भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे, निष्णात नेत्रविशारद, भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, हिंदू महासभा नि भोसला सैनिकी विद्यालयाचे संस्थापक, धर्माभिमानी धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा दि. ३ मार्च हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे चिंतन करणारा हा लेख...
डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म दि. १२ डिसेंबर १८७२ छत्तीसगढमधील विलासपूर येथे झाला. डॉ. मुंजे हे ’तात्या’ या नावाने त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जायचे. तात्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण विलासपूरमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी रायपूरला पूर्ण केले. मॅट्रिक परीक्षेच्या वेळेस त्यांचा विवाह कृष्णाबाई पारधी यांच्याशी झाला. १८९० मध्ये तात्या मॅट्रिक झाले आणि त्याचवेळी त्यांचे वडील नोकरीवरून निवृत्त झाले. त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. अशा परिस्थितीत मिळालेली १५ रुपयांची शिष्यवृत्ती व शिकवण्या करून ते महाविद्यालयीन शिक्षण व घर सांभाळू लागले. ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व विशेषतः संस्कृत या विषयात प्रवीण होते. संस्कृत विषयावर तर त्यांचे नितांत प्रेम होते. सत्य आणि मानवता हाच धर्म आहे, याच विचाराचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी काही इंग्रजी कविता संस्कृतमध्ये भाषांतरित केल्या. मुलाने वकील व्हावे असा वडिलांचा आग्रह होता. परंतु, त्यांना वैद्यकीय क्षेत्राची आवड होती. त्यामुळे घरी कुणालाही न सांगता मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजला त्यांनी प्रवेश घेतला. डॉक्टर झाल्यावर त्यांनी प्लेग प्रतिबंधक खात्यात नोकरी केली.
१९१२ यावर्षी धर्मवीर मुंजे यांनी प्रभावशाली कीर्तनकारांतून राष्ट्रधर्माचे प्रचारक कीर्तनकार निर्माण करावे, या आकांक्षेने ना. दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम कीर्तन संमेलन नागपूर येथे घडवून आणले होते. दक्षिण आफ्रिकेतील ते म्बुलन्स कोअरचे अधिकारी म्हणून गेले. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था ब्रिटिशांनी केली होती. तेथेच डॉ. मुंजे यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. तेथून परत आल्यावर नागपूरला त्यांनी दवाखाना सुरू केला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे डॉ. मुंजे यांचे राजकीय गुरु होते. डॉ. मुंजे यांचा संस्कृत ग्रंथांवर सखोल अभ्यास होता. वेद, सर्व स्मृती, पाणिनीय व्याकरण, धर्मशास्त्र, रामायण-महाभारतासारखे धर्मग्रंथ, कौटिलीय अर्थशास्त्रासारखे राजनीतिवरचे ग्रंथ, संस्कृत साहित्यावरील सर्व लेखक आणि त्यांच्या साहित्यकृती या सर्वांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. तब्बल २५ वर्षे व्यासंग केल्यावर डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवर संशोधन करून डॉ. मुंजे यांनी ’नेत्रचिकित्सा’ हा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला. संस्कृत ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, असे डॉक्टरांचे मत होते. समाजकार्य चालू असतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९२० साली असहकाराचे पर्व सुरू झाले. गांधीजींच्या असहकार तत्वावर डॉ. मुंजे यांचा बिलकुल विश्वास नव्हता. याचवर्षी नागपूरला झालेल्या काँग्रेस अधिवेशनात गांधींच्या राजकारणाची सुरुवात झाली. गांधींच्या अव्यवहार्य अहिंसा धोरण व खिलाफत आंदोलनातील मुस्लीम तुष्टीकरणाला विरोध करून डॉ. मुंजे यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली.
१९२१ साली केरळमध्ये मोपले बंड करून उठले. त्यांनी तेथे केलेल्या अत्याचाराचा बातम्या वृत्तपत्रांत झळकू लागल्या. केरळ येथील मोपला मुसलमानांच्या भयंकर उठावामुळे इंग्रजांचे राज्य संपल्यासारखे वाटू लागले. केरळात मोपल्यांनी केलेल्या हिंदूंवरील अत्याचारानंतर डॉ. मुंजे आणि स्वामी श्रद्धानंद केरळात गेले आणि त्या अत्याचारांची संपूर्ण हिंदुस्थानभर वाचा फोडली. हजारोंच्या संख्येत बळजबरी अथवा मोहाने परधर्मात गेलेल्या आपल्या हिंदू बांधवांना डॉ. मुंजे यांनी स्वधर्मात आणण्याकरिता आपल्या जीवाचे रान केले. “हिंदुस्थान एक अखंड आणि अविभाज्य राष्ट्र आहे आणि ते तसेच राहिले पाहिजे,” असे उद्गार क्रिप्स योजनेला अनुलक्षून त्यांनी काढले होते. अस्पृश्यताविरोधात त्यांनी समाजप्रबोधन केले. मोपल्यांनी केलेल्या बंडापासून डॉक्टरांचे मन हिंदू संघटनेकडे वळू लागले. १९२३ यावर्षी नागपूर हिंदू महासभेची स्थापना झाली. या नागपूर हिंदू सभेचे अध्यक्ष राजे भोसले, तर उपाध्यक्ष डॉ. मुंजे नि डॉ. हेडगेवार हे कार्यवाह होते. डॉ. मुंजे १९२६ पासून अखिल भारतीय हिंदू महासभेचे नेते होते. त्यानंतर १९२९ पर्यंत प्रांतिक काँग्रेस कमिटीचे ते नेते होते. हे नेतृत्व त्यांना त्यांच्या सामर्थ्यामुळे आणि त्यांच्या अधिकारानुसार प्राप्त झालेले होते. डॉ. हेडगेवार, डॉ. परांजपे, मार्तंडराव जोग, दाजीशास्त्री होळकर तसेच विश्वासराव नवाते यांच्या सहकार्याने डॉ. मुंजे यांनी नागपूर येथे ’रायफल क्लब’ सुरू केले.
