मुंबई : “श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये शैक्षणिक पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी,” अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी विधानसभेत केली. शिक्षणमंत्र्यांच्या विधानाचा संदर्भ देत मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “शिक्षण व्यवस्थेअंतर्गत शाळेतील अभ्यासक्रमात सरकार बदल करणार आहेत,” असे विधान शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.
यावर मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “श्रीमद्भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यात जीवनाचे सार आहे. श्रीमद्भगवद्गीतेचा भारतभर शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश केला जात आहे. तसाच महाराष्ट्रात देखील श्रीमद्भगवद्गीतेचा शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करावा,” असे ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, “भारतातील अनेक राज्यांमध्ये शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकारने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सहावी ते बारावीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी श्रीमद्भगवद्गीता हा नैतिक मूल्यांचा ग्रंथ असल्याचे सांगून सकारात्मक संकेत दिले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत देखील श्रीमद्भगवतगीतेचा समावेश होणार आहे का,” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.