आपल्या अंकाची भलावण करत वॉलेसने वर्गणीदार मिळवले आणि फेब्रुवारी १९२२ मध्ये पहिला अंक प्रकाशित केला. त्या अंकाच नाव होतं- ‘रिडर्स डायजेस्ट!’ बरेाबर १०० वर्ष पूर्ण झाली त्या घटनेला!
डुविट वॉलेस हा एका अमेरिकन प्राध्यापकाचा मुलगा होता. बाप प्राध्यापक असला, तरी मुलाचं शिक्षणात अजिबात लक्ष नव्हतं. म्हणजे तो चांगला हुशार आणि चटपटीत होता. पण, त्याला शालेय अभ्यासक्रमात गोडी वाटत नसे.शालेय वाचन सोडून इतर साहित्य तो अगदी आवडीने आणि तासन्तास वाचत बसत असे. आपल्याला शिक्षणात गती नाही, तेव्हा जगण्यासाठी काहीतरी करायला हवं, या जाणिवेने त्याने अनेक बारीक-सारीक नोकर्या केल्या.
त्यातली त्याला स्वत:ला आवडलेली आणि ज्यात त्याला आर्थिक यश मिळालं, अशी नोकरी म्हणजे विविध वस्तूंचा फिरता विक्रेता ही. वॉलेस वाचन करताना आपल्याला आवडलेली चमकदार वाक्य लिहून ठेवत असे आणि विक्रेता म्हणून आपल्या मालाची भलावण करताना तो ती वाक्य मोठ्या खुबीने बोलत असे. साहजिकच एक संभाषणचतुर म्हणजेच ‘बोलबच्चन विक्रेता’ म्हणून तो ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाला.
वॉलेस २५ वर्षांचा झाला, त्याच वर्षी म्हणजे १९१४ साली युरोपात महायुद्ध सुरू झालं. अमेरिका लगेच त्यात उतरली नाही, तरी तिने सार्वत्रिक सैन्यभरती सुरू केली. वॉलेससारख्या बेकारांना ती सुवर्णसंधीच होती. पुढे १९१७ साली अमेरिका अधिकृतपणे युद्धात उतरली. डुविट वॉलेसचं सैन्यपथक थेट आघाडीवर म्हणजे फ्रान्समध्ये रवाना झालं, वॉलेस एका लढाईत जबर जखमी झाला. बरेच महिने त्याला रुग्णालयात पडून राहावं लागलं. त्या कालखंडात त्याची वाचनाची जुनी आवड उसळून आली.
भरपूर वाचन करतानाच तो आपण वाचलेल्या लेखनाची संक्षिप्त आवृत्ती स्वत:च्या हाताने लिहून काढून आजूबाजूच्या रुग्णाईत मित्रांना वाचायला द्यायचा. तो म्हणायचा, “एखाद्या मासिकातला संपूर्ण लेख, कथा किंवा एखादं पुस्तक सगळं वाचत बसू नका. मी केलेलं हे संक्षिप्त रुप वाचलत की, संपूर्ण अंक वा पुस्तक वाचल्याचा आनंदही तुम्हाला मिळेल आणि तुमचा वेळही वाचेल.” त्याच्या मित्रांनाही ही संकल्पना आवडली.
डुविट वॉलेस पूर्ण बरा होऊन पुन्हा सैन्यपथकात दाखल होईतो महायुद्धाची अखेर होत आली होती. नोव्हेंबर १९१८ मध्ये महायुद्ध संपलंच. वॉलेस पुन्हा अमेरिकेत परतला. लष्करी नोकरी संपली. आता पुढे काय? वॉलेसने रुग्णालयातलीच आपली कल्पना पुढे न्यायचं ठरवलं. त्याही काळात अमेरिकेत अनेक वृत्तपत्रे आणि मासिके प्रसिद्ध होत असतं. या सर्व नियतकालिकांमधील उत्तम आणि समाजातल्या सर्व गटांना आवडेल, उपयुक्त ठरेल असं साहित्य निवडायचं. त्याला शक्य तितकं संक्षिप्त रुप द्यायचं आणि ते एका छोट्या आकाराच्या अंकात प्रसिद्ध करायचं, असं वॉलेसने ठरवलं.