१९३० आणि १९३१ ला लंडन येथे झालेल्या दोन्ही ‘गोलमेज परिषदे’ला डॉ. मुंजे हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते आणि भारतात हिंदूंना भेडसावणार्या समस्या व सैनिकीकरण यांवर त्यांनी प्रखर भाषणे दिली. मात्र, काँग्रेसमध्ये पुढे वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी हिंदू महासभेचे काम सुरू केले व अध्यक्षपदही भूषविले. हिंदूंच्या शुद्धीचळवळीत डॉ. मुंजे हे सदैव अग्रस्थानी होते. त्यांनी विविध सभा-संमेलने भरवून ’शुद्धी चळवळ’ या विषयासंबंधी जागृती निर्माण व्हावी, म्हणून खूप खटपटी केल्यात. हिंदुस्थानातील तरुणवर्ग आधुनिक युद्धशास्त्रात प्रवीण झाला पाहिजे, याचा त्यांनी ध्यास घेतला होता. यासाठी त्यांनी जर्मनी, इटली इ. देशांतील सैनिकी शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मुसोलिनीची देखील भेट घेतली होती. सैनिकी शाळा स्थापनेचा सर्वांगीण अभ्यास करून १९३६ मध्ये त्यांनी नाशिक येथे ’भोसला मिलिटरी स्कूल’ची स्थापना केली. ही लष्करी शाळा एकराष्ट्रीयत्व, बंधुभाव उत्पन्न करण्याकरिता, धर्मसंस्कृतीचा गौरव आणि राष्ट्राचा मान यांच्या संरक्षणासाठी स्थापन केली आहे, असे ते अभिमानाने सांगत. ‘ज्याची फौज त्याचे राज्य’ असे ते नेहमी म्हणत. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रथमच मुलींसाठीही लष्करी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. ज्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा डॉ. मुंजे यांनी व्हॉईसराय यांना पत्र लिहून कळविले होते की, “मी महायुद्धात भाग घेऊ इच्छितो, मी ६७ वर्षांचा म्हातारा असलो तरी माझ्यात उमेद आहे.” डॉ. मुंजे यांच्या स्वभावात विलक्षण अशी विशेषता होती. ते ज्या कार्यास हात घालीत त्यात ते तज्ज्ञता मिळवीत असे. लोकमान्य टिळकांच्या जाण्याने क्रांतिकारकांचा खूप मोठा आधार गेला. कारण क्रांती हा लो. टिळक स्थापित राष्ट्रीय पक्षाचा जाहीर अजेंडा नव्हता. तरीदेखील गुप्तपणे स्वतः लोकमान्य टिळक आणि धर्मवीर मुंजे हे क्रांतिकारकांचे सहानुभूतीदार, मार्गदर्शक आणि साहाय्यक होते. स्वा. सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे डॉ.मुंजे हे ’क्रांतिकारकांचे रात्रीचे नेते’ होते.
