मिनारीतल्या मंदिरांचा आक्रोशमध्ययुगीन काळात धर्मांध इस्लामी आक्रमणांनी भारतातील अनेक हिंदू धर्मस्थळांचा विध्वंस केला. दिल्लीतील कुतुबमिनारदेखील हिंदू मंदिराची मोडतोड करून उभारल्याचा दावा केला जातो. आता येथील २७ हिंदू व जैन मंदिरांच्या पुनर्स्थापनेसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर लवकरच सुनावणी होईल. त्यानिमित्ताने मिनारीतल्या मंदिरांचा आक्रोश मांडणारा हा लेख...
ज्ञात पाच हजार वर्षांपेक्षाही अधिक काळापासून भारतात नांदणार्या हिंदू धर्मावर, हिंदू संस्कृतीवर परकीय आक्रमकांनी वेळोवेळी हल्ले केले. त्यातले हुनांसारखे आक्रमक कालांतराने हिंदू धर्म-संस्कृतीत मिसळून गेले. पण, इसवी सनाच्या सातव्या शतकापासून भारतावर आदळलेल्या इस्लामी आक्रमकांनी हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीलाच नेस्तनाबूत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मोहम्मद बिन कासीमपासून, महमूद गझनी, मोहम्मद घोरी आणि बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेबासारख्या मुघलांपर्यंत सार्याच मुस्लीम हल्लेखोरांनी तलवारीच्या जोरावर इस्लामचा प्रसार आणि हिंदूंवर अत्याचार, धर्मांतराचे सत्र चालवले. इस्लामी आक्रमणाने लाखो हिंदूंची धर्मांतरे केली, लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या, त्याचबरोबर भारतातील लाखो मंदिरांचा विध्वंस केला, त्या जागी मशिदी, दर्गे, मकबरे बांधले. पण, देशाच्या स्वातंत्र्यापासूनच भारतातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक-अभ्यासक्रमविषयक संस्थांमध्ये काँग्रेसच्या कृपेने ठाण मांडून बसलेल्या डाव्या तथाकथित बुद्धिजीवी, विचारवंत इतिहासकारांनी मुस्लीम आक्रमणाचा त्यांना हवा तसा इतिहास समोर आणला. परिणामी, इस्लामी आक्रमकांच्या हिंदूंवरील इतिहासकालीन अनन्वित अत्याचाराच्या घटना वर्तमानकालीन भारतीय जनतेपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचल्याच नाहीत. तथापि, एखादी गोष्ट ठरावीक काळापर्यंत दडपता येऊ शकते. पण, तो काळ गेला की, मात्र ती अधिक ठळकपणे दिसू लागते. तसाच प्रकार आता दिल्लीतील कुतुबमिनार परिसराबाबत होत असल्याचे दिसते.
न्यायालयात याचिका
कुतुबमिनार परिसराचे बांधकाम हिंदू आणि जैन मंदिरांना तोडून करण्यात आल्याची चर्चा, तर कित्येक वर्षांपासून होत आहे. पण, त्या चर्चेचे आता कायदेशीर लढाईत रुपांतर झाले असून, त्यासंबंधीची याचिकाच मेहरौली न्यायालयाने स्वीकारली आहे. जैन देवता तीर्थंकर भगवान ऋषभ देव, भगवान विष्णू आणि अन्य लोकांच्यावतीने हरी शंकर जैन, रंजना अग्निहोत्री आणि जितेंद्र सिंह विवाहन यांच्या माध्यमातून मेहरौली न्यायालयात नुकतीच एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात कुतुबमिनार परिसरात हिंदू व जैनांच्या २७ मंदिरांच्या पुनर्स्थापनेची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी अॅड. विष्णू शंकर जैन आणि अॅड. अमिता सचदेव यांनी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर बाजू मांडली. त्यावरून जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा तलवार यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, दिल्ली सर्कल आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच, या प्रकरणाची सुनावणी येत्या दि. ११ मेपर्यंत स्थगित केली असून, त्यानंतर पुढील सुनावणी होईल.
दरम्यान, कुतुबमिनार परिसरातील हिंदू व जैन मंदिरांच्या पुनर्स्थापनेसाठी वा पूजा अधिकारासाठी हिंदू धर्मीय कित्येक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. त्याच मालिकेंतर्गत गेल्या वर्षी दि. २९ नोव्हेंबरला दिवाणी न्यायालयात भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला संरक्षित करण्यासाठी, भारतीय राज्यघटनेतील ‘कलम २५’ आणि ‘२६’ ने दिलेल्या धर्माच्या अधिकाराचा उपयोग करण्यासाठी कुतुबमिनार परिसरातील २७ हिंदू व जैन मंदिरांतील देवतांना पुनर्स्थापनेच्या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. पण, ती फेटाळली गेली. “भूतकाळातील अनेक कामे चुकीची असल्याचे कोणीही नाकारत नाही. पण, याप्रकारच्या चुका आपल्या वर्तमान आणि भविष्यातील शांततेला बाधा पोहोचवण्यासाठीचा आधार होऊ शकत नाहीत,” असे म्हणत दिवाणी न्यायाधीश नेहा शर्मा यांनी संबंधित याचिका स्विकारण्यास वा त्यावर सुनावणीस नकार दिला होता.
