३१ मार्च हा International Transgender Day of Visibility. आजच्या दिवशी जगभरातील तृतीयपंथीयांवर होणाऱ्या भेदभावाबद्दल आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. ३१ मार्च २००९ रोजी पहिल्यांदा अमेरिकेत हा दिवस साजरा करण्यात आला आणि त्यानंतर २०१४ पासून संपूर्ण जगात हा दिवस साजरा करण्यात येतो. समाजाने आखलेल्या एका विशिष्ट चौकटीतून बाहेर येत काहीतरी करण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी ही एक छोटीशी गोष्ट....
"तृतीयपंथी" हा आपल्या समाजातील असा एक अविभाज्य घटक आहे ज्यांच्याकडे समाजाने सोयीस्कररीत्या केवळ दुर्लक्षच केले आहे. त्यांच्याकडे पाहायचा एक वेगळाच दृष्टिकोन लोकांनी बनवला होता. त्यामुळे त्यांनादेखील एका विशिष्ट चौकटीत राहूनच जगावं लागत होत. LGBTQ ही संकल्पना जितकी इतर देशांनी मोकळ्या मनाने स्वीकारली तितकी अद्यापही भारतात स्वीकारलेली नाही. त्यामुळे आत्ताही या घटकाला पावलोपावली संघर्ष करावा लागत आहे. पण हळूहळू का होईना बदल घडत आहे...
अशा अनेक तृतीयपंथींचा आदर्श आपल्यापुढे आहे ज्यांनी समाजाने आखलेल्या चौकटीतून बाहेर पडत आपले असे एक वेगळे स्थान निर्माण केले. जीवनातील अनेक संघर्षांना तोंड देत यशाच्या दिशेने वाटचाल केली आहे. असाच एक आदर्श आपल्यापुढे उभा केला आहे "बम्बई नजरिया" या हॉटेलने. एक सकारात्मक वातावरण असलेलं आणि आपलयाला एक "रेट्रो" फील देणारं असं हे हॉटेल. अंधेरीतील वर्सोवा परिसरात असलेलं हे हॉटेल पूर्णतः तृतीयपंथींकडून चालवण्यात येते. येथील जेवण बनवण्यापासून ते हॉटेलमध्ये ग्राहकांना सुविधा पुरवण्यापर्यंत सर्वकाही येथील तृतीयपंथी कर्मचाऱ्यांकडूनच करण्यात येते.
डिएगो मिरांडा आणि ग्लेन्स दिसा या दोघांनी हे हॉटेल सुरु केले आहे. तृतीयपंथींसाठी आपण काहीतरी करावं आणि त्यांना रोजगार निर्माण करून द्यावा अशी डिएगो मिरांडा यांच्या वडिलांची इच्छा होती. म्हणूनच डिएगो मिरांडा यांनी ग्लेन्स दिसा यांच्यासोबत मिळून या हॉटेलची स्थापना केली. येथे सध्या माही पुजारी, सुन्या जाधव आणि अक्षरा भागणे हे तीन तृतीयपंथी कर्मचारी काम करत असून येथील सर्व कामे ते अगदी आपलेपणाने करतात. येथे आलेल्या कोणत्याही ग्राहकाला किंवा खवयाला अगदी घरच्यासारखंच वाटावं अगदी असेच वातावरण येथील आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांची खबरदारी घ्यावी अशीच खबरदारी येथील प्रत्येक व्यक्ती घेतो.
हॉटेलमधील एका फ्रेमवर नजरिया बदलो, नजारा बदलेगा (तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला म्हणजे तुमची धारणा बदलेल) असे लिहिले आहे. तर दुसऱ्या फ्रेमवर देखो मगर प्यार से. हॉटेलमधील सजावटीतून एक सामाजिक संदेश देण्याचाही संपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. हॉटेलच्या फ्लोअरिंग वर पसरवण्यात आलेले पांढरे खडे हॉटेलचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. हॉटेलमध्ये बॉक्स टीव्ही सेट आणि शिवणकामाच्या मशीनसह, पूर्वीचा ग्रामोफोन यासारखी एक रेट्रो सजावट मनाला मोहून टाकते. हॉटेलमध्ये एक मिनी लायब्ररी देखील तयार केली आहे. येथील खाद्यपदार्थ देखील सध्या चर्चेत असून यांमध्ये गुलाबी चाय, चीज क्रोइसंट आणि चिकन पेपरोनी यांचा समावेश आहे. पावभाजी, खिमा पाव आणि मिसळ पाव यासारखे मुंबईचे वैशिष्ट्य असणारे पदार्थही आपल्याला येथे चाखण्यास मिळतात.
"त्यांच्याकडील लँब बर्गर हा एक आपण सर्वांनी चाखण्यासारखा पदार्थ असून हॉटेलचे सर्वच कर्मचारी अत्यंत प्रेमाने सर्वांसोबत वागतात. पण त्यांपैकी अक्षरा भागणे नेहमीच सर्वांचे खूप प्रेमळ स्वागत करते. तसेच या हॉटेलने तृतीयपंथींसाठी एक सुरक्षित जागा स्थापन करण्याच्या दिशेने आणि त्यांना एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे," असे मत तेथील एका ग्राहकाने व्यक्त केले आहे.
मुंबईतील तृतीयपंथी कर्मचारी असलेलं हे पाहिलंच हॉटेल असून अगदी सहज आपलंस करून घेणाची कला त्यांना अवगत आहे. एवढंच नाही तर काश्मीरचे वैशिष्ट्य असणारी "पिंक चाय" ही देखील संपूर्ण मुंबईत फक्त येथेच आपल्याला चाखण्यास मिळते. आपल्या आवडीचं काम करण्यास मिळत असल्यामुळे माही पुजारी, सुन्या जाधव आणि अक्षरा भागणे यांच्या चेहऱ्यावरही एक समाधान आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. आपल्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेलं हे त्यांचं पहिलं पाऊल समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक आदर्श आहे. तसेच "नजरिया बदलो, नजारा बदलेगा" या त्यांच्या ब्रिदवाक्यानुसार समाजातील इतर लोकांनी देखील डिएगो मिरांडा आणि ग्लेन्स दिसा यांसारखे पुढे येत आपला दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे.