महिला गुप्तहेर याला समानार्थी म्हणून अमेरिकेत ३५५ हा आकडा मानला जातो. तेवढाच त्या ‘एजंट ३५५’चा इथे संबंध बाकी पूर्ण कथा ही आधुनिक आणि काल्पनिक आहे. जानेवारी २०२२ मध्ये हा चित्रपट प्रथम अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे आणि आता यथावकाश जगभर सर्वत्र वितरित होईल.
चित्रपटाचं नाव नुसत्याच आकड्यात देण्याची आता ‘फॅशन’ येणार असं दिसतंय. १९८३ साली भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. त्यावर आधारित ‘८३’ हा चित्रपट आपण पाहिला असेल किंवा त्याबद्दल ऐकलं, वाचलं असेल.
असाच अमेरिकेत नुकताच प्रदर्शित झालेला एक चित्रपट आहे ‘दि ३५५’ म्हणजे काय? अमेरिकत ३५५ हा आकडा महिला गुप्तहेर व्यक्तीसाठी वापरला जातो. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध हे अमेरिकन देशभक्त क्रांतिकारक आणि ब्रिटिश साम्राज्यवादी यांच्या दरम्यान झालं. शेवटी अमेरिकन देशभक्त जिंकले आणि अमेरिका ही ब्रिटनची वसाहत न राहता, एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयाला आली. या क्रांतियुद्धात ‘एजंट ३५५’ ही एक अत्यंत धाडसी अशी महिला गुप्तहेर क्रांतिकारकांसाठी काम करत होती. तिच्या बुद्धिचातुर्याच्या आणि धाडसाच्या खूप कथा प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे, क्रांतियुद्ध यशस्वी झाल्यावरही तिने स्वत:ला अज्ञातच ठेवलं. आज सुमारे अडीचशे वर्षांनंतरही अमेरिकन संशोधकांना, इतिहास अभ्यासकांना ‘एजंट ३५५’ ही नेमकी कोण स्त्री होती, हे शोधून काढता आलेलं नाही.
आता या ताज्या ‘दि ३५५’ चित्रपटाचं काय कथानक आहे? तर कुणीएक अतिधनाढ्य माणूस दुसर्या एका अतिहुशार माणसाला सुपारी देतो की, तू असा एक संगणक कार्यक्रम बनव की, तो एकाच वेळी जगातली सगळी वीज उत्पादन केंद्र बंद पाडेल. वीजच मिळाली नाही की, सगळे ‘सर्व्हर्स’, सगळे संगणक, संपूर्ण इंटरनेट यंत्रणा ठप्प होऊन जगातले सर्व व्यवहार बंद पडतील, असा कार्यक्रम बनवण्यात आला आहे, असं कोलंबिया देशाच्या एक महिला गुप्तहेराला समजतं. मग तो कार्यक्रम हस्तगत करण्याच्या मागे कोलंबिया, जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिकेच्या महिला गुप्तहेर लागतात.त्यासाठी त्या चीनमध्ये जातात. तिथे त्यांच्या लक्षात येतं की, आपले पुरुष बॉस आपल्याला प्यादं बनून वापरून घेतायत. त्यांना माणूस म्हणून आपली किंमत नाही आणि तो संगणक कार्यक्रम वापरला जाऊन जग उद्ध्वस्त झाले, तरी फिकीर नाही. मग त्या एकत्रितपणे काम करू लागतात. एक चिनी महिला गुप्तहेरदेखील त्यांना येऊन मिळते आणि अखेर मुख्य खलनायक व खलनायकांपेक्षा फारसे वेगळे नसणारे त्यांचे बॉस लोक यांच्यावर मात करून तो संगणक कार्यक्रम नष्ट करण्यात त्या यशस्वी होतात. इत्यादी.