आकार छोटा का? तर वृत्तपत्र किंवा मासिक हे मोठ्या आकाराचं असतं, आपल्या अंकाचा आकार असा हवा की, एखादा पुरूष तो अंक सहजपणे कोटाच्या खिशात नि एखादी महिला सहजपणे तो पर्समध्ये सरकवू शकेल. डुविट वॉलेस आपल्या अंकाची संकल्पना आणि नमुना प्रत घेऊन अनेक जुन्या-नव्या प्रकाशकांना भेटला, कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी तो विल्यम रँडॉल्फ हर्स्ट यालासुद्धा भेटला, त्याकाळी ‘मीडिया मुगल’,‘मीडिया मॅग्नेट’ वगैरे शब्द प्रचलित झालेले नव्हते. पण, विल्यम हर्स्टची अवस्था तीच होती. अमेरिका या अवाढव्य देशातल्या १८ महत्त्वाच्या शहरांमधून त्याच्या मालकीची एकूण २८ दैनिक वृत्तपत्र निघत होती आणि ती रोज किमान दोन कोटी लोक वाचत होते. हर्स्टने पण वॉलेसला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
अशा स्थितीत त्याला लीली अॅचिसन नावाची एक महिला भेटली. तिचा बाप प्रेस्बिटेरियन या प्रोटेस्टंट पंथाच्या एका उपपंथाचा पाद्री होता. त्यामुळे ही लीला पण चांगली शिकलेली होती आणि महिलांच्या प्रगतीसाठी सामाजिक कार्य करत होती. तिने वॉलेसला म्हटलं की, ’‘तू चांगला विक्रेता आहेस. तुझी मासिकाची संकल्पना चांगली आहे. सरळ लोकांकडे जा. वर्गणीदार गोळा कर नि तूच मासिक प्रकाशित कर. प्रस्थापित प्रकाशकांच्या नादी कशाला लागतोस? या कामात मी तूला मदत करेन.”
अमेरिका या देशाची आणि अमेरिकन समाजाची काही वैशिष्ट्यं आहेत. अमेरिका हा देश बंदुकीच्या बळावर निर्माण झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत ’गन’ला अतोनात महत्त्व आहे. तिथे शस्त्रास्त्रबंदी कायदा नाही. कितीही गुन्हेगारी बोकाळली माथेफिरू बंदूकधार्यांनी बेछुट गोळीबार करून कितीही मुडदे पाडले तरी ‘गनकंट्रोल’कायद्याच्या फक्त चर्चा होतात. तसा कायदा प्रत्यक्षात होण्याची शक्यता फार कमी आहे. तीच गोष्ट मोटार या वाहनाची. अमेरिकन माणूस एकवेळ अन्नापाण्यावाचून राहील, पण मोटारशिवाय जीवन ही कल्पनाच तो करू शकत नाही. तसंच वेळेच्या बाबतीत वेळेला अमेरिकन जीवनात फार महत्त्व आहे. अमेरिकन माणसाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गोष्टी हव्या असतात.
वॉलेसने वैयक्तिक वर्गणीदार सभासद मिळवताना या मुद्द्यांवर भर दिला. जगातलं सर्वोत्कृष्ट साहित्य आम्ही तुम्हाला संक्षिप्त स्वरुपात देणार आहोत. कमीत कमी वेळ, उत्कृष्ट साहित्याचा वाचनानंद आणि माफक किंमत, रोज एक चांगला लेख या प्रमाणात महिन्याला ३० किंवा ३१ लेख वाचा अणि स्वतःच व्यक्तिमत्त्व समृद्ध करा, अशा प्रकारची आपल्या अंकाची भलावण करत वॉलेसने वर्गणीदार मिळवले आणि फेब्रुवारी १९२२ मध्ये पहिला अंक प्रकाशित केला. त्या अंकाच नाव होतं- ‘रिडर्स डायजेस्ट!’बरेाबर १०० वर्ष पूर्ण झाली त्या घटनेला!या पहिल्या अंकाच्या प्रकाशनापूर्वी डुविट वॉलेस आणि लीला अॅचिसन यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट केली.
त्यांनी लग्न केलं ते १९२१ साल होतं. डुविट तेव्हा ३२ वर्षांचा होता. लीला त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठीच होती. पण, त्यांचं लग्न आणि त्यांचं मासिक कमालीचं यशस्वी ठरलं. १९२२ ते १९६४ अशी तब्बल ४२ वर्षं त्या दोघांनी ‘रिडर्स डायजेस्ट’च्या संपादक पदाची धुरा वाहिली आणि त्या मासिकाला ‘पृथ्वीतलावरील सर्वाधिक वाचलं जाणारं उत्कृष्ट कौटुंबिक मासिक’ हा मान मिळवून दिला. समाजाच्या प्रत्येक वयोगटाला आवडेल, भरपूर आणि अधिकृत माहिती देईल, सामान्य ज्ञानात भरघोस वाढ करेल असाच मजकूर त्यात असायचा.
बघता-बघता ‘रिडर्स डायजेस्ट’ने भरारी घेतली आणि अवघ्या सात वर्षांत त्याने २ लाख, ९० हजार वर्गणीदारांचा टप्पा गाठला. १९२२ साली वर्षाला पाच हजार डॉलर्स मिळवणारं मासिक १९२९ साली वर्षाला नऊ लाख डॉलर्स मिळवू लागलं आणि ते ही फक्त वर्गणीदारांच्या बळावर! हे यश अभूतपूर्व होतं. तरीही वॉलेस दाम्पत्याने लगेच ब्रिटनमध्ये अंक पाठवला नाही; अन्यथा जे अमेरिकेत प्रकाशित होतं, ते लगेच ब्रिटनमध्ये गेलंच पाहिजे, अथवा उलट, अशी परंपरा अगदी आजही आहे. वॉलेसने १९३८ मध्ये ब्रिटनमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय आवृत्ती प्रसिद्ध केली. १९६२ साली ‘रिडर्स डायजेस्ट’ला ४० वर्षं पूर्ण झाली. तेव्हा जगभरातल्या ४० देशांमध्ये, १३ भाषांमध्ये आणि ‘ब्रेल’ लिपीमध्येसुद्धा ‘डायजेस्ट’च्या एकूण २० लक्ष ३० हजार प्रती दरमहा निघत होत्या.
जगातल्या विविध देशांमध्ये आणि विविध भाषांमध्ये आपलं मासिक काढताना वॉलेसने फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्या-त्या देशांमधले आणि भाषांमधले जाणते संपादक नेमले. काही ठरावीक मजकूर, स्तंभ हे सर्वत्र समान ठेवून, अन्य मजकूर, लेख स्थानिक पातळीवर निवडले जावेत, हे कटाक्षाने पाहिलं. असा मजकूर निवडताना ‘रिडर्स डायजेस्ट’ या नावाला न शोभणारं काहीही नसेल, ‘डायजेस्ट’च्या दर्जाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हेही पाहिलं. भारताचंच उदाहरण घ्या ना. १९५४ साली ‘डायजेस्ट’ची भारतीय आवृत्ती सुरू झाली. हे काम टाटांकडे सोपवण्यात आलं. टाटा म्हणजे उत्तम गुणवत्ता, राजकीय लुडबूड नाही. साहजिकच ४० हजारांपासून सुरू झालेला खपाचा आकडा केव्हाच सहा लाखांवर पोहोचला.
वॉलेस दाम्पत्याने अमाप पैसा कमावला आणि अमाप दानधर्मही केला. इजिप्त या देशाने नाईल नदीवर आस्वान हे अतिभव्य धरण बांधलं. या धरणात अबू सिंबेल या गावातली इसवी सन पूर्व १३व्या शतकातली राजा किंवा फरोहा समसिस दुसरा याने बांधलेली देवळं बुडणार होती. ही देवळं बांधलेली नसून कुरूंदी खडकात म्हणजे सँडस्टोनमध्ये कोरलेली होती. खरं पाहता इजिप्त हा मुसलमानी देश. मुसलमानपूर्व काळातल्या मूर्ती म्हणजे पाखंड असं न म्हणता इजिप्तने ‘युनेस्को’च्या मदतीने त्या मूर्ती हलवून जशाच्या तशा वरच्या पातळीवर पुन्हा बसवल्या. ‘अॅटलास कॉप्को’ या स्वीडिश कंपनीने हे फार कौशल्याचं काम उत्कृष्टपणे पार पाडलं. १९६४ ते १९६८ या कालावधीत झालेल्या या कामाला सुमारे २० कोटी स्विडीश क्रोनर म्हणजे सुमारे १५५ कोटी रूपये एवढा खर्च आला. यातला मोठा वाटा लीली वॉलेसने ‘युनेस्को’ला दिलेल्या देणगीतून खर्च करण्यात आला.
आता २१व्या शतकात मात्र ‘रिडर्स डायजेस्ट’चा दर्जा, लोकप्रियता आणि खप सगळंच डळमळू लागलं आहे. स्वत: डुविट आणि लीला वॉलेस, जॉन पेट्रिकसारखे सिद्धहस्त लेखक काळाच्या पडद्याआड गेलेत. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्ही क्षेत्रांत स्पर्धक वाढलेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हजारो दूरदर्शन चॅनेल्स, युट्यूब आणि समाजमाध्यमांमुळे जगभरात सगळीकडेच लोकांचं वाचन कमी झालंय. लोक ‘रिडर्स डायजेस्ट’ सारख्या दर्जेदार नियतकालिकापेक्षा समाजमाध्यमांना विद्यापीठ समजत आहेत. ही ‘डायजेस्ट’ची शंभरी म्हणावी की समाजाची शंभरी भरली म्हणावी?