१९३७ मध्ये हिंदू संघटक तात्याराव सावरकर रत्नागिरीच्या स्थानबद्धेतून सुटले. येरवडा कारागृह (१९२४) ते रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून सावरकरांची मुक्तता झाल्यानंतर म्हणजेच १२-१३ वर्षांच्या कालावधीत त्यांनी लिखाण, शुद्धी चळवळी, अस्पृश्यता निवारणासारख्या सामाजिक विषयांत लक्ष घातले. विदर्भ आणि मराठी मध्यप्रांत संयुक्त हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून हिंदू संघटक सावरकर हे १९३७ यावर्षी अकोल्याला आले होते. त्यावेळी तेथील वर्हाडचा सत्कार समारोप आटोपून नागपूर स्टेशनवर देशभक्त तात्याराव सावरकर यांचा डॉ. मुंजे यांनी पहिला हार घालून त्यांच्याविषयीचा आपला आदर व्यक्त करून विनम्रपणे त्यांना नमस्कार नि त्यांचा सत्कार केला. डिसेंबर १९३७च्या नागपूर येथील हिंदू महासभेच्यावतीने सावरकरांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. मुंजे म्हणाले, “हिंदू समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दृष्टीने सावरकरांनी कार्य करावे. एकटा हिंदू समाज स्वराज्य मिळवू शकेल, हा आत्मविश्वास आज तरी हिंदू समाजात नाहीये. तो तात्याराव सावरकरांनी निर्माण करावा, अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय. यापुढील हिंदू समाजाची सर्व कामगिरी मी त्यांच्यावर सोपवीत आहे. आपण सर्व विनायकराव सावरकर यांच्या पाठीशी आहोतच, असेच त्यांच्या खांद्याशी खांदा भिडवून आपण सर्व कार्य करूया.” या विनंती दाखल डॉ. मुंजेंनी तात्याराव सावरकर यांना हिंदू सभेच्या कार्याचे पुढारीपण घ्यावे, असे म्हटले. डॉ. मुंजे यांच्या विनंतीचा स्वीकार करून तात्याराव सावरकर यांनी हिंदू महासभेची धुरा स्वतःकडे घेतली. ते पाहून डॉ. मुंजे यांना खूप मोठे समाधान झाले.
डॉक्टरांसाहेबांचा चेहरा लालबुंद होता. त्यांची प्रकृती ७० वर्षांच्या वयातही अगदी ठणठणीत होती. केस पांढरे झाले होते एवढेच,त्यांच्या वृद्धावस्थेतची निशाणी होती. त्यांना फक्त दम्याचा विकार होता. पुष्कळांना तो उतारवयात होतो. पण, डॉक्टरांना तारुण्यातच हा विकार उद्भवला होता. हवेत बदल झाला की, त्यांना त्रास होत असे. विशेषतः शिमल्याचे हवामान त्यांना मानवत नसे. तरीसुद्धा सत्तरी ओलांडली, आपण पुढे जात आहोत, हे त्यांनी स्वतः सांगितल्याशिवाय कुणाला कळत नसे. मृत्यूचा घाला आपल्यावर केव्हाही पडू शकतो, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे डॉक्टरसाहेबांना कोणी दूरच्या योजनांसंबंधी विचारले किंवा अधिकाराची जागा घेण्याचा आग्रह केला, तर ते सपेशल ‘नाही’ म्हणत. जनरल विल्सन त्यांना म्हणाले होते, “डॉक्टर, तुम्ही म्हातारे झालाही नाहीत आणि कधीही म्हातारे होऊ शकत नाही.”
डॉ. मुंजे यांनी सर्वस्वाचा होम करून हिंदुत्वाच्या आघाडीवर आजीवन अखंड झुंज दिली. रा. स्व. संघाचे संस्थापक परमपूजनीय डॉ. केशव हेडगेवार यांचेवर डॉ. मुंजे यांचे पुत्रवत प्रेम होते. डॉ. हेडगेवार यांच्या क्रांतिकारी मार्गात समर्थन नि संरक्षणदेखील डॉ. मुंजे यांनी केले होते. संघाचे कार्य सुरू झाल्यापासून ते संवर्धन करण्यापर्यंत डॉ. मुंजे यांनी सर्वतोपरी साहाय्य केले. डॉ. मुंजे यांनी घराबाहेर काय नि घरात कधीही अस्पृश्यता पाळली नाही. डॉ. मुंजे हे डॉ. आंबेडकर यांच्या घरी जेवायलादेखील गेले होते. ते राष्ट्राच्या सैनिकीकरणाचे नि ते समर्थ करण्यासाठी आवश्यक त्या शक्तीच्या उपासनेच्या पुरस्काराचे पारतंत्र्यातील भारतातील आद्यप्रवर्तक होते. डॉ. मुंजे यांच्याकडून विद्यार्थ्यांनी संदेश मागितला तर ते “जिसकी फौज उसका राज, और जिसकी लाठी उसकी भैस” असा संदेश देत. डॉ. मुंजे यांच्यापासून हजारो तरुणांना देशकार्य करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी समकालीन तरुण पिढीवर उपकारांचे खूप मोठे ओझे करून ठेवले आहे.
इंग्रजांच्या गुलामीत रखडत पडलेल्या नि पारतंत्र्याने जखडलेल्या भारतमातेला मुक्त करून तिला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी आजीवन झटणार्या अशा या राष्ट्रभक्त, स्वार्थशून्य, सवंग किर्तीची अवहेलना करून ध्येयावर अढळ राहणारा धीरोदात्त पुरुष डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या स्मृतीला शतशः दंडवत प्रणाम..!
जय माँ भारती
वंद्य वन्दे मातरम्
लेख संदर्भ :
१) धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचे चरित्र : भाग १ आणि २
- वीणाताई आणि बाळशास्त्री हरदास
२) हिंदुत्ववादी धुरंदर नेते
- ज. द. जोगळेकर
- शिरीष पाठक