दि. २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. या वर्षी ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ने नवी मुंबई, घाटकोपर, विरार, भाईंदर या ठिकाणी विज्ञान दिनानिमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० या वेळेत अशाच एका कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ‘छोटे शास्त्रज्ञ’ ही नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला. या उपक्रमांचा घेतलेला मागोवा...
'सेवा सहयोग फाऊंडेशन' संस्थेद्वारे ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ ‘नॉलेज ऑन व्हील’ म्हणून ओळखली जाते. सोप्या भाषेत म्हणायचं झालं, तर या फिरत्या प्रयोगशाळा ! ‘नॅनो रॉकेट’ गाड्या विविध शहरी व ग्रामीण भागांत फिरतात. तळागाळातील मुलांना थेट त्यांच्या शाळेत व वस्तीत प्रयोगशाळा उपलब्ध व्हावी, या हेतूने ‘नॉलेज ऑन व्हील’च्या ‘नॅनो व्हॅन’ वस्ती-वस्तीतून फिरत असतात. सेवा सहयोगने ‘छोटे शास्त्रज्ञ’ ही नावीन्यपूर्ण कल्पना घेऊन राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला. एकूण ९४ शाळांनी सहभाग यात घेतला होता. जवळजवळ ११३४ विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ३२९ विज्ञानाचे प्रयोग (मॉडेल्स) प्रदर्शनात सादर केले. २३९ शालेय शिक्षकांच्या आणि ‘सेवा सहयोग’च्या अभ्यासिकेच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली हे विज्ञान प्रयोग सादर केले गेले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने ‘व्हॅक्युम क्लीनर’, ‘रॉकेट मेकिंग’, ‘एअर कुलर’, पवनऊर्जा निर्मितीवर आधारित प्रयोग, ‘सोलर स्ट्रीट लाईट’, हवेच्या दाबाचा परिणाम, पाण्याचे गुणधर्म, फुप्फुस कार्यतपासणी, मातीचे शीतयंत्र (फ्रिज), रस्ता गतिरोधक यंत्र, ‘स्मार्ट सिटी’, सौरऊर्जा व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या प्रयोगांची प्रदर्शनात प्रात्यक्षिक करून माहिती करून दिली. तसेच आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा व खेळ विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय कल्पनेला वाव देणारे व्यासपीठ म्हणजे ‘नॉलेज ऑन व्हील’ उपक्रम! याद्वारे आनंददायी शिक्षण देण्याचे कार्य ‘सेवा सहयोग संस्थे’च्या माध्यमातून होत असते. विद्यार्थ्यांच्या शोधक दृष्टीतून वैज्ञानिक व चिकित्सक वृत्ती या गुणांना वाव अशा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चितच प्राप्त होतो. संस्थेचे संचालक किशोर मोघे, सुधीर पटेल, डॉ. रेड्डी, डॉ. श्रीनिवास, डॉ. पद्मा साठ्ये, जयंत जोशी, फ्लाईट लेफ्ट. चंद्रा सेन गुप्ता, राकेश गालाव, सागर पाटणकर, अपूर्वा जोशी, सुहास सहस्रबुद्धे, आनंद गौडजी, आकाश, सीमा कासार, सुजाता मराठे, डॉ. अंजली गांगल, अजिथ फिलिप अशा प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे प्रयोग मोठ्या कौतुकाने पाहत सखोल मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. नव्या पिढीला सुयोग्य आकार देण्याचे सेवाकार्य संस्थेच्या माध्यमातून घडत राहो यासाठी अनेक शुभेच्छा!
- वर्षा परब