रोखीने व्यवहार करायचे नसतील, तर ‘डेबिट कार्ड’, ‘के्रडिट कार्ड’ व ‘पे-लेटर कार्ड’ हे पर्याय उपलब्ध आहेत. या तिन्ही कार्ड्सचे वेगळेपण काय व कुठले कार्ड चांगले, याविषयीची माहिती देणारा आजचा लेख...
ग्राहक त्यांच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदीची बिले ‘डेबिट कार्ड’, ‘के्रडिट कार्ड’ तसेच ‘पे-लेटर कार्ड’ने भरू शकतो. व्यवहाराची प्रक्रिया तिन्ही कार्ड्ससाठी सारखीच आहे. ग्राहक जेव्हा ही कार्ड्स ‘एटीएम’वर किंवा खरेदी करताना ‘स्वाईप’ करतो, तेव्हा त्याला फरक समजू शकतो. ‘डेबिट कार्ड’चा उपयोग करताना तुम्ही जितक्या रकमेचा व्यवहार करीत आहात, तेवढी रक्कम तुमच्या बचत खात्यामध्ये असावयास हवी. कारण, कार्डचा वापर जितक्या रकमेसाठी केला, तितकी रक्कम तत्काळ ग्राहकाच्या खात्यातून वजा केली जाते. ‘के्रडिट कार्ड’ने खरेदी केल्यावर तुम्हाला बिल ऑनलाईन किंवा ऑफलाईन पाठविले जाते. त्या बिलावर पैसे भरण्यासाठी शेवटची तारीख नमूद केलेली असते. त्या तारखेपर्यंत बिल भरता येते, ‘क्रेडिट कार्ड’मध्ये ग्राहकाला काही दिवसांचे ‘के्रडिट’ मिळते. ‘के्रडिट लाईन कार्ड’ किंवा ‘पे-लेटर कार्ड’ने तुम्हाला खरेदी करता येते व तीन ते चार हजार हप्त्यांत त्यासाठी काही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. ‘युनि पे-लेटर कार्ड’मध्ये तुम्ही हवे ते व्यवहार पूर्ण रकमेने करू शकतात, तसेच हवे ते व्यवहार हप्त्याने पैसे भरून करू शकतात, असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
‘फिनटेक’ कंपन्या ‘पे-लेटर कार्ड’ वितरित करतात, जे ग्राहक ‘डिजिटल’ व्यवहार करू शकतात व ज्यांच्या डोक्यावर काहीही कर्जे नाही, अशांना ही कार्ड्स दिली जातात. सुरुवातीला दोन हजारांपर्यंतच रकमेची कार्ड्स दिली जातात, जर ग्राहक पैसे वेळेवर भरत असेल, तर अशांची मर्यादा वाढविली जाते. ‘पे-लेटर कार्ड’ हे छोट्या रकमेचे कर्जच समजले जाते. ‘के्रडिट कार्ड’ मिळण्यासाठी ग्राहकाकडे जो आर्थिक स्तर लागतो, तो ‘पे-लेटर कार्ड’साठी लागत नाही. कमी उत्पन्न असणार्यांनाही ‘पे लेटर कार्ड’ मिळते, पण ‘क्रेडिट कार्ड’ मात्र मिळत नाही. उत्पन्नाचे स्थैर्य, पैसे परत करण्याची क्षमता व उत्पन्न याबाबी तपासून ‘के्रडिट कार्ड’ दिले जाते. ‘के्रडिट कार्ड’ वापरणार्यांना ‘के्रडिट’ मर्यादा मोठ्या रकमेची मिळते, अशी ‘पे-लेटर कार्ड’धारकांना मिळत नाही. ‘पे-लेटर कार्ड’ची ‘के्रडिट’ मर्यादा किमान दोन हजार रुपयांपासून सुरू होऊन कमाल दहा लाख रुपयांपर्यंत असते. ‘क्रेडिट कार्ड’ची किमान ‘क्रेडिट’ मर्यादा 20 हजार रुपयांपासून सुरू होते व कमाल मर्यादा नाही. ग्राहकाचा कार्डचा वापर, ग्राहकाचे उत्पन्न व कार्ड वापरण्याचा कालावधी याचा तपशील अभ्यासून ‘के्रडिट कार्ड’चे ‘के्रडिट’ सीमित ठरविले जाते. ‘पे लेटर कार्ड’ने व्यवहार केलेली रक्कम तीन हप्त्यांत भरावीच लागते. ‘के्रडिट कार्ड’ने व्यवहार केलेली रक्कम 36 महिन्यांपर्यंतच्या ‘इएमआय’ने भरता येते. ‘पे लेटर कार्ड’वर ग्राहकाला व्याज आकारले जात नाही, पण ‘के्रडिट कार्ड’चे बिल जर बिल भरण्याच्या तारखेनंतर उशिराने भरले किंवा पूर्ण बिल न भरता काही अंशी बिल भरले, तर व्याज आकारले जाते व व्याज हे व्यवहाराच्या तारखेपासून आकारले जाते.
