संवाद एका पुस्तकाचा...

    05-Mar-2022
Total Views | 146
 
Girish Prabhune
 
 
 
‘विवेक प्रकाशन’तर्फे ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांचं ‘परिसांचा संग’ हे पुस्तक मार्च महिन्यात प्रकाशित होत आहे. ‘नागपूर तरुण भारत’मधून प्रभुणेंचं ‘ऊन-सावली’ नावाचं सदर प्रकाशित होतं. त्यातील निवडक व्यक्तिचित्रणांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.पुस्तकाचं आयुष्य हे अमर्याद असतं. या पुस्तकातून रेखाटलेल्या व्यक्तिरेखा, त्यांनी उभं केलंलं कार्य पुढील पिढीलाही कळावं यासाठी हा सर्व प्रपंच.
 
 
 
‘विवेक प्रकाशन’तर्फे ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांचं ‘परिसांचा संग’ हे पुस्तक मार्च महिन्यात प्रकाशित होत आहे. ‘नागपूर तरुण भारत’मधून प्रभुणेंचं ‘ऊन-सावली’ नावाचं सदर प्रकाशित होतं. त्यातील निवडक व्यक्तिचित्रणांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकाच्या प्रचार-प्रसारासाठी शनिवार दि. १२ जानेवारी रोजी एक बैठक प्रभुणे यांच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती. प्रभुणे यांच्या परिचयातील आणि ‘विवेक’च्या परिचयातील मान्यवर व्यक्ती या बैठकीला उपस्थित होत्या. खरतर कुठलंही पुस्तक करताना अशा प्रकारची बैठक आयोजित केली जात नाही, मग या पुस्तकात असे काय खास आहे? असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल. ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे आणि ‘विवेक’ दोघांच्याही नावांना समाजात प्रतिष्ठा आहे. त्यामुळे पुस्तकाच्या दोन ते तीन हजार प्रति सहज वितरित होतात. मग ही बैठक का? तर या पुस्तकाच्या माध्यमातून प्रभुणेंनी ज्या व्यक्तिरेखा रेखाटल्या आहेत, त्या घरोघरी पोहोचाव्यात हा या बैठकीमागील मुख्य उद्देश होता. पुस्तकाचं आयुष्य हे अमर्याद असतं. या पुस्तकातून रेखाटलेल्या व्यक्तिरेखा, त्यांनी उभं केलंलं कार्य पुढील पिढीलाही कळावं यासाठी हा सर्व प्रपंच.
 
 
 
व्यक्तिरेखा म्हटलं की, पु. ल. देशपांडे डोळ्यांसमोर येतात आणि त्यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ पुस्तक म्हटलं की ‘अंतुबर्वा’ची व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर उभी राहाते. गिरीश प्रभुणे यांनीदेखील आपल्या लेखणीतून त्याच तोडीची व्यक्तिचित्रणं साकारली आहेत. ‘सामाजिक लिखाण करणारे लेखक’ म्हणून प्रभुणेंची लेखनशैली अनेकांना परिचित आहेच. प्रतिभासंपन्न, मनाला जाऊन भिडणारी, बोलीभाषेवरील प्रभुत्व, सहृदयता आणि सामाजिक कळवळा हे साहित्यिक गुण प्रभुणेंच्या लेखनातून वाचकांना अनुभवता येतात. या पुस्तकातील लेख म्हणजे साहित्यगुणांची खाण म्हणता येतील, असे आहेत. त्यात संघविचारांची बांधिलकी तर आहेच, पण झापडबंदपणा नाही. चौफेर निरीक्षण आहे, त्यामुळे संघाबाहेरील व्यक्तींची अप्रतिम व्यक्तिचित्रे साकार झालेली आहेत. त्यात सुभाष अवचट, रवींद्र शर्मा गुरुजी, देवदत्त दाभोळकर, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. कलबाग, आनंद यादव, पु. भागवत, सुधींद्र कुलकर्णी, धर्मपाल अशी नावं घेता येतील. म्हटलं तर ही मंडळी संघ परिसाचा अनुभव न घेतलेली आहेत, त्यामुळे त्यांची नावं इथे कशाला, असा प्रश्न निर्माण होईल. शेवटी संघ परिस म्हणजे तरी काय? तर निष्काम भावनेने आपले कर्म करीत राहाणे, समाजाच्या उन्नतीची चिंता करणे आणि यासाठी कष्ट करणे. संघ शाखेचा स्पर्श न झालेली, अशी अनेक व्यक्तिमत्त्वे समाजात आहेत. गिरीश प्रभुणेंच्या शोधक नजरेतून ती सुटलेली नाहीत.
 
 
 
संघ, संघ कार्यकर्ते आणि संघ विचार ललित माध्यमातून मांडणारे हे पहिलेच पुस्तक असेल. गुरुदेव सोरदे, प्रभाकर मांडे, नाना नवले, राजश्री काळे, शुभांगी तांबट, विनोद तावडे, भिमराव गस्ती, काका कुकडे, रमेश पतंगे अशा एकूण ४३ व्यक्तिचित्रणांच्या कार्याची माहिती एका आगळ्या-वेगळ्या शैलीतून वाचकांसमोर उलगडणार आहे. ही आगळी-वेगळी शैली नक्की कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी काही लेखांचे उतारे आपल्या समोर मांडते. त्यावरून लेखाची खोली आपल्या लक्षात येईल.
 
