मुंबई : काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी महाआघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एमआयएमशी युती फेटाळत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 'सत्तेसाठी शिवसेनेने स्वाभिमान गहाण टाकला?' असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"कलम ३७० रद्द झाले तेव्हा आमच्यासोबत सेलिब्रेशन, आता काश्मीरमध्ये जाऊन शिवसैनिकांचे आंदोलन, हिंदुत्वातले जाज्वल्य सोडले, सोडला सगळा अभिमान, सत्तेसाठी गहाण टाकलात तुम्ही स्वाभिमान! अजूनही वेळ गेलेली नाही. आता एमआयएम सारख्यांशी युती करणार का?", असा सवाल भाजप चंद्रकांत पाटील त्यांनी उद्धव ठाकरेंना केला.
एमआयएमचा आघाडीचा प्रस्ताव फेटाळत उद्धव ठाकरे यांनी एमएमआय ही भाजपची बी टीम असून हा सरकार पाडण्यासाठी भाजपचा कट असल्याचे म्हटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्त्युतर दिले. 'एमआयएमने मविआला आघाडीची ऑफर देणे हा भाजपाचा डाव असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण एमआयएमने ज्यांना ही ऑफर दिली आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावूनच सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळवले आहेत ना? ते कायम ठेवण्यासाठी तुम्ही कसे धडपड आहेत, सत्तेसाठी कोण लाचार आहे आणि कोण नाही, हेही जनतेला दिसते आहे', असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुढे त्यांनी म्हंटले की, "सत्तेसाठीही एमआयएमसोबत जाणार नाही, झोपेतही एमआयएमशी युती नाही, अशी टाळीची वाक्ये यापूर्वी कुठल्या पक्षांसाठी वापरली होती, ते जरा आठवा. तुम्ही टीका करत होता, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष तिथेच आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जात स्वतःला त्यांच्या दावणीला बांधून घेतले आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.