‘क्रेडिट कार्ड’ ग्राहकांना फायदे व बक्षिसेही फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ‘पे-लेटर कार्ड’मध्ये ग्राहकांना तितकेच फायदेही नाहीत व बक्षिसेही दिली जात नाहीत. ‘पे-लेटर कार्ड’ची बिले वेळेत भरल्यास एक टक्का रक्कम ‘कॅशबॅक’ म्हणून दिली जाते. ‘के्रडिट कार्ड’धारकांना ‘कॅशबॅक’, ‘रिवॉर्ड पॉईंट्स’, ‘डिस्काऊंट्स’ आणि ‘एअर माईल्स’ असे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळतात. ग्राहकांनी ते जास्त काय खरेदी करतात, त्यानुसार ‘क्रेडिट कार्ड’ स्वीकारावे. ‘पे-लेटर कार्ड’चे फायदे देण्याचे नियम सर्वत्र सारखेच आहेत. ‘के्रडिट कार्ड’बाबत ‘मास्टर’ व ‘व्हिसा’ या दोन्ही प्रकारच्या कार्डचे वेगवेगळे नियम आहेत. ‘क्रेडिट कार्ड’चे पर्यायही बरेच आहेत व पर्यायाने फायदेही वेगवेगळे आहेत. ‘डेबिट कार्ड’, ‘क्रेडिट कार्ड’ किंवा ‘पे-लेटर कार्ड’ यांचे पैसे परत घेण्यासाठी ग्राहकांसाठी वेगवेगळे पर्याय आहेत. या तिघांची तशी तुलना होऊ शकत नाही. ‘डेबिट कार्ड’ बाबत तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम वापरता. उलट पैसे बँकेत जाऊन काढण्यापेक्षा जर ‘एटीएम’वर काढले, तर बँकांचा खर्च वाचतो, असे सिद्ध झालेले आहे. ‘क्रेडिट कार्ड’ व ‘पे-लेटर कार्ड’ ही असुरक्षित कर्जेच! ‘क्रेडिट कार्ड’ किंवा ‘पे-लेटर कार्ड’ने व्यवहार केले तर ती बिले भरण्याचे दायित्व ग्राहकाकडे येते. ‘डेबिट कार्ड’बाबत ग्राहक पैसा देऊन मोकळा झालेला असल्यामुळे, त्याचे काही दायित्व उरत नाही. ‘डेबिट कार्ड’ ग्राहकांच्या बचत किंवा चालू खात्याला संलग्न असतात. छोट्या रकमांसाठी ‘डेबिट कार्ड’ वापरावं. रोकड हवी असेल, तर हे कार्ड वापरुन ‘एटीएम’मधून पैसे काढावेत. ‘क्रेडिट कार्ड’ व ‘पे-लेटर कार्ड’ने शक्यतो रोकड काढू नये. कारण, यावर फार चढ्या दराने व्याज भरावे लागते. हेही कार्ड ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांसाठी वापराता येतात. तुम्हाला जो व्यवहार करावयाचा आहे, त्या व्यवहारानुसार कार्ड वापरावे.
- शशांक गुळगुळे