थोडक्यात, दिग्दर्शक आणि पटकथाकार यांनी इथे एका पुरुष जेम्सबाँडऐवजी पाच महिला जेम्स बाँड दाखवल्यात. त्यातली एक कृष्णवर्णीय मुसलमान दाखवून आंतरराष्ट्रीय सर्वधर्मसमभाव वगैरे सगळे मुद्दे साधण्याचा प्रयत्न केला आहे. आपणा भारतीय प्रेक्षकांच्या त्यातल्या त्यात ओळखीची यातली एकमेव नटी म्हणजे पेनलोप क्रूझ. कारण, करिना कपूर तिची स्टाईल मारते. महिला गुप्तहेर याला समानार्थी म्हणून अमेरिकेत ३५५ हा आकडा मानला जातो. तेवढाच त्या ‘एजंट ३५५’चा इथे संबंध बाकी पूर्ण कथा ही आधुनिक आणि काल्पनिक आहे. जानेवारी २०२२ मध्ये हा चित्रपट प्रथम अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे आणि आता यथावकाश जगभर सर्वत्र वितरित होईल.
गुप्तहेरांच्या कथा, चित्रपट किंवा नाटक आणि दूरदर्शन मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येणं हे पाश्चिमात्य रंगभूमी वा चंदेरी पडद्याला अजिबात नवीन नाही. असंख्य उत्तमोत्तम रहस्यनाटकं आणि रहस्य चित्रपट तिथे सतत येतच असतात. अभ्यासक गमतीने म्हणतात की, काही काळापूर्वी जे कथानक गुप्ततेच्या काळोखात काटेकोर रहस्यमयतेने मुद्दाम घडवण्यात आलं, ते मुळात इतकं रोमांचक होतं की, आज रंगभूमीच्या प्रखर प्रकाशात किंवा कॅमेर्यासाठीच्या तीव्र प्रकाशझोतांमध्ये त्याचं सादरीकरण करताना त्यातली रोमांचकता अधिक गडद झाली की, उलट फिकी झाली, हेच कधीकधी समजत नाही. कारण, अभिनय वठवणारे नट-नटी हे काही खरेखुरे गुप्तहेर नसतात.
पण, ख्रिस्टोफर अॅन्ड्रयू आणि ज्युलियस ग्रीन यांचं मत जरा वेगळं आहे बरं का! ते म्हणतात की, नट-नटी आणि गुप्तेहर हे दोन्ही व्यावसायिक बरेचसे सारखे आहेत. दोघेही काही एक भूमिका वठवून एकप्रकारे समोरच्यांना फसवत असतात. दोघेही बरेचदा प्रवास करतात. दोघेही गरज पडेल तसे सरड्याप्रमाणे रंग बदलण्यात पटाईत असतात. दोघेही दिलेल्या संहितेप्रमाणे पोपटपंची करतात, पण आवश्यकता पडल्यास भूमिकेनुसार नवे संवाद स्वतः रचू शकतात. कोण आहेत हे अॅन्ड्रयू आणि ग्रीन?
ख्रिस्टोफर अॅन्ड्रयू हा इतिहासकार आहे. ब्रिटनची ‘एम.आय.५’ ही अंतर्गत सुरक्षा पाहणारी गुप्तहेर किंवा गुप्तवार्ता संकलन संस्था ‘एम.आय.५’ने अॅन्ड्रयूला आपला अधिकृत इतिहासकार म्हणून नेमलं आहे. ‘एम.आय.५’च्या दफ्तरातल्या जुन्या-जुन्या फायली अभ्यासायच्या आणि त्यांचा साधन इतिहास शब्दांकित करायचा, हेच त्याचं काम आहे. ज्युलियस ग्रीन हा स्वतः नाट्यनिर्माता आहे आणि नाटक या वाङ्मयप्रकाराचा इतिहासकारही आहे. या दोघांनी मिळून नुकतंच ‘स्टर्स अॅन्ड स्पाईज’ हे छानसं पुस्तक लिहिलं आहे. नट-नटी, लेखक, दिग्दर्शक ही मंडळी प्रसिद्धीच्या झगमगाटात वावरणारी, तर गुप्तेहर हे आपल्यावर प्रकाशझोत न पडेल, याची शक्य तितकी काळजी घेणारे. पण, अनेक देशांच्या गुप्तहेर प्रमुखांनी मोठ्या चतुराईने या झगमगाटातल्या लोकांनाच आपले हस्तक बनवून त्यांच्याकडून काम करवून घेतलं, अशा अनेक मजेदार कथा या पुस्तकात आल्या आहेत.
