पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून असून पुढील काही दिवसांत नेमके पाकिस्तानमधील इमरान सरकार कोसळणार की, कुठल्या चमत्काराने इमरान यांची खुर्ची वाचवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने पाकिस्तानातील राजकीय उलथापालथी आणि शक्याशक्यतांचा आढावा घेणारा हा लेख...
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावर तेथील संसदेत विरोधी पक्षांकडून अविश्वासाचा ठराव आणला गेला आहे. तो अविश्वासाचा ठराव तेथील संसदेत मंजूर होऊन इमरान खान यांना त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावयास लागेल का, यावर पाकिस्तानमधील माध्यमांमध्ये जोरदार चर्वितचर्वण चालू असल्याचे दिसून येत आहे. दि. २८ मार्च किंवा तत्पूर्वी या अविश्वास ठरावावर पाकिस्तानमधील संसदेत मतदान होणे अपेक्षित आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पाकिस्तानचे लष्कर यांच्या मर्जीतील पंतप्रधानच पाकिस्तानमध्ये कारभार करू शकतो, हे एक उघड सत्य आहे. पाकिस्तानच्या लष्कराला 'एस्टॅब्लिशमेंट' अथवा 'रावळपिंडी' या नावाने संबोधले जाते. या 'एस्टॅब्लिशमेंट'ची खप्पामर्जी झाली की, पाकिस्तानच्या सरकारचे दिवस भरायला फार वेळ लागत नाही. म्हणूनच पाकिस्तानी लष्कराच्या या दबावाखाली आत्तापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसत नाही. लष्कराच्या इमरान खान सरकारवरील खप्पामर्जीचे कारण ठरले, ते पाकिस्तानमधील गुप्तचर संस्था 'आयएसआय' या संस्थेचे तत्कालीन प्रमुख फैझ हमीद. या फैझ हमीद यांनीच इमरान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवडून येण्यासाठी शक्य तेवढी मदत केली होती. अर्थात, ही मदत म्हणजे मतदानामधील घोटाळे करून इमरान खान यांना सत्तेवर आणण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता, असे पाकिस्तानमध्ये सर्रास बोलले जाते.
अफगाणिस्तानमधून अमेरिकेने मागील वर्षी माघार घेतल्यावर जी काही राजकीय पोकळी अफगाणिस्तानमध्ये निर्माण झाली होती, त्या काळात पाकिस्तानचे तत्कालीन ’आयएसआय’ प्रमुख फैझ हमीद यांनी अफगाणिस्तानला धावती भेट देऊन थेट तालिबानी नेत्यांबरोबर चर्चा केली. त्या भेटीची छायाचित्रे जागतिक माध्यमातून झळकल्यावर आणि त्याचा बराच गाजावाजा झाल्यावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे फैझ हमीद यांच्यावर बरेच नाराज झाले. कारण, फैझ हमीद यांच्या अफगाणिस्तान भेटीची पुरेशी पूर्वकल्पना तेथील लष्करप्रमुखांना दिली गेली नव्हती. त्यामुळे फैझ हमीद हे पाकिस्तानी लष्कराच्या कार्यकक्षेच्या अधिकारात येत असल्याने त्यांची तेथील लष्करप्रमुखांकडून उचलबांगडी करण्यात आली. त्या उचलबांगडीला पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हणजेच इमरान खान यांनी विरोध दर्शविल्याने फैझ हमीद यांच्या गच्छंतीला महिनाभर विलंबही झाला होता. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर आणि लष्करप्रमुख त्यांनीच सत्तेवर आणलेल्या इमरान खान यांच्यावर खूपच नाराज झाल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये झळकत होत्या.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी जे जे शक्य, ते ते पाकिस्तानी ’एस्टॅब्लिशमेंट’ कडून केले जात असल्याचे दिसून येते. आधीच छोट्या छोट्या पक्षांच्या आधारावर पाकिस्तानी ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाचे जनक आणि सध्याचे पंतप्रधान इमरान खान यांचे सरकार तग धरून होते. पण, या सर्व छोट्या पक्षांनी इमरान खान यांचा आता पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केलेले आहे. हे कमी म्हणून की काय, तर पाकिस्तानी ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाच्या २० पेक्षा जास्त संसद सदस्यांनी पक्षत्याग करून तेथील विरोधी पक्षांशी हातमिळवणी केल्याचे जाहीर केलेले आहे. या फुटीर सदस्यांना पाकिस्तानी संसदेत मतदानाचा अधिकार मिळू नये म्हणून इमरान खान यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याबद्दल तेथील मुख्य न्यायाधीशांनी तेथील फुटीर संसद सदस्यांच्या मतदान अधिकारावर नियंत्रण आणण्याला विरोध केलेला आहे आणि त्याचा तपशीलवार निकाल शुक्रवारी म्हणजेच २५ मार्चला जाहीर केला जाईल, असे दिसते. त्यामुळे इमरान खान त्यांची सत्ता वाचविण्याची शर्थ करताना दिसत आहेत. तसेच इमरान खान यांनी ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार नाहीत, असे जाहीर केलेले आहे. त्यामुळे इमरान खान सत्ता वाचविण्यासाठी कोणते मार्ग अवलंबू शकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
त्यातील अनेक शक्याशक्यतांचा खाली लिहिल्याप्रमाणे मागोवा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
शक्यता-१ : इमरान खान हे त्यांच्या पक्षातर्फे मोठी रॅली घेतील आणि त्यांना मिळणार्या समर्थनाची ताकद जगाला दाखवून देतील. त्या सभेत ते त्यांच्या पक्षातील फुटीर संसद सदस्यांना मनसोक्त शिव्याशाप देतील आणि जनतेला त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करतील.
शक्यता-२ : पाकिस्तानच्या संसदेतील सभापतींना हाताशी धरून फुटीर संसद सदस्यांना मतदानापासून रोखले जाण्याच्या प्रयत्न करू शकतील.
शक्यता-३ : ‘तेहरिक-ए-इन्साफ’च्या फुटीर संसद सदस्यांवर स्थानिक पोलीस अधिकार्यांतर्फे अटकसत्र सुरु करून त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून त्यांना गोवले जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. थोडक्यात, या सदस्यांना तेथील संसदेतील मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.
शक्यता-४ : पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर इमरान खान तेथील सत्तेमधून पायउतार होतील. अविश्वास ठराव २८ मार्च किंवा तत्पूर्वी तेथील संसदेमध्ये पारित होणे आवश्यक असल्याने २८ तारखेला ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊ शकतील.
शक्यता-५ : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा तीन वर्षांचा वाढवून दिलेला कार्यकाळ या वर्षांच्या अखेरीस संपत असला, तरीही इमरान खान त्यांच्या म्हणजे पंतप्रधानाच्या अधिकारात जनरल बाजवा यांना लष्करप्रमुख पदावरून हटवू शकतात आणि त्यांच्या मर्जीतील म्हणजे कदाचित फैज हमीद यांनाही लष्करप्रमुखपदी आणू शकतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी एकेकाळी त्यांच्या अधिकारात तत्कालीन लष्करप्रमुखांना हटविले होते आणि झिया-उल-हक यांची पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नेमणूक केली होती. याच निवडल्या गेलेल्या झिया-उल-हक यांनी नंतरच्या काळात झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी दिली होती.
शक्यता-६ : इमरान खान हे अविश्वास ठरावामध्ये पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानबाहेर निघून जातील, असे पाकिस्तानमधील माध्यमांमध्ये बोलले जात आहे. अर्थात, ते कोणत्या देशामध्ये निघून जातील, याबद्दल पाकिस्तानमध्ये चर्चा होताना दिसत नाही.
शक्यता-७ : इमरान खान हे अविश्वास ठरावामध्ये पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी संसद बरखास्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील. त्यामध्ये इमरान खान हे यशस्वी झाले, तर पाकिस्तानमध्ये परत निवडणूक होण्याची शक्यता आहे. तेथील संसदेचा १ वर्षाचाच कार्यकाळ सध्या शिल्लक आहे, हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे.
