शेती एक फायदेशीर उद्योग आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान तसेच कल्पकतेची जोड दिली, तर शेती फायदेशीर होऊच शकते. शेतकरी शालेय शिक्षणात मागे असला तरी तो शेतीत तज्ज्ञ असतो. त्याला तज्ज्ञ म्हणूनच ओळखले पाहिजे. स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी केला पाहिजे. आपल्या आधुनिक ज्ञानाचा उपयोग शेतीसाठी करून शेतीला नवीन रूप देणारी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. या क्षेत्रातही संधी आहेत आणि नवीन उद्योजकांनी याकडे आले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर शेती व शेतकर्यांसाठी 'AgriSeva 24/7’च्या माध्यमातून काम करणार्या निलेश कोकाटे यांच्याबद्दल जाणून घेऊया...
नवी मुंबईमध्ये ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन’मध्ये जनरल मॅनेजर पदावर काम करत असलेले निलेश कोकाटे. शेतकरी कुटुंबातून येऊन पुढे पुणे विद्यापीठातून त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे एमबीएची पदवी मिळवली. अनेक क्षेत्रांमध्ये उच्च पदावर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. बर्याच सरकारी, बिगरसरकारी प्रकल्पांसाठी त्यांनी काम केले आहे. एवढी मोठी पदे भूषवूनसुद्धा स्वतः एक उद्योजक व्हावे, आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी योगदान द्यावे, या अंगभूत उर्मीतून त्यांनी शेती या क्षेत्रासाठी काम करायला सुरुवात केली. याच त्यांच्या धडपडीतून एक नवीन संकल्पना उदयास आली ती म्हणजे ’AgriSeva 24/7’. शेतीचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक उपयुक्त साधन म्हणून ’AgriSeva 24/7’ काम करेल.
शेतीबद्दल बोलत असताना शेतीच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघितले पाहिजे, असे निलेश कोकाटे आवर्जून सांगतात. भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आजही भारतातल्या सर्वात जास्त लोकसंख्येला रोजगार मिळवून देणारे क्षेत्र शेतीच आहे. 2022च्या आर्थिक पाहणी अहवालातसुद्धा हे उघड झाले आहे. एवढे सगळे असूनही भारतातील सर्वात जास्त मागास क्षेत्रांमध्ये शेतीचा समावेश का होतोय? असा प्रश्न निलेश कोकाटे विचारतात. शेतीसमोर बर्याच अडचणी आहेत. सर्वात मुख्य भांडवलाची कमतरता, कुशल मनुष्यबळाची कमतरता, तंत्रज्ञानाचा आणि नवीन माहितीचा अभाव हे मुख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांबरोबरच मार्गदर्शनाचा अभाव हाही मुख्य प्रश्न आहे. शेतकर्यांच्या समोर रोज नवे-नवे प्रश्न उभे राहत असतात. त्यांच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याकडे कोणीच नसते. त्यामुळे शेतकर्यांचे खूप नुकसान होते. परिणामी उत्पादकता कमी होते. शेतीची उपेक्षितता निलेश कोकाटे एकाच वाक्यात मांडतात. “भारतात एक मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला बेरोजगारीची समस्या उग्र होत जाते आहे, तर दुसर्या बाजूला रोजगारांच्या असंख्य संधी निर्माण करण्याची क्षमता असलेले शेतीचे क्षेत्र उपेक्षित,” हे ते वाक्य.