सोळाव्या शतकात इंग्लंडवर राज्य करणारी राणी एलिझाबेथ पहिली ही प्रोटेस्टंट होती. तिचा म्हणजेच इंग्लंडचा प्रमुख शत्रू स्पेन हा कॅथलिक होता. स्पेनचं आरमारी सामर्थ्य फारचं मोठं होतं. साम्राज्य स्पर्धेत हॉलंड हा देशही इंग्लंडला भारी होता. हॉलंडचं आरमार अद्ययावत होतं. एवढंच काय डेन्मार्क हा चिमुकला देशही पुढे सरसावू पाहात होता.
अशा कालखंडात सर फ्रान्सिस वॅाल्सिंगहॅम हा फक्त फारच हुशार माणूस इंग्लंड मिळाला. वॉल्सिंगहॅमला अत्यंत प्रभावी असं गुप्तहेर जाळं संपूर्ण युरोपभर उभं केलं. आज वॉल्सिंगहॅमला इंग्लंडच्याच नव्हे, तर एकंदरीतच आधुनिक गुप्तवार्ता संकलनाचा जनक मानलं जातं. वॉल्सिंगहॅमने जॉन डाउलँड आणि अँथनी स्टँडन या लोकप्रिय कलावतांना आपल्या बाजूला वळवून घेतलं डाउलँड हा ल्युट वाद्य वाजवण्यात निष्णात होता. त्याने डेन्मार्कच्या राजाच्या दरबारात कलावंत म्हणून शिरकाव करून घेतला आणि मग तो नियमितपणे तिथल्या बातम्या वॉल्सिंगहॅमला पोहोचवू लागला. कला आणि कलावंत यांना देश, धर्म, संस्कृती यांची बंधनं नसतात वगैरे अक्कल पाजळणार्या लोकांनी हे उदाहरण लक्षात ठेवावं. अँथनी स्टँडन हा लोकप्रिय अभिनेता होता. त्याने पॅाम्पिओ पेलिगिनी हे नाव धारण केलं आणि तो स्पेनचा राजा फिलिप दुसरा याच्या आरमाराबद्दलच्या गुप्त बातम्या वॉल्सिंगहॅमकडे पाठवू लागला. १५८८ साली इंग्लंड आणि स्पेन यांच्यातल्या आरमारी लढाईत इंग्लंडने स्पेनचा धुव्वा उडवला त्यात वॉल्सिंगहॅमच्या या हेरजाळ्याचा मोठा वाटा आहे. तरी वॉल्सिंगहॅमचा फार मोठा हस्तक कलावंत म्हणजे नाटककार ख्रिस्तोफर मार्लो. अनेक अभ्यासकांच म्हणणं आहे की, शेक्सपियरची म्हणून समजली जाणारी अनेक श्रेष्ठ नाटकं खरं म्हणजे ख्रिस्तोफर मार्लोचीच आहेत.
आणखी १०० वर्षे उलटली. १६६६ साली इंग्लंड हॉलंड यांच्यात युद्ध सुरू झालं. इंग्रज सरकारने आफ्रा बेन हिला हॉलंडमध्ये पाठवलं. आफ्रा बेन ही उत्कृष्ट लेखिका आणि नाटककार होती. तिने हॉलंडच्या दरबारातल्या एक महत्त्वाच्या माणसाला आपल्या सौंदर्याने वश करून घेतलं. यालाच ‘हनीट्रॅप’ असं म्हणतात. हॉलंडच्या दरबाराला अनेक गुप्त बातम्या बिनबोभाट इंग्लंडला पोहोचू लागल्या.
