गुणग्राहकता हा असा गुण आहे की, ज्यामुळे दुसर्या व्यक्तीतील चांगल्या गुणांची पारख करता येते. सर्वसाधारणपणे सामान्य माणूस स्वार्थी असल्याने तो फक्त स्वत:पुरते पाहतो. त्याचप्रमाणे काही अहंभावी माणसे स्वत:चेच कौतुक करण्यात धन्यता मानतात. दुसर्यांच्या ठिकाणीही असलेले चांगले गुण पाहण्याची त्यांना दाद देण्याची मानसिकता गुणग्राहकतेतून तयार होते. तथापि काही माणसे अशीही असतात की, ते इतरांच्या ठिकाणी गुण असो वा नसो, उगीचच त्यांची स्तुती करीत असतात. अशा अकारण स्तुती करणार्या नराला समर्थांनी ‘पढतमूर्ख’ म्हटले आहे, हे आपण यापूर्वीच्या लेखातून पाहिले आहे. यासाठी माणसाने नेहमी सत्य काय आणि मिथ्या काय, याचा विचार करून बोलावे, वागावे हे श्रेयस्कर, सत्य आणि मिथ्या यांची समज आल्यावर माणसाने आपल्या वाणींकडे लक्ष द्यावे.
वाणीसंबंधी आचार्य विनोबा भावे म्हणतात की, “वाणी ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी शक्ती आहे. तिचा योग्य उपयोग झाला, तर ती मनुष्याच्या उन्नतीचे साधन बनू शकते.” यावरून हे लक्षात येते की, वाणी ही ईश्वरदत्त आहे. तथापि, शब्द आणि भाषा या मानवनिर्मित आहेत. सत्य, निर्भयता, प्रेम, वात्सल्य या प्रकाराचे अनेक गुण वाणीतून आपल्याकडे आलेले असतात. नंतर ते भाषेतून, आचरणातून प्रकट होतात. भाषा आणि शब्द हे मानवनिर्मित असल्याने आपण त्याचा जपून वापर केला पाहिजे. भाषेचा संयमित वापर करणार्याला सत्य आपल्या भाषेत आणता येते. कोणताही विचार अथवा कोणतीही भावना प्रथम मनात आणि वाणीत येतात. मग ते भाषेत उतरतात. यासाठी दुसर्याची निंदानालस्ती, द्वेष, मत्सर इत्यादी अवगुणांनी आपण आपली वाणी भ्रष्ट करू नये, अन्यथा तेच आपल्या शब्दांतून भाषेतून प्रकट झाल्यास आश्चर्य करण्याचे कारण नाही. आपण मनात नेहमी दुसर्यांविषयी हितकारी, कल्याणकारी विचार बाळगले, तर भाषेचे मृदुत्व साधते. क्वचितप्रसंगी कठोर शब्द आपल्या मुखातून बाहेर पडले, तरी त्यामागील हेतू हितकारी असल्याने त्यांचा वाणीवर परिणाम होत नाही.
वाईट, अभद्र शब्दांच्या उच्चारणाने सभोवतालचे वातावरण दूषित होते. तसेच, चांगल्या मंगलमय विचाराने भाषेने सभोवतालचे वातावरण आनंदी प्रसन्न होते. हा अनेकांचा अनुभव आहे. आचार्य विनोबा भावे यांनी याला ‘शब्दशक्ती’ हे नाव दिले आहे. हे शब्दांतील भाषेतील सामर्थ्य स्वामींनी जाणले होते. स्वामींना शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी सुजाण समाज घडवायचा होता. म्हणून स्वामी मनाच्या श्लोकांतून सत्य बोलण्याचा आग्रह धरतात. ‘मना सर्वथा सत्य सोडू नको रे’ ही त्यांची भूमिका आहे. यापूर्वी १९व्या श्लोकात नेहमी आपल्या तोंडून सत्याचा शब्द निघावा आणि खोट्याला थारा देऊ नये, असे विचार मांडले आहेत. तत्पूर्वीच्या काही श्लोकांतून समर्थांनी मृत्यूचे सामर्थ्य, त्याची अटळता, पूर्वकर्मानुसार भोगावी लागणारी दु:खे, अकस्मात येणारे प्रसंग, नियतीच्या अधीन असणारे मानवी जीवन, सुखदु:खे यांचा ऊहापोह केला आहे.
त्यावेळी जन्मदु:ख सांगायचे राहून गेले असे स्वामींनी पुढील श्लोक ‘जन्म-दु:ख’ सांगणारा लिहिला असावा. स्वामींनी ‘जन्म-दु:ख’ हा विषय दासबोधात विस्ताराने मांडला आहे. त्यासाठी स्वतंत्र समासच समर्थांनी खर्ची घातला आहे. समासाच्या सुरुवातीसच ’जन्म दु:खाचा अंकुर’ असे सांगून जन्मापूर्वीचे व नंतरचे मानवी दु:ख सांगायला सुरुवात केली आहे. स्वामींनी तेथे असा विचार मांडला आहे की, दु:खाची सुरुवात जीवाच्या जन्मापासून नव्हे, तर जीव आईच्या गर्भात असल्यापासून होते. आईच्या गर्भात असताना जीवाचे हाल झालेले असतात.
