पाळीव प्राण्यांसाठीच्या ‘पॉसिबिलिटीज्’चे अग्र‘धूत’

    04-Mar-2022
Total Views | 141

paliv prani
 
 
 
पाळीव प्राणी म्हणजे त्या कुटुंबातील एक सदस्यच! तेव्हा अगदी घरातल्या हक्काच्या माणसाची जशी आपण काळजी घेतो, तशीच पाळीव प्राण्यांची काळजी वाहणारे प्राणिप्रेमीही बहुसंख्य! अशा या प्राणिप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या संगोपनात मदत करणार्‍या ‘पॉसिबिलिटीज्’ या कल्पक अ‍ॅपचे निर्माते आयुष धूत. त्यांच्या स्टार्टअपचा प्रवास आणि नवउद्योजकांना त्यांनी केलेले हे बहुमूल्य मार्गदर्शन...
 
प्रत्येक गोष्टीत व्यवसाय दडलेला असतो, फक्त आपल्याला तो ओळखता आला पाहिजे, असं म्हणतात. पण, व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आपल्याला काय करायचे आहे? कशासाठी करायचे आहे? याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती असणेही तितकेच गरजेचे. जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वप्नांवर, व्यवसायाबद्दल पूर्ण खात्री असेल, विश्वास असेल, तेव्हाच इतर लोकही तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि लोकांनी विश्वास ठेवला, तरच व्यवसाय यशस्वी होतो. म्हणूनच व्यवसाय सुरु करण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन नसते. कुठल्याही वयात आपण व्यवसाय करू शकतो. आपण आत्मविश्वास ठेवला, तर बाकीच्या गोष्टी जुळून यायला वेळ लागत नाही. अशाच एका आगळ्यावेगळ्या स्टार्टअप उद्योजकाची ही कहाणी...
 
 
घरात तशी व्यावसायिक पार्श्वभूमी. आजोबा, वडील असे सगळे कुटुंबच व्यवसायात रंगलेले. बारावी संपून नुकताच इंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेला. अशा वातावरणात खरं तर मुले आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी धडपडत असतात. पण, अशा ऐन उमेदीच्या काळातही स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची, स्वतःच्या आवडीलाच व्यवसायात रूपांतरीत करण्याची किमया साधणारे आयुष धूत. पुण्यातील ‘एमआयटी कॉलेज’मधून शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. ’पॉसिबिलिटीज्’ या नावाने त्यांनी अ‍ॅप सुरू केले. घरातल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, त्यांचे संगोपन करणे याविषयी प्राणिप्रेमींना मार्गदर्शन तसेच, वैद्यकीय सेवा पुरवणारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण अ‍ॅप.
 
 
गेली दोन वर्षे संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे. त्यातले पहिले वर्ष तर जवळ जवळ टाळेबंदीतच गेले. लोकांशी संपर्क तुटलेला, कुठे बाहेर जाणे नाही, फिरणे नाही. त्यामुळे सगळेजण घरातच. असे सतत घरातच राहणे काही काळानंतर आपल्यालाच त्रासदायक वाटू लागले, तर आपल्या घरातील प्राण्यांना किती समस्यांचा सामना करावा लागत असेल? या कळकळीतूनच ‘पॉसिबिलिटीज्’चा जन्म झाला. “मी स्वतः एक प्राणिप्रेमी आहे. माझ्या घरात पण एक कुत्रा पाळलेला आहे. या काळात मला जाणीव झाली की, आपल्याला जसा या काळात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे, तितकाच तो या प्राण्यांनासुद्धा करावा लागत आहे. आपण तर बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो, पण हे प्राणी कसे व्यक्त होतील? त्यांच्या समस्यांवर कोण मार्ग शोधून काढेल? या सर्व गोष्टी मला या काळात जाणवल्या आणि यातून मी या उद्योगाकडे वळलो,” असे धूत ‘पॉसिबिलिटीज्’च्या जन्माबद्दल सांगतात.
 
 
“साधारणतः आपल्याकडे नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करायचा ठरवले, तर पहिल्यांदा घरच्यांचा विरोध असतो. व्यवसायातील अनिश्चितता, जोखीम ही सगळी त्यामागची कारणे. पण, मला शिक्षण घेत असतानाच व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली. घरच्यांनी विश्वास दाखवला, याचे सर्वात मोठे श्रेय माझ्या घरात असलेल्या व्यावसायिक पार्श्वभूमीलाच आहे,” असे धूत अभिमानाने सांगतात.
 
