मुंबई : मंगळवार, दि. १ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मालाडच्या मालवणी परिसरात असलेल्या ४० वर्ष जुन्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे भाजयुमो अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना गेल्या रविवारी ठरवले होते. त्याप्रमाणे महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेकडो शिवभक्त या जीर्णोद्धाराच्या विधीचा भाग बनले होते. तसेच मंदिरात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांनीही त्यांच्या इच्छेनुसार योगदान दिल्याचे सांगण्यात येत आहे.
"मुंबईतील हे महादेवाचे मंदिर गेल्या ४० वर्षांपासून भग्न अवस्थेत पडून आहे. हे अतिशय दुःखद आहे. या मंदिराचे भव्य स्वरूपात पुनर्निर्माण करून आपल्या धर्माप्रती आपली जबाबदारी पार पाडणे; ही आम्हा तरुणांची नैतिक जबाबदारी आहे. येत्या एक महिन्याच्या आत मंदिराचे भूमिपूजन होणार असून, या ठिकाणी भव्य मंदिर उभारताना आपण सर्वजण पाहू.", असे तिवाना यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. सर्व हिंदूंना या मंदिराच्या पुनर्बांधणीत सहभागी होण्याचे आवाहनही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.