मुंबई: महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "कळसूत्री सरकारने मांडलं पंचसूत्री बजेट" अशी प्रतिक्रिया दिली आहे. "या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. अशी घणाघाती टीका देवेंद्र यांनी केली आहे. अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातल्या सर्वच जनतेची, बार बलुतेदारांची निराशाच केली आहे. या अर्थसंकल्पाचा उपयोग फक्त वृत्त मथळ्यांपुरताच आहे बाकी काही नाही असे फडणवीस म्हणाले.
"ज्या घोषणा मागच्या वर्षी केल्या होत्या त्याच परत केल्या गेल्या आहेत, आमच्या सरकारच्या काळातल्या योजना हे सरकार सुरुवातीला बंद करत होते पण त्य्याच योजना आता नव्या स्वरूपात आणून आपल्या आहेत असे दाखवण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे." अशी खोचक टीका फडणवीसांनी या अर्थसंल्पातील घोषणांबद्दल केली आहे. मुंबई मेट्रो, समृद्धी महामार्ग या आमच्या सरकारच्या काळातल्या योजनांवर शिवसेना राष्ट्रवादीने मोठी टीका केली होती मग आता त्याच योजना पूर्ण करण्यासाठी हे सरकार नवीन तरतुदी का करत आहे असा सवालही फडणवीसांनी केला आहे.