‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांचे परखड मत
21-Mar-2022
Total Views |
मुंबई (सौरभ मुळीक) : “सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या कुप्रथा या धर्ममान्य असल्या, तरी काळानुसार नवीन कायदे बनवून त्या बंद करण्यात आल्या. तशाच कुप्रथा इस्लाम धर्मातूनही काढून टाकण्यात आल्या पाहिजेत,” असे परखड मत ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वेब पोर्टल ‘महा एमटीबी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान मांडले.
‘हिजाब’ इस्लाम धर्मात अनिवार्य आहे का? कुराण या धर्मग्रंथात याविषयी नेमके काय नमूद करण्यात आले आहे?
अनेकवेळा बुरख्यासाठी ‘हिजाब’ हा प्रतिशब्द वापरला जातो. यामध्ये फरक आहे. ‘हिजाब’ हे डोक्यावरून छातीपर्यंतच असते. तर, बुरखा हा संपूर्ण शरीर झाकतो. फक्त चेहर्यावर जो असतो तो ‘पडदा’ असतो. प्रत्येक देशात तेथील संस्कृतीप्रमाणे यांच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. इस्लाम धर्मात पंचस्तंभ आहेत. पहिले अल्लाह आणि पैगंबरांवर विश्वास, दुसरे नमाज, तिसरे उपवास, चौथे दान आणि पाचवी हजची यात्रा. कुराणमध्ये ही पंचसूत्रेही अनिवार्य मानली गेलेली नाहीत. यातील काही अपेक्षा, काही सूचना, तर काही शिफारशी आहेत. प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे, स्थितीप्रमाणे ही पंचकर्मे करावीत, असे म्हटले आहे. इस्लाममध्ये दोन भाग आहेत ‘आदत’ आणि ‘इबादत.’ ‘इबादत’ म्हणजे श्रद्धेच्या गोष्टी तर ‘आदत’ म्हणजे दैनंदिन जीवनातल्या गोष्टी. ‘हिजाब’ हा ‘आदत’ या भागात येतो. परंतु, याचा वापर हा तेथील भौगोलिक, सामाजिक परिस्थितीनुसार बदलत जातो.
जवळपास कुराणमध्ये चार ते पाच ठिकाणी ‘पडदा’ या शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे. यामागची कथा अशी आहे की, मोहम्मद पैगंबर यांचे सहाव्या शतकात कार्य सुरु असताना त्यांचे अनेक शत्रू होते आणि त्यांना त्रास देत होते. तसेच पैगंबरांच्या पत्नींनासुद्धा त्रास देण्यात यायचा. पैगंबरांची पत्नी या आपली आई असे मानण्यात आले असून त्यामुळे त्यांच्याशी सर्वांनी बोलताना पडद्याच्या मागून अत्यंत सभ्यपणे बोलावे, हे ठरले आणि तेथून खर्या अर्थाने ‘हिजाब’ अथवा बुरखा या संकल्पनेस सुरुवात झाली. स्त्री, पुरुषांनी अत्यंत सभ्यपणे वागले पाहिजे. कपडे हे सभ्यपणाचे असले पाहिजेत, हा त्यामागचा मूळ उद्देश होता म्हणजे डोके आणि छाती हे झाकले गेले पाहिजे. एवढेच त्याचा उद्देश होता. आज आपण ज्याला बुरखा म्हणतो, त्याची अनिवार्यता कुराणमध्ये अथवा इस्लाममध्ये कुठेच लिहिली गेलेली नाही. नंतर ती कुप्रथा उदयास आली, तरी काळानुसार प्रत्येक प्रथेत बदल करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे बालविवाह, सतीप्रथा या धर्ममान्य असल्या, तरी काळानुसार नवीन कायदे बनवून त्या काढून टाकण्यात आल्या. तशाच कुप्रथा मुस्लीम धर्मातूनही काढून टाकण्यात आल्या पाहिजेत.
आजही आधुनिक शिक्षण घेणार्या मुली स्वतः बुरख्याचे समर्थन करत आहेत, याबद्दल काय सांगाल?
हा समाज अजून तितकासा प्रगत झालेला नाही. हे त्याचे मूळ कारण आहे. इतर मुस्लीमबहुल देशांमध्ये बुरख्यावर कायदेशीर बंदी आणण्यात आली आहे. भारतात तितकासा प्रयत्न मागील ७० वर्षांत झाला नव्हता. तो आता होत आहे. मग ‘तिहेरी तलाक’ कायदा असो वा असे अन्य बरेच कायदे करण्यात येत आहे. समाजसुधारकांची कमतरता मुस्लीम समाजात दिसून येते. काही हातावर मोजता येतील इतकेच. समाजसुधारक मुस्लीम समाजात झाले. त्यातील ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे संस्थापक हमीद दलवाई असतील त्यांनाही आपल्या जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मलाही वेळोवेळी अनेक अपशब्द वापरले जातात. तरीही आमचे कार्य सुरू असते. ‘बकरी ईद’च्या दिवशी ‘बकरी हलाल’ करण्याऐवजी आम्ही रक्तदान शिबीर भरवतो. असे काही कार्य समाजात प्रबोधन करण्यासाठी गरजेचे आहे. नवीन कायदे बनवून जुन्या कुप्रथांना रद्दबादल करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तो आता मागील फक्त काहीच वर्षे होत आहे. त्यामुळे हे बदल होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल हे निश्चित.