आनंदी आनंद गडे

    22-Mar-2022
Total Views | 109
 
 
health
 
 
 
२००० वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ते अ‍ॅरिस्टॉटल यांनी आनंदाबद्दल एक छान मत उद्घोषित केले होते. आनंदात आयुष्याचा अर्थ आणि हेतू आहे. आनंद हे आयुष्याचे परिपूर्ण ध्येय आहे आणि मानवी अस्तित्वाचे निष्कर्ष आहे.
 
 
 
आपण गेली काही वर्षे अनेक ‘आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरे करतो. या दिवसांमध्ये मानसिक आरोग्य, ग्राहक चळवळी, वृद्धावस्था दिवस, अलीकडेच साजरा झालेला महिला दिवस असे अनेक दिवस आहेत. या दिवसांमागे मानवतेच्या वा मानवी आयुष्याच्या अनुषंगाने दुर्लक्षित झालेल्या महत्त्वाच्या संकल्पनांची जागतिक पातळीवर जनजागृती व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. असाच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भावना, जी आपले जीवन सुंदर, समाधानी, आणि निर्मळ बनविण्यासाठी आवश्यक आहे, ती म्हणजे प्रसन्नता, आनंद, जो आपण विसरत चाललो आहोत, जो आपण शोधत आहोत, त्या भावनेला साजरे करायचा दिवस म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस’ (International Day of Happiness) २० मार्च रोजी साजरा केला जातो. आपण या दिवसाच्या इतिहासाकडे पाहिले, तर ‘युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्ली’ यांनी २०११ मध्ये आनंद हा मानवी जीवनातील एक मूलभूत उद्दिष्ट आहे, असा ठराव मांडून २०१२ मध्ये ‘युएन’ परिषदेत दि. २० मार्च हा दिवस ‘जागतिक आनंद दिवस’ म्हणून घोषित केला. २०१३ पासून हा दिवस जगभरात साजरा करायला, सर्व देशांनी सुरुवात केली. खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा ठराव भूतान या देशाने सादर केला होता. १९७० मध्ये खरेतर भूतान या छोट्याशा देशाने राष्ट्रीय आर्थिक उत्पन्नापेक्षा राष्ट्रीय प्रसन्नता कशी महत्त्वाची आहे, या संकल्पनेला प्राधान्य दिले होते. याही पलीकडे जाऊन त्यांनी उच्चप्रतीची, जागतिक दर्जाची ‘आनंद’ या विषयावर परिषद घेऊन आर्थिक व्यवस्थेचा एक नवा नमुना किंवा उदाहरण जगासमोर मांडले. यामुळे ‘युएन’ने जी शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे मांडली, त्यात गरिबी हटवणे, सामाजिक असमानता कमी करणे आणि आपल्या पृथ्वीचे रक्षण करणे ही महत्त्वाची ध्येय आणली गेली. गरिबी, सामाजिक विषमता आणि असुरक्षितता या तीन गोष्टी जगाला शाश्वत आनंदापासून वंचित ठेवत आहेत. प्रसन्नताही पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या जगण्यासाठी आवश्यक आहे. आनंदी राहणं हा व्यक्तीचा मूलभूत मानवी हक्क आहे. म्हणून या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे. हा दिवस सर्वसमावेशक, नि:पक्ष आणि संतुलित अशी आर्थिक प्रगती व्हावी, याचे महत्त्व सूचित करतो. यामुळे लोकांचे जीवन स्वस्थ होईल, आनंदी होईल, याची जाणीव व्यक्तीला, समाजाला आणि देशाला होईल, असा ‘युएन’चा कयास आहे.
 
 
 
२००० वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ते अ‍ॅरिस्टॉटल यांनी आनंदाबद्दल एक छान मत उद्घोषित केले होते. आनंदात आयुष्याचा अर्थ आणि हेतू आहे. आनंद हे आयुष्याचे परिपूर्ण ध्येय आहे आणि मानवी अस्तित्वाचे निष्कर्ष आहे. दलाई लामा म्हणतात की, “आपण आनंदी राहणे ही आपल्या आयुष्याची प्रेरणा आहे.” गौतम बुद्धांनी म्हटले आहे, “आनंदाची खास वाट नसते. आनंद हीच एक वाट आहे.”यावर्षीची या जागतिक आनंदी दिवसाची थीम मोहक आणि हृदयस्पर्शी आहे, ’Keep calm, Stay wise and be Kind..’ शांत राहा, जागृत राहा आणि अनुकंपा बाळगा. या जगात आज कोरोनासारख्या विषाणूने संपूर्ण हल्लकल्लोळ माजवला. मानवाला जगण्यासाठी अतोनात कष्ट झाले. मृत्यूचे थैमान माणसाने पाहिले. भयानक भीतीचे वातावरण अनुभवले. रशिया-युक्रेनच्या दुर्दैवी युद्धाचे क्लेशकारक पडसाद आपण पाहत आहोत. जगातील जवळजवळ २३० देशांत काहीना काही कारणाने निषेध चालू आहे. कोरोना विषाणूच्या विषयावर गेल्या दोन वर्षांत जवळजवळ २७ देशांत महत्त्वाचे निषेध मोर्चे झालेले दिसून येतात. एकंदरीत या घडीला युद्धाचे वारे वाहत आहेत. आर्थिक मंदीची लाट आलेली आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या जगात वाढलेल्या आहेत. धार्मिक गुंतागुंत वाढत आहेत. पर्यावरण आपत्कालीन स्थितीत आहे. जातीयवाद पेटला आहे. या घडीला जगाचा आनंदी गुणांक पार खाली घसरला आहे, यात शंकाच नाही. कोरोना विषाणूमुळे त्यात दुष्काळात तेरावा महिना आला आहे.
 
 
 
‘सस्टेेनेबेल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क’च्या अभ्यासानुसार देशातील आनंदी गुणानुक्रमाची यादी ते लावतात, त्या यादीनुसार १४६ देशांच्या यादीत आपण शेवटच्या दहा देशांमध्ये १३६ व्या क्रमांकावर आहोत. आपली शेजारील राष्ट्रे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका आपल्यापुढे आहेत. यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या आनंदासाठी आवश्यक आहेत, त्याबद्दल समजून घ्यायला पाहिजे. मुळातच आनंदाचा गुणांक जाणून घ्यायचे कारण म्हणजे त्या-त्या देशाने कुठले घटक आनंदात घट करत आहेत आणि कुठले घटक आनंद वाढवू शकतात, याचे विश्लेषण करून त्यानुसार त्या त्या देशासाठी ‘पॉलिसी’ योजल्या पाहिजेत. देशांबरोबर अनेक संघटना, कॉर्पोरेशन्स या ठिकाणीही आनंदी गुणांकाचा अभ्यास व्हायला पाहिजे. आनंदाचा पाठपुरावा करायचा असेल, तर ज्याने-त्याने आपली आनंद मिळवण्याची स्वायत्तता दुसर्‍याच्या आनंदाचा हक्क हिरावून न घेता मिळवली पाहिजे. हा आनंद निर्मळ असायला हवा. सर्वांसाठी असायला हवा. आनंदी आनंद गडे... जिकडे तिकडे चोहीकडे...(क्रमश:)
 
 
 - डॉ. शुभांगी पारकर
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121