बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नव्या पाहुण्याचे आगमन; प्रजनन प्रकल्पास चालना
10-Mar-2022
Total Views | 379
137
मुंबई (विशेष प्रतिनिधी ) - साताऱ्याहून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त (नॅशनल पार्क) 'वाघाटी'च्या ( rusty spotted cat ) पिल्लाला दाखल करण्यात आले आहे. पुण्यात उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या या पिल्लाचे संगोपन आता राष्ट्रीय उद्यानात केले जाईल. दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या या प्रजातीच्या वाढीसाठी उद्यानातर्फे 'वाघाटी प्रजनन प्रकल्प' राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे पिल्लू याठिकाणी आणण्यात आले असून त्यांच्या आगमनाने प्रजनन प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे. ( rusty spotted cat )
मार्जार कुळात समावेश असणाऱ्या 'वाघाटी'ला जंगलातील सर्वात लहान आकाराचे मांजर म्हणून ओळखले जाते. या प्रजातीच्या वाढीकरिता २०१३ पासून नॅशनल पार्क प्रशासनाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत 'वाघाटी'चा पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न केला जात आहे. अशा पद्धतीचा देशातील हा पहिलाच आणि जगातील दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आता एक 'वाघाटी' दाखल झाली आहे. सातारा वन विभागातील खंडाळा परिक्षेत्रात २ मार्च रोजी हे पिल्लू मिळाले होते. उसाच्या शेतात कापणी वेळी वाघाटीची दोन पिल्ले मिळाली होती.
या दोन पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नामध्ये एका पिल्लाला आईने परत नेले. परंतु, दुसऱ्या पिल्लाला तिने स्वीकारले नाही. त्यामुळे न स्वीकारलेल्या मादी पिल्लाला संगोपनाकरीता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पाठविण्यात आले. या पिल्लाचे वजन ८० ग्रॅम असून ते साधारण १० दिवसांचे आहे. जगातील सर्वात लहान मांजर आणि मार्जार कुळाचे उत्पतीस्थान समजले जाणाऱ्या या प्राण्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम श्रेणीचे संरक्षण मिळाले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे वाघाटी या प्राण्याचे संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे बांधकाम सुरू आहे. सध्या या केंद्रात सिद्धी आणि ऋषी या दोन प्रौढ वाघाटींचा अधिवास आहे.