शक्यता-८ : अजून अशीही एक चर्चा आहे की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा ’मार्शल लॉ’ लागू करू शकतील आणि परवेझ मुशर्रफ यांच्याप्रमाणे देशाचे प्रमुख म्हणून पाकिस्तानचा कारभार हाती घेऊ शकतात.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेला बरेच दुखावले असल्याने अमेरिकेकडून त्यांना कोणतीही मदत मिळण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही. पाकिस्तानचा खात्रीचा आधार असणार्या चीनकडूनही इमरान खान यांना त्यांचे पंतप्रधान पद टिकवण्यासाठी काही उपयोग होईल, याची शक्यता नाही. त्यामुळे शेवटचे हातपाय मारण्याची कसरत करताना ते दिसत आहेत. इमरान खान यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यावर विरोधी पक्षांतर्फे पाकिस्तान मुस्लीम लीगचे सदस्य आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ हे तेथील संसदेच्या उर्वरित एक वर्षाच्या काळासाठी पंतप्रधानपदी आरूढ होऊ शकतात. यासाठी त्यांना पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुट्टो, आसिफ अली झरदारी यांचे समर्थन मिळू शकते. शाहबाज शरीफ जर पंतप्रधानपदी निवडले गेले, तर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये नवाझ शरीफ यांची कन्या मरियम, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुट्टो सामील होऊ शकतात. शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदी आले तर त्यांचे लंडनमध्ये उपचार घेणारे थोरले बंधू नवाझ शरीफ हेही पाकिस्तानमध्ये वाजतगाजत परतू शकतील.
पाकिस्तानमधील गेल्या दोन दशकातील लष्करप्रमुख हे निवृत्तीनंतर युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई अथवा युनायटेड किंग्डम येथे जाऊन स्थायिक झालेले दिसून आलेले. उदाहरणच द्यावयाचे झाले, तर परवेज मुशर्रफ हे दुबईमध्ये, तर कमर जावेद बाजवा यांच्यापूर्वीचे लष्कर प्रमुख राहील शरीफ हे सौदी अरेबियामध्ये एका कामगिरीवर गेली आठ वर्षे राहत आहेत. त्यापूर्वीचे लष्करप्रमुख कॅनडामध्ये स्थायिक झाले असल्याचे सांगतात. कोणत्याही लष्करप्रमुखाला निवृत्तीनंतर पाकिस्तानमध्ये राहावयाची इच्छा नाही, असे म्हणता येईल. यावरूनही पाकिस्तानची अवस्था सध्या किती रसातळाला गेली आहे, हे दिसून येते. त्यामुळे पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा हेही निवृत्तीनंतर स्थायिक होण्यासाठी कोणत्या देशाची निवड करतात, हे बघणे औत्सुक्याचे आहे. पाकिस्तानमध्ये लष्कर, विविध राजकीय पक्ष, तेथील दहशतवादी संघटना यांची एकमेकांमध्ये एवढी गुंतागुंत आहे की, त्यामधून काय बाहेर येईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. आधीच खालावलेल्या आणि दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी येणारी व्यक्ती ही नामधारी पंतप्रधान असेल, हे मात्र निश्चित!
पाकिस्तान आता फुटीरतेच्या उंबरठ्यावर आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शने चालू आहेत. बलुची स्वातंत्र्यलढ्यामध्ये पाकिस्तानी सैनिक मारले जात आहेत. पश्तुनी लोकही स्वतंत्र होण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. पाकिस्तानला त्याच्या सध्याच्या अवस्थेमधून बाहेर काढू शकेल, असा कोणताही नेता तेथे सध्या नाही. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील २,६४० किलोमीटर लांबीची सीमा ‘ड्युरंड लाईन’ म्हणून प्रसिद्ध आहे. १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आखलेली ही ‘ड्युरंड लाईन’ आपल्याला अजिबात मान्य नसल्याचे अफगाणिस्तानच्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाने जाहीर केले होते. तालिबाननेदेखील ही भूमिका कायम ठेवली आहे. ‘तेहरिक-ए-तालिबान’ या अफगाणिस्तानस्थित संघटनेने पाकिस्तानमध्ये मोठे हल्ले चढविण्याची तयारी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अफगाणिस्तानमधील तालिबान हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील ‘ड्युरंड’ सीमारेषेला मान्यता देण्यास तयार नाही. तेथे तालिबानी आणि पाकिस्तानी सैनिक यांच्यामध्ये सतत गोळीबार चालू आहे. पाकिस्तानी लष्कराला तेथे कुंपण घालू देण्यास तालिबान तयार नाही. त्यामुळे तालिबानचे सध्याचे पहिले ’टार्गेट’ हे पाकिस्तानच आहे.
- सनत्कुमार कोल्हटकर
sanat.kolhatkar@gmail.com