मुंबई : “ ‘सरल पोर्टल’ वरील नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर संचमान्यता करण्यात यावी, हे शासनाचे आदेश चुकीचे आहेत. हे आदेश तातडीने मागे घ्यावेत,” अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी नुकतीच शासनाकडे केली आहे.
या आदेशामुळे राज्यातील शेकडो शिक्षक-शिक्षकेत्तर अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेत प्रत्यक्ष असलेल्या विद्यार्थी संख्येवर संचमान्यता करण्याची मागणीही अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री, शिक्षण उपसचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निवेदन पाठविले आहे.
‘सरल पोर्टल’वर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करण्याबाबत गुरुवार, दि. 31 मार्चपर्यंत शाळांना मुदतवाढ दिली असून, दि. 31 मार्च अखेर विद्यार्थी नोंद असलेली विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून 2021-22 ची संचमान्यता करण्याचे आदेश शिक्षण उपसचिवांनी दि. 28 फेब्रुवारी रोजी शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
अनेक विद्यार्थ्यांच्या नावात, आडनावात, जन्मतारखेत दुरुस्ती केल्यावरसुद्धा‘पोर्टल’वर विद्यार्थ्यांची नावे ‘अपडेट’ होत नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी संचमान्यतेमध्ये धरता येणार नाहीत. परिणामी, शिक्षक अतिरिक्त ठरतील. मागील दोन महिन्यांपासून शिक्षकांना या कामासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. नावांची दुरुस्ती, जन्मतारखेत बदल, या दुरुस्त्या करूनही ‘अपडेट’ होत नसल्याने अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी ‘पोर्टल’वर होत नाही.
राज्यात असे हजारो विद्यार्थी असल्याने व संचमान्यतेत हे विद्यार्थी धरले जात नसल्याने याचा गंभीर परिणाम शिक्षक अतिरिक्त ठरण्यावर होऊ शकतो. त्यामुळे या तांत्रिक बाबी लक्षात घेता दुरुस्ती केल्यावरसुद्धा ‘अपडेट’ न होणार्या विद्यार्थ्यांची संख्या संचमान्यतेत ग्राह्य धरण्याचे आदेश निर्गमित करून शिक्षकांवरील होणारा अन्याय तातडीने दूर करावा, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.