
ठाणे : घोडबंदर रोड परिसरातील गृहसंकुलांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत असतानाही त्यावर ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. उलट टँकर माफियांना पोसण्याचेच काम सत्ताधारी आणि प्रशासन करीत आहे. या टँकर माफियांविरोधात आ. संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. १२ मार्च रोजी घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील ‘मोम्मई माँ कृपा हॉल’मध्ये ‘पाणी एल्गार परिषदे’चे आयोजन केले आहे. या ‘एल्गार परिषदेत’ शेकडो सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे ठाणे शहर चिटणीस दत्ता घाडगे आणि उत्तर भारतीय सेलचे सचिव चंद्रम्मा चौहान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ठाण्यातील घोडबंदर परिसरात पाणी व अन्य मूलभूत सुविधांची बोंब असतानाही ठाणे महापालिकेद्वारे नवीन बांधकामांना परवानग्या दिल्या जात असल्याने येथील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची बिले भरूनही पाणीटंचाईमुळे येथील गृहसंकुलांना लाखो रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च करावे लागत आहेत. याविरोधात घोडबंदर परिसरातील रहिवासी मधु नारायणन उन्नी व दत्ता घाडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश दुर्लक्षित केल्याबद्दल जानेवारीमध्ये ठाणे मनपा आयुक्तांना नोटीस बजावली होती.
तरीही, परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने पाण्यासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय घोडबंदरवासीयांनी घेतला आहे. त्यानुसार, आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘वॉर अगेंस्ट टँकर माफिया’ या लोक चळवळीच्या माध्यमातून घोडबंदर परिसरात ‘पाणी एल्गार परिषदां’चे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी पहिली ‘एल्गार परिषद’ मानपाडा प्राईड पार्क येथील सभागृहात होणार असून, या परिषदेत घोडबंदर भागातील रहिवासी आणि शेकडो सोसायट्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती घाडगे यांनी दिली.