आणखी १०० वर्षे उलटली. सन १७७५. अमेरिकन क्रांतिकारक इंग्रज मालकांविरूद्ध लढून अमेरिकेला स्वतंत्र करू पाहत होते. या युद्धात, इंग्लंडमध्ये नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, याची बित्तंबातमी फ्रान्सचा राजा लुई पंधरावा याला देत होता. प्रसिद्ध नाटककार पिएर ऑगस्टिन बुमार्शेल. वरकरणी पिएर बुमार्शेल हा संपूर्ण युरोपभर लेकप्रिय असलेला एक नाटककार होता. प्रत्यक्षात तो फ्रान्सच्या ‘सीक्रेत द्यु लोई’ या गुप्तवार्ता खात्याचा हस्तक होता. ब्रिटनच्या तयारीची खबर कळल्यावर पंधराव्या लुईने शस्त्रसामग्रीची नऊ मोठी गलबतं अमेरिकन क्रांतिकारकांना पाठवली. अखेर ब्रिटनला पराभूत करून अमेरिका स्वतंत्र झाली.
सगळ्यात धमाल आणि कमाल उदाहरण आहे ते विल्यम स्टिफनसन याचं. युरोपातल्या युद्धात पडायला अमेरिकन नागरिक अजिबात तयार नसतात, हे चर्चिलला अचूक माहित होतं. म्हणून चर्चिलने विल्यम स्टिफनसनला न्यूयॉर्कला पाठवलं. त्याचं काम काय तर हिटलर आणि त्यांच्या नाझी पक्षाचं तत्वज्ञान हे केवळ युरोपसाठीच नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेवर विश्वास असणार्या प्रत्येक देशासाठी कसं अत्यंत घातक आहे, हे सांगणार्या प्रचाराचा धूमधडाका उडवून द्यायचा. स्टिफनसनने अमेरिकेतले अनेक लोकप्रिय नाट्य आणि चित्रपट कलावंत, लेखक, पटकथा लेखक, नाटककार यांना म्हणतील तो मोबदला देऊन कामाला लावलं. नाझी तत्वज्ञान लोकशाहीला कसं घातक आहे, हे सांगणारे अनेक लेख, लघुपट, पथनाट्य, चित्रपट, जाहिराती यांचा मारा अमेरिकन प्रचारमाध्यमांमधून अमेरिकन नागरिकांवर होऊ लागला. रोआल्ड दहल, नोएल कावर्ड यांच्यासारख्या मोठ्या नाटककारांनाही स्टिफनसनने कामाला लावलं. एरिक मॅशविट्झ या हॉलिवूडच्या पटकथालेखकाला हाताशी धरून स्टिफनसनने एक नकाशा आणि आराखडा बनवला नि राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्यासमोर ठेवला. हिटलर संपूर्ण दक्षिण अमेरिका खंड ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे, असं त्यात म्हटलं होतं. या प्रचारमोहिमेचा परिणाम होऊन अमेरिकन जनमत हळूहळू युद्धाला अनुकूल बनलं आणि जपानने पर्ल हार्बरवर बॉम्बफेक केल्यावर अमेरिका पूर्ण शक्तीनिशी युद्धात उतरली.
आता या सगळ्या भानगडीत आपण कुठे आहोत? आपल्याकडे लोकांना रंगमंच, चित्रपट यांच्याइतकंच क्रिकेटचं वेड आहे आणि बातम्या काढणे, पेरणे वगैरेंपेक्षा जनमत अनुकूल वा प्रतिकूल बनवण्यासाठी त्यांचा साधन म्हणून वापर केला जातो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. इतर तुम्ही आठवून पाहा. देविकाराणी ही आपल्याकडची एकेकाळची अत्यंत लोकप्रिय नटी होती. पंडित नेहरुंनी तिला ‘फॅन लेटर’ लिहिलं.