ध्रुवस्तंभ
दरम्यान, १२व्या शतकात मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केले. त्यावेळी त्याच्या सैन्याचा सेनापती होता कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबकानेच भारतात गुलाम वंशाच्या सत्तेची स्थापना केली आणि भारतावरील आक्रमणावेळी कुतुबुद्दीन ऐबकानेच २७ हिंदू व जैन मंदिरांच्या विध्वंसाचे आदेश दिले होते. त्यानुसार धर्मांध इस्लामी सैन्याने तसे केलेही, मंदिरांना छिन्नविछिन्न केले. पुढे याच परिसरात ‘कुव्वत-उल-इस्लाम’ नावाने मशिदीची उभारणी केली गेली. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत पुरातत्त्व विभागाच्या हवाल्याने वरील माहितीदेखील देण्यात आली होती. ‘विश्वस्त कायदा, १८८२’ नुसार, केंद्र सरकारला विश्वस्त समितीची निर्मिती करण्यासाठी निर्देशाचा आदेश जारी करण्याची मागणी या याचिकेत केलेली होती. तसेच, एक योजना तयार करुन मेहरौलीमध्ये कुतुबमिनार परिसरातील मंदिरांच्या व्यवस्थापनाची मागणी केलेली होती.
दरम्यान, गेल्या वर्षीच दिल्लीच्या साकेत न्यायालयात भगवान विष्णू आणि भगवान ऋषभ देव यांच्यावतीने ध्रुवस्तंभाचे (सध्याची ओळख कुतुबमिनार) मूळ स्वरुप पुनर्स्थापित करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. एकूणच हिंदूधर्मीय इस्लामी आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली आपल्या धार्मिक स्थळांची ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयीन लढाईचा घटनात्मक मार्ग अनुसरत असल्याचे यातून दिसून येते. त्यावर येत्या काळात सुनावणी होऊ शकते, अर्थात भारतीय न्यायिक प्रक्रिया संथ गतीने काम करते, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे कोणतेही प्रकरण तडीस जाण्यास बराच वेळ लागतो, तसा तो कुतुबमिनार परिसर व तेथील २७ हिंदू-जैन मंदिरांच्या प्रकरणातही लागू शकतो.
कुतुबमिनारचे हिंदूपण
कुतुबमिनार परिसरातील कुव्वत-उल-इस्लाम मशिद कमी आणि हिंदू मंदिर अधिक दिसते. मशिदीच्या प्रत्येक खांबावर, भिंतींवर मूर्ती आणि मूर्तीच कोरलेल्या आहेत. कुठे हिंदू धर्मातील देवी-देवतांच्या मूर्ती, तर कुठे जैन. मात्र, या सगळ्याच मूर्ती भग्न, खंडित केलेल्या आहेत. त्या अर्थातच तत्कालीन इस्लामी आक्रमकांनीच तोडलेल्या आहेत. मशिदीच्या मागच्या भागातील नालीच्या वर गणपतीची मूर्ती आहे. पण, त्यावरुन गेल्या काळात वादही उद्भवला होता. नंतर पुरातत्व विभागने गणपतीची मूर्ती लोखंडी जाळीने झाकली. कुतुबमिनारच्या जवळच एक लहानशी चौकटही मोडतोड झालेल्या अवस्थेत आहे, त्यावरही पाषाणात कोरलेली मूर्ती आहे, तर राजा अनंगपाल यांनी विष्णू पर्वतावरून विविध धातूंनी तयार केलेला विष्णू स्तंभ इथे आणला होता, तोदेखील या परिसरात आहे. या स्तंभावर गुप्तकालीन संस्कृतमध्ये शिलालेख कोरलेला आहे. त्याचा कालावधी चौथ्या शतकाचा असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
कुतुबमिनार वा कुव्वत-उल-इस्लाम परिसरातील वस्तुस्थितीवरून ही रचना इस्लामी नव्हे, तर हिंदू रचना असल्याचे स्पष्ट होते. आपली हिंदू ओळख इथल्या बांधकामाचे अनेकानेक खांब, भिंती आजही आक्रोशून सांगत आहेत. तसेही इस्लामी रचनेत हिंदू वा जैन देवी-देवतांच्या मूर्ती कशा या साध्या प्रश्नावरून, त्याच्या उत्तरावरूनही त्यांचे सत्य तत्काळ समजते. त्यामुळेच वर्षानुवर्षांपासून हिंदू धर्मीय इथे पूजा-अर्चना करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करत आहेत. जेणेकरुन, या परिसराचा मूळ भाव पुन्हा प्रकट होईल. मेहरौली न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका त्याचसाठी आहे. त्यावर योग्य ती सुनावणी होऊन, पुराव्यांची तपासणी होऊन निकाल लागल्यास नक्कीच भग्न आणि खंडित मूर्ती पाहून विदीर्ण होणार्या हिंदूंना आनंदच होईल.