मुंबई : "एमआयएमने शिवसेनेला तसेच महाविकास आघाडीला दिलेली ऑफर हे एक प्रकारे भाजपचे कटकारस्थान आहे. शिवसेनेची बदनामी होण्यासाठी भाजपकडून अशाप्रकारे प्रयत्न केले जात आहेत.", असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. २० मार्च) पक्षातील खासदारांना 'शिवसंपर्क अभियान' अंतर्गत शिवसेना भवनातून ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन केले. त्यानंतर संजय राऊत हे शिवसेना भवन परिसरात माध्यमांशी या संदर्भात बोलत होते.
"भाजपनेच एमआयएमला आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देण्याची सूचना दिली असावी. हा प्रस्ताव म्हणजे त्यांचा एक कट आहे. यातूनच त्यांचा शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसते. शिवसेनेने अजूनही आपले हिंदुत्व सोडलेले नाही आणि आमचे हे हिंदुत्व बदनाम करण्यासाठी भाजप कायम प्रयत्नशील आहे. उलट शिवसेनेला 'जनाब सेना' म्हणून संबोधणाऱ्यांनी आपला इतिहास तपासून घ्यावा. काश्मिरी पंडितांच्या बलिदानाचा अपमान करू नाक हे सांगणारे आम्ही आहोत. त्यामुळे खरी जनाब सेना कोण हे जनतेला कळेलच.", असेही राऊत पुढे म्हणाले.