साधारणतः ३० वर्षांपूर्वी रशिया आणि अमेरिकेने सुरक्षेची हमी दिल्याने सोव्हिएत संघातून बाहेर पडलेल्या अनेक देशांनी अण्वस्त्रांचा त्याग केला. त्यात गेल्याच आठवड्यात रशियाने हल्ला केलेल्या युक्रेनचाही समावेश होतो. त्यातूनच सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ३० वर्षांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या माध्यमातून संपूर्ण जगाला अण्वस्त्रांची महत्ता पटवून दिल्याचे दिसते. दुसर्या महायुद्धादरम्यान अमेरिकेनेदेखील न झुकणार्या जपानवर अणुबॉम्ब टाकून अण्वस्त्रांचे महत्त्व दाखवून दिले होते. तात्पर्य हेच की, शक्तीच शांततेचा स्रोत आहे. पण, जर युक्रेनने अण्वस्त्रांचा त्याग केला नसता, तर काय झाले असते? रशियाने युक्रेनवर हल्ला केला असता का? तर नाहीच. पण, आता रशिया युक्रेनसह पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघातील सर्वच देशांवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवू इच्छितो वा त्यांचा आपल्यात समावेश करून सोव्हिएत संघासारखीच रचना आकाराला आणू इच्छितो. अन् हे देश रशिया वा अमेरिकेपासूनही स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. कारण, त्यांच्याकडे अण्वस्त्रे नाहीत. पारंपरिक युद्धात हे देश अमेरिका वा रशियासमोर अजिबात टिकू शकत नाहीत. परिणामी, आता या देशांची असाहाय्य अवस्था झाली असून, त्यांच्या मनात आपल्याला फसवले गेल्याची भावना दाटली आहे. कारण, त्यांनी शांततेच्या नावाखाली अण्वस्त्रांचा त्याग केला. त्यावरून ज्या देशांकडे अण्वस्त्रे नाहीत त्यांना अण्वस्त्रसंपन्न शेजारी देश गिळंकृत करतील, हाच धडा घ्यावा लागेल.
दरम्यान, भारतीय नेतृत्वाने मात्र जगभरातील देशांचा दबाव आणि धमक्या झुगारुन देत अणुपरीक्षणाचा, अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम राबवला. याच कारणांमुळे पाकिस्तान आणि चीनसारख्या दोन्ही आघाड्यांवर सुरक्षाविषयक आव्हाने असूनही भारत आज ताठ मानेने उभा आहे. अण्वस्त्रसंपन्नतेमुळे भारताची अवस्था युक्रेनसारखी कधीही होऊ शकत नाही. जगातील अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र वा अण्वस्त्रप्राप्तीसाठी धडपडणार्या राष्ट्रांकडे पाहिल्यास जिथे जिथे अण्वस्त्रशक्तीमध्ये असंतुलन वा अनुपस्थिती आहे, तिथे तिथे अराजकता, असुरक्षितता वा युद्ध सुरू असल्याचे दिसते. उदाहरणार्थ, उत्तर कोरिया. हुकूमशहा किम जोंग उनचा देश म्हणजेच उत्तर कोरिया अण्वस्त्रसंपन्न आहे. पण, त्यामुळे शेजारचा दक्षिण कोरिया नेहमीच स्वतःलाअसुरक्षित समजतो. कोरिया द्विपकल्प परिसरात अण्वस्त्रशक्तीतील असंतुलनामुळे कायम अशांततेचे वातावरण दिसते. असाच प्रकार इराणबाबतही सुरू असल्याचे दिसते. इराणची सीमा पाकिस्तानला भिडलेली आहे. पाकिस्तान भारतात घुसखोर, दहशतवाद्यांच्या माध्यमातून हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण, भारत अण्वस्त्रसंपन्न असल्याने पाकिस्तानची थेट हल्ला करण्याची हिंमत होत नाही. तथापि, इराणबद्दल तसे नाही, म्हणूनच पाकिस्तान सदान्कदा इराणच्या सीमेचे उल्लंघन करत असतो. त्यावरून त्याचे इराणशी सातत्याने भांडणही होताना दिसते. आता इराणदेखील अण्वस्त्र मिळवण्यासाठी झगडत आहे. पण, त्यात तो अजून यशस्वी झालेला दिसत नाही. आणखी एक मुद्दा म्हणजे, अण्वस्त्रसंपन्न असल्यानेच चीनदेखील भारतावर दादागिरी करू शकत नाही. पण, चीनने गेल्या काही काळापासून दक्षिण चीन समुद्रातील छोट्या-मोठ्या देशांना त्रस्त केल्याचे, तिथे अशांतता निर्माण केल्याचे दिसते. कारण, आपण अण्वस्त्रसंपन्न आहोत आणि पुढचा देश आपले काहीही करू शकणार नाही, असे चीनला वाटते.
गेल्या काही काळापासून तर अण्वस्त्रहल्ल्यांचा प्रत्यक्ष सामना केलेला जपानही अण्वस्त्रसंपन्न होण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसतो. कारण, शीतयुद्ध व सोव्हिएत संघाच्या विघटनानंतरची अमेरिकेच्या प्रभुत्वाची तीन दशके संपलेली आहेत. जग पुन्हा एकदा अस्थैर्याचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत अण्वस्त्रांच्या माध्यमातून स्वसंरक्षणसाठी सिद्ध झाले, ‘आत्मनिर्भर’ झालो, तरच देशाला स्थैर्य लाभू शकेल, देशाच्या आर्थिक विकास आणि शक्तीसंपन्नतेला मदत मिळेल, असे देशादेशांना वाटते. ज्या देशांकडे अण्वस्त्रे नाहीत आणि तुलनात्मकदृष्ट्या शक्तीशाली अण्वस्त्रसंपन्न शेजारी देशांशी चांगले संबंध नाहीत, ते देश आज धोक्यात आलेले आहेत. शांततेच्या नावाखाली स्वतःच्या अण्वस्त्रांचा त्याग करणारा युक्रेन त्याचे जीवंत उदाहरण आहे. म्हणूनच भारताने अण्वस्त्र कार्यक्रम तर राबवलाच, पण त्यानंतर कोणाच्याही दबावाखाली अण्वस्त्रप्रसार बंदीविषयक जाचक कायद्यांवर स्वाक्षरी केलेली नाही, ते योग्यच म्हणावे लागेल.