 
 
 
Parisacha Sang
 
 
 
*‘सुभाष अवचट, मराठी माणसाला, त्याच्या मनाला एक वेगळी नजर देणारा चित्रकार. मळलेल्या वाटांपेक्षा वेगळ्या वाटेनंही जाता येतं हा अनुभव देणारा वाटाड्या. भारतीय संस्कृती, मराठमोठी साधी माणसं यांचं एक वेगळं दर्शन चित्रातून व्यक्त करणारा चित्रकार. सुभाष अवचटांचा हेवा वाटावा, असा त्यांचा दंतकथात शोभणारा मित्र परिवार... स्मिता पाटील, विनोद खन्ना, रजनीश, ग्रेस, जी. ए या दंतकथेशी माझा मनस्विनीचा जवळून संबंध आला. स्वत: कुठल्याही वर्तुळात न अडकता आपल्या मित्र वर्तुळात मात्र खेचून घेणं.... सुभाष अवचटांच्या पार्टीतल्या गोष्टीची पण हीच गंमत आहे...’
 
 
 
* ‘आमचा बाप आणि आम्ही’नं भाषांची गावकुसं,तर मोडलीच आणि अनेक उच्चांक प्रस्थापित करत मराठी भाषेची ग्वाही दशदिशांना फिरवली... डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विचारात, लेखनात एकाच वेळी बिंदू ते सिंधू हा विचार डोकावतो. अन्य दलित साहित्यकाव्य आजही संघर्षाच्या वेशीत अडकलेले असताना जाधव मात्र या कुसवेशीच्या, जातीपातीच्या, वंशभेदांच्या सीमा रेषा पार करून एका वैश्विक बंधुभावाचा शोध घेताना दिसतात.’
 
 
 
* ‘ती उभीच होती. तिनं डोळे मिटले. हात जोडले.
‘इतनी शक्ती हमे देन दाता
मनका विश्वास कमजोर हो ना...’
हळूवार किनव्या अनुनासिक वैदर्भीय हेलातून आलेला सुजाताचा आवाज अंगावर काटाच उभा राहिला. मन हेलावणार्‍या त्या गीतानं डोळे केव्हा भरून आले कळलंच नाही....ती गेली. तो कार्यकर्ता तिला सोडायला गेला सारे स्तब्ध. अनिल काळे म्हणाले, “अरे एखादं व्हाउचर तयार करून घ्यायचंस. तू अजून तसाच आहेस... बेहिशोबी!” मी हसलो, पण आतून खजील झालो होतो. मी तिची परीक्षा का घेतली? गायला का सांगितलं आणि सुजाताही लगेच कशी गायली? ती जाईल का? एकटी कशी जाईल... तिला यमगरवाडीचे कार्यकर्ते घेतील का? इतकी साधी, सरळ मुलगी कुणी गैरफायदा तर घेणार नाही. मनात शंका कुशंका येऊ लागल्या. सारं काम अळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखं...’
 
 
 
* ‘आमची समस्या जगण्याची हो. कुत्र्याला तरी लोक भाकर तुकडा घालतात. आमच्या नशिबी चतकोर भाकरीसाठी काय काय करावं लागतं. परातभर धान्यासाठी आमच्या करवी मुडदे पाडले जायचे. आमचं करंटपण येवढं की, हे सारं मागच्या जन्मीचं पाप. मग त्ये फेडायला सख्ख्या लेकी देवाला सोडायच्या की... दोनीकडून मरानच की वो...’ अशा अनेक व्यक्तिरेखा यातील काही आपल्या परिचयाच्या असतीलही, पण या पुस्तकातून त्या नव्याने आपल्यासमोर उलगडतील, याची खात्री आहे. यातील अनेक लेखांतून लेखकाच्या हळूवार, संवेदनशील मनाचे दर्शनही आपल्याला घडते, तर काही ठिकाणी परखड मतही व्यक्ती झाली आहेत. पुस्तकातील व्यक्तिरेखांनी केवळ सामाजिक बांधिलकी जपली नाही, तर त्यासोबतच त्यांनी आपआपल्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविला आहे. या सर्व व्यक्तिरेखांना संघपरिसाचा संग लाभल्यामुळे पुस्तकाचं नामकरण ‘परिसांचा संग’ असं करण्यात आलं आहे. या सर्व परिसस्पर्शींची ओळख सर्व समाजाला व्हावी. त्यांच्या कार्याच्या महती सर्वदूर पसरावी, हाच या पुस्तकामागील हेतू आहे. गेल्या ५० वर्षांचा महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक पट अलगदपणे शब्दबद्ध करणारं हे पुस्तक आहे. पुस्तकाची किंमत ३०० रुपये असली तरी, यातील ५०/- रुपये प्रभुणे यांचे जीवनकार्य असणार्‍या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ संस्थेला देणगी देण्यात येणार आहेत. त्यामुळे घरोघरी हे पुस्तक पोहोचेलच, तसेच संस्थेच्या वाटचालीत आपलाही हातभार लागेल.
 
 
- शीतल खोत
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121