शेती, शेतकरी यांच्याबद्दलच्या कळकळीतूनच ’AgriSeva 24/7’चा जन्म झालाय. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकर्यांच्या व्यथा, समस्या निलेश कोकाटे यांनी स्वतःहून अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे या संकल्पनेची त्यांनी जाणीवपूर्वक रचना केली आहे. मुळात शेतीची किफायतशीरता वाढवायची असेल, तर शेतीच्या प्रश्नांवर काम करणे गरजेचे आहे. शेतकर्यांच्या बाबतीत असे दिसून येते की, त्यांना हे प्रश्न ओळखताच येत नाहीत. त्यामुळे शेतकर्यांना हे प्रश्न समजावून सांगितले पाहिजेत. निलेश कोकाटे पुढे असे सांगतात की, सगळीकडे समान प्रश्न नाहीयेत. कोकणातील प्रश्न वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले प्रश्न वेगळे आहेत, मराठवाडा आणि विदर्भाचे प्रश्न वेगळे आहेत. याच्यापुढे प्रत्येक गावागावातील शेतजमीनींचे प्रश्न वेगळे असतात. सरकारी यंत्रणांची समस्या अशी आहे की, त्यांच्याकडे इतक्या खोलवर संशोधनाचा अभाव असल्याने त्यांच्या योजनांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. निलेश कोकाटे यांच्या या प्रकल्पामध्ये प्रत्येक शेतकर्याला त्यांच्या शेतीचे प्रश्न समजावून सांगून, त्याने कुठले पीक घेतले पाहिजे, खते किती वापरली पाहिजेत, पाण्याचे व्यवस्थापन या सर्वांचे मार्गदर्शन मिळू शकते. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि कृषी विद्यापीठातून पुस्तकी शिक्षण घेऊन आलेला काय बोलतोय हे शेतकर्याला समजत नाही. शेती ही सहज करण्याची गोष्ट नाहीये. एक साधा शेतकरी तुम्हाला एखाद्या पिकाची जितकी सखोल माहिती देऊ शकतो तितकी खरोखरच एखादा कृषितज्ज्ञसुद्धा कधी कधी देऊ शकणार नाही. त्यामुळे शेतीला आणि शेतकर्याला कमी लेखू नका, असे मार्मिक स्पष्टीकरण देऊन याच प्रश्नावर उपाय म्हणून हे शेतकरीच एकमेकांना मार्गदर्शन करू शकतील, अशी सुविधा ’AgriSeva 24/7’द्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे निलेश कोकाटे ठासून सांगतात. कोरोना काळामध्ये शेती याच क्षेत्राने आपल्या अर्थव्यवस्थेला तारले आहे. शेतीकडे उद्योग म्हणून बघितले पाहिजे. जर पारंपरिक शेती पद्धतीला नव्या विचारांची आणि तंत्रज्ञानाची जोड दिली, तर शेती उद्योगसुद्धा नफा देऊ शकतो आणि देतोच, असे निलेश कोकाटे सांगतात. आजकाल बरेच नवीन तरुण लोक शेती क्षेत्रात येत आहेत. शेतीमध्ये नफा मिळवण्यासाठी मुळात तुम्हाला तुम्ही घेत असलेल्या पिकाची पूर्ण माहिती पाहिजे. आपण जे पीक घेतोय ते पीक घेण्यासाठी काय बी-बियाणे लागणार आहे, पाण्याची आवश्यकता, आपल्या प्रदेशाच्या हवामानाला ते पीक अनुरूप आहे का? खते केवढी आणि किती वापरायची, कशी वापरायची? सर्वात मुख्य म्हणजे आपल्या पिकासाठी लागणारी बाजारपेठ. आपल्या पिकाला बाजारपेठ आहे का? असेल तर ती कुठे आहे? या सगळ्यांची माहिती शेतकर्याला असली पाहिजे. या सगळ्यांची माहिती असेल, तर शेतकरी आपल्या शेतीची उत्पादकता वाढवू शकतो आणि नफा मिळवू शकतो. शेतकर्याला शिक्षित केले पाहिजे तरच तो शेती क्षेत्रात प्रगती करू शकतो या शब्दांत निलेश कोकाटे शेतीबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल सांगतात. अजून एक गोष्ट ते आजच्या शेतीबद्दल सांगतात की, सध्या एकमेकांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती शेतीमध्ये वाढत आहे. एकाने जे केले तेच सगळे जण करायला घेतात ही पद्धत सर्वात आधी थांबली पाहिजे.
आजचे युग तंत्रज्ञानाचे, नवीन गोष्टींचे आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये जुन्या गोष्टी जाऊन नव्या गोष्टी उदयास येत आहेत. अनेक तरुण आपल्या नव्या कल्पना मांडत आहेत. जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर या कल्पना यशस्वी करण्याकडे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या इतर क्षेत्रांमध्ये शेती क्षेत्रसुद्धा आजच्या नव्या दमाच्या तरुणांची वाट बघत आहे, असे निलेश कोकाटे सांगतात. तरुणाईने शेतीकडे वळले पाहिजे. पुढे येऊन प्रयोग केले पाहिजेत. नव्या संकल्पना रुजवल्या पाहिजेत, आताचे जे प्रश्न आहेत त्यांना भिडले पाहिजे. त्यांच्यावर उपाय शोधले पाहिजेत. तरच शेती पुढे जाईल, शेतकरी पुढे जाईल. आतापर्यंत शेतीत रोजगार मिळत नाही, सदैव नुकसानीतलाच धंदा म्हणून अनेक तरुण गाव सोडून शहरांकडे जात होते. पण, आता कोरोना काळानंतर परिस्थिती हळूहळू बदलत आहे. लोक परत गावाकडे येत आहेत. त्यामुळे गावाकडचे आणि सर्वात महत्त्वाचे शेती उद्योगाचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि तरुणांनाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आजचा तरुण पुन्हा शेतीकडे वळतोय बघून खूप समाधान वाटते. जर अशीच प्रगती सुरू राहिली, तर येत्या काही वर्षांत शेतीचे रूप बदलले असेल, अशा शब्दांत निलेश कोकाटे आपले समाधान व्यक्त करतात.
- हर्षद वैद्य