जीवाने गर्भवास्तव्यात भोगलेल्या हालअपेष्टांची वर्णने सर्व संतांनी करून ठेवलेली आहेत. पुन्हा जन्ममरणाच्या यातना नकोत असे त्यांचे परमेश्वराला मागणे आहे. दासबोधातील ‘दशक तीन समास एक’मध्ये स्वामींनी गर्भातील जीवाची जडणघडण व त्याचे होणारे हाल, शरीराच्या हालअपेष्टा यांचे किळसवाणे वर्णन केलेले आहे. ते वाचून कुणालाही जीवाच्या गर्भातील अवस्थेची घृणा यावी व हे माझ्या वाट्याला नको, असे माणसाला वाटावे. जीव आईच्या गर्भात सुरुवातीच्या काळात द्रवरुप अवस्थेत असतो. पुढे त्याचे रुप पालटून त्याचा मांसल गोळा बनतो. नंतर त्याला त्वचा, अस्थी, इंद्रिये यांचा आधार मिळतो. पाठीचा कणा तयार होतो. कवटी, मेंदू, हृदय हळूहळू आकाराला येऊ लागतात. तथापि हा जीव गर्भाच्या अंध:कारमय कोठडीत कसेतरी दिवस काढीत असतो. त्या जीवाचे जीवन परावलंबी असते. त्याला सर्वस्वी आईच्या अन्नरसावर प्राणवायूवर जगावे लागते. या स्थितीचे जीवाचे जे हाल होतात, ते स्वामींनी पुढील श्लोकात थोडक्यात मांडले आहेत.
बहू हिंपुटी होईजे मायपोटीं।
नको रे मना यातना तेचि मोठी।
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं ।
अधोमुख रे दुःख त्या बाळकासी॥
शरीरशास्त्राचा अभ्यास करणार्यांना माहीत असते की, गर्भातील बालकाची अवस्था डोके खाली असून हातपाय पोटाजवळ आवळलेले असतात. आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे सोनोग्राफीत ही अवस्था आपण प्रत्यक्षात पाहू शकतो. पण, ३५०-४०० वर्षांपूर्वी समर्थांनी अधोमुख, अशी बालकाची गर्भातील अवस्था कशी ओळखली असेल, हे नवल आहे. आईच्या पोटातील गर्भाची ही कष्टदायक अवस्था आणि त्या यातना कशा असतात, हे शब्दांनी सांगता येत नाही.
परमात्मतत्त्वाचा विसर पडल्याने राहिलेले कर्मयोग भोगण्यासाठी जीवाला दृश्य जगतात येऊन या जगताचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे जीव जन्माला येतो, असे वेदांत सांगितले आहे. कर्मसाठा जीवाला स्वस्थ बसू देत नाही. जन्म हे कुविद्येचे म्हणजे अज्ञानाचे फळ आहे, असे दासबोधात म्हटले आहे. परमेश्वराची आठवण न राहिलेल्याने कर्मभोगाच्या इच्छेने हा जीव आईच्या गर्भात ऩऊ महिने खितपत पडलेला असतो. गर्भातील अंधार्या कारागृहातील २८० दिवसांची शिक्षा भोगल्यावर आपली मूळ आनंदाची स्थिती मिळविण्यासाठी जीव धडपड करीत जन्माला येऊन या दृश्य जगतात मिसळतो आणि मागील गर्भवासातील दुःख विसरून पुन्हा कर्मभोगाच्या दिशेने आपला प्रवास सुरू करतो. यासाठी संत आपल्याला जन्मदुःखांची आणि आपल्या मूळ आनंदमय अवस्थेची सतत वेगवेगळ्या प्रकारांनी, दृष्टान्तांनी जाणीव करून देत असतात. म्हणून अशा संतांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. संताचा महिमा वर्णन करताना समर्थ सांगतात-
ऐसीं संतांची महिमां।
बोलिजे तितुकी उणी उपमा।
जयांचेनि मुख्य परमात्मा।
प्रगट होये ॥ (दा. १.५.२६)
हे संतच आपली आणि राघवाची, परमात्माची भेट घडवून आणत असतात. म्हणून स्वामींनी पुढील मनाच्या श्लोेकात मनाला सुचवले आहे की, सर्व वासना कामना सोडून देऊन प्रपंचातील येरझरा थांबवून तू राघवाच्या भेटीची इच्छा कर. मन दृश्य आणि अदृश्य दोन्हीकडे काम करीत असल्याने हे मना, तूच राघवाची भेट घडव, असे समर्थांनी म्हटले आहे. तो भाग पुढील लेखात
- सुरेश जाखडी