मुंबई : “मुंबई पालिकेने बांधलेल्या देवनार रस्त्याचे उद्घाटन सहा महिन्यांपूर्वी झाले असताना या कामाच्या खर्चात तब्बल १३० कोटी रुपयांचा फेरफार कशासाठी झाला आहे,” असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बुधवार, दि. २ मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेत केला. तिसर्यांदा फेरफार झाला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अद्याप पुलाचे नामकरण नाही
देवनारकडे जाणार्या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी आहे, कोणत्याही ट्रकना तसेच, दुचाकींनाही जाऊ देत नाहीत, पुलावरील पृष्ठाभाग खडबडीत आहे, त्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही. गेल्या सात महिन्यांपासून मी याचा पाठपुरावा करत असतानाही अद्याप या पुलाचे नामकरण झाले नाही, यालाही शिंदे यांनी यावेळी आक्षेप घेतला. “आपण सत्ताधारी आहात. महाराजांचे नाव देण्याकरीता महापौर आपल्या शब्दाबाहेर नाहीत,” असा टोला शिंदे यांनी लगावला.
“या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्वरित द्या, अशी मागणी करून या कामाच्या खर्चात तिसर्यांदा झालेल्या कोट्यवधी रुपयांचा फेरफार मंजूर न करता, प्रस्तावही संमत करू नये,” अशी मागणी काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी केली. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी पूलावरील होणार्या अपघातामुळे हा प्रस्ताव मंजूर करु नका, अशी मागणी केली.
फेरफार तांत्रिक असून, तो ‘जीएसटी’संबंधी
यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सभागृहाला माहिती दिली की, “या पुलाच्या कामांचा कार्यादेश २०१७ पासून दिला होता. पुलाच्या कामाचा दर्जा सुधारून, पादचारी पुलाचीही सुधारणा झाली आहे, पुलाच्या कामात असलेल्या त्रुटी सुधारल्या आहेत. हा फेरफार तांत्रिक असून, तो ‘जीएसटी’संबंधी आहे. या कामांवर लागू केलेला ‘जीएसटी’ राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत जाणार आहे. कंत्राटदाराने ‘जीएसटी’ भरला आहे,” असे कळल्यानंतर ‘जीएसटी’ आयुक्तांशी संपर्क साधून तो परत मागण्यात येईल.