( green sea turtle ) शनिवारी (५ मार्च, २०२२) देवबाग किनाऱ्यावर संरक्षित केलेल्या घरट्यामधून ग्रीन सी कासवाची ७४ पिल्ले जन्माला आली. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात ग्रीन सी कासवाची पिल्ले जन्मास येण्याचा हा पहिलाच छायाचित्रित पुरावा आहे. ( green sea turtle )
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील (sea turtle) 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा ( sea turtle ) विणीचा हंगाम असतो. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देवबाग किनाऱ्यावर ग्रीन सी कासवाचे घरटे आढळून आले होते. ११ जानेवारी रोजी देवबाग किनाऱ्यावर पहाटे अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी ग्रीन सी कासवाला स्थानिक पंकज मालंडकर यांनी पाहिले. त्यांचे वडील आनंद मालंडकर कासव संवर्धनाचे काम करत असल्याने त्यांनी ही अंडी 'इन-सिटू' पद्धतीने म्हणजेच आहेच त्या ठिकाणी ठेवून संवर्धित केली होती. अखेरीस दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ५ मार्च रोजी यातून ७४ पिल्ले बाहेर पडली.
कासवमित्र पकंज मालंडकर यांनी मॅंग्रोव्ह फाऊंडेशनचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांच्या उपस्थितीत या पिल्लाला समुद्रात सोडले. महाराष्ट्रातून ग्रीन सी कासवाचे पिल्लू जन्मास येण्याचा हा पहिलाच छायाचित्र पुरावा असल्याची माहिती कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली. भारतातील पश्चिम किनाऱ्यावर ग्रीन सी कासवाची विण ही गुजरात आणि लक्षव्दीपच्या किनाऱ्यांवर होते. डाॅ. वरद गिरी यांनी २००० साली राज्याच्या किनाऱ्यावर केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रीन सी कासवाची विण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर होत होती. परंतु, पुढल्या काळात त्यासंबंधीचा कोणताच पुरावा मिळाला नव्हता.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.