 
स्वतः एक प्राणिप्रेमी असल्याने प्राणिपालन करत असताना ज्याकाही प्रश्नांचा सामना करावा लागतो, ज्या काही समस्या येतात, त्यांची पूर्ण कल्पना धूत यांना आहे. याच प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी ‘पॉसिबिलिटीज्’ हे अ‍ॅप काम करते. स्वतःच्यापाळीव प्राण्यांच्या बाबतीत कराव्या लागणार्‍या सर्व गोष्टींच्या बाबतीत हे अ‍ॅप सेवा पुरवते. या अ‍ॅपमध्ये वेगवेगळ्या सुविधा आहेत. आपल्या पाळीव प्राण्यांसाठी दैनंदिन कराव्या लागणार्‍या कुठल्या गोष्टी आहेत? त्या कशा कराव्यात, याबद्दल हे अ‍ॅप मार्गदर्शन करते. त्यांच्या खाण्याच्या वेळा, फिरण्याच्या वेळा, त्यांना खायला काय द्यायचे? याबद्दलचे ‘रिमाईंडर्स’ लावण्याची सुविधा अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. पाळीव प्राण्यांची औषधे, त्यांना लागणार्‍या वैद्यकीय सुविधा याही या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळवता येतात. तसेच त्यांच्याबद्दल मार्गदर्शनसुद्धा मिळते. आपला जसा ‘पासपोर्ट’ असतो, तसाच प्राण्यांचाही ‘पासपोर्ट’ काढता येण्याची एक नावीन्यपूर्ण सुविधा या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. या ‘पासपोर्ट’मध्ये आपण आपल्या प्राण्यांची संपूर्ण माहिती, त्यांना होणारे आजार, त्यांवरचे उपचार, त्यांचे लसीकरण याबद्दलची सगळी माहिती या ‘पासपोर्ट’मध्ये साठवून ठेवू शकतो. भविष्यात आपल्यासारख्या पाळीव प्राणिप्रेमी लोकांचा, मालकांचा एक समुदाय तयार झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे आणि ‘पॉसिबिलिटीज्’ हे त्यासाठी एक उपयुक्त केंद्र म्हणून काम करेल, असे आपले ध्येय असल्याचे धूत सांगतात.
स्वतः खूप तरुण वयातच व्यवसाय सुरू केला असल्याने प्रवासात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगत धूत म्हणतात की, “पालकांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. कारण, त्यांनीच जर पाल्यावर विश्वास ठेवला नाही, तर इतर लोक तरी कसा विश्वास ठेवणार? मी याबाबतीत खूप सुदैवी ठरलो. कारण, माझे संपूर्ण कुटुंबच व्यवसायात आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांना मी काहीतरी वेगळे करतोय, असे कधी वाटले नाही,” असे धूत आवर्जून नमूद करतात.
 
 
“उद्योग करायचा म्हटला, तर कशाचाही होऊ शकतो, पण आपल्याला ती दृष्टी हवी. कुठलाही व्यवसाय हा समाजासाठी काहीतरी योगदान देणारा असावा. कुठे काय कमी आहे, ते आपण कसे चांगले करू शकतो, याकडे आपले लक्ष असले पाहिजे. आपल्याकडे विचारांची स्पष्टता असेल, तरच हे साध्य होऊ शकते,” असे धूत सांगतात. त्यामुळे मुळात जर व्यवसाय सुरु करायचा असेल, तर ही दृष्टी असणे खूप महत्त्वाचे आहे. याच दृष्टीने आपण जर सगळ्या गोष्टींकडे बघितले, तर आपल्याला नवीन संकल्पना नक्कीच सापडू शकतात. मग प्रश्न येतो की, या संकल्पनेचे व्यवसायात रूपांतर करायचे कसे? त्यासाठी कुठले माध्यम आपण निवडतो, हे महत्त्वाचे आहे? या माध्यमातून खरंच व्यवसाय होऊ शकतो का? याला भविष्य काय असेल? या सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास प्रथम करायला हवा. म्हणूनच धूत म्हणतात की, “अभ्यास असल्याशिवाय उद्योग उभा राहूच शकत नाही आणि आपला अभ्यास परिपूर्ण असला तर भांडवल, जागा या इतर गोष्टींमधून सहज मार्ग निघू शकतो.”
 
 
धूत यांच्यासारखेच बरेच तरुण आज व्यवसायात उतरत आहेत. पण, त्या सगळ्यांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे, विश्वासार्हतेचा! धूत सांगतात की, “माझ्या बाबतीतसुद्धा असे सगळे लगेच साध्य झाले नाही. माझ्या घरात व्यवसायाची पार्श्वभूमी आहे म्हणून लगेच घरच्यांनी विश्वास ठेवला, पैसे दिले, असे काही झाले नाही. मलाही सिद्ध करावे लागले की, माझ्या या संकल्पनेतून व्यवसाय उभा राहू शकतो आणि तो यशस्वीसुद्धा होऊ शकतो. माझ्या भविष्याबद्दलच्या योजना काय आहेत, याबद्दल मला सर्व माहिती घरच्यांना विश्वास बसेल अशा स्वरूपात मांडावी लागली, तेव्हा माझ्या व्यवसायात पैसे गुंतवायला घरचे तयार झाले. माझ्यासारख्या प्रत्येक उद्योजकाने एवढा खोलवर विचार केला पाहिजे. कारण, आता गुंतवणूकदार आहेत. त्यांना नवे-नवे स्टार्टअप्स गुंतवणुकीसाठी हवे आहेत. तेव्हा सध्या खूप संधी आहेत. फक्त आपण संधी लायक बनण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे,” असे या बदललेल्या काळाबद्दल धूत सांगतात.
 
 -हर्षद वैद्य
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121