"पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा"

भाजप आमदार निरंजन डावखरे यांची मागणी

    29-Mar-2022
Total Views |

Niranjan Davkhare 
 
 
 
 
ठाणे : "राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट' कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.", अशी मागणी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी (दि.२९ मार्च) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. "मविआ सरकारने अलीकडेच सीएनजीवरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे, हे दुर्दैवी आहे. गेली दीड वर्षे पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे. मात्र या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.", असे आमदार निरंजन डावखरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 
 
  
"केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ व १० रुपयांची कपात केली. त्यापाठोपाठ भाजप सत्ता असलेल्या राज्यांसह एकूण २५ राज्य सरकारांनी पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला दिलासा दिला. मात्र, महाराष्ट्राने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अजूनही कमी केलेला नाही. पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासही महाराष्ट्राने विरोध केला आहे. आता तरी आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कमी करावा आणि जनतेला दिलासा द्यावा.", असेही त्यांनी यात नमूद केले आहे.