प्रथम सायबरयुद्धाची नांदी

    01-Mar-2022   
Total Views |

cyber
जगाने महाविनाशकारी आणि विध्वसंक अशी दोन महायुद्धं अनुभवली. आज रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असले तरी यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आलेला तितकाच भीषण प्रकार म्हणजे सायबरयुद्ध. यापूर्वीही अनेक देशांनी सायबर हल्ल्यांचा निश्चितच प्रयोग केला. पण, सध्या युद्धाच्याच रणनीतीचा एक भाग म्हणून शत्रूविरोधात सायबरयुद्धातील व्हायरसने कहर केलेला दिसतो. कारण, या सायबरयुद्धासाठी ना रणभूमीची आवश्यकता आणि ना महागड्या दारुगोळ्याची. त्यामुळे अगदी घरबसल्या सायबर हल्ल्यांच्या प्रकारांना ऊत आला असून, युद्धातील नुकसानीइतकाच सायबर हल्ल्यांच्या नुकसानीचा मोठा फटका सध्या रशिया आणि युक्रेनलाही सहन करावा लागतोय.
 
युद्ध म्हटलं की, वित्तहानी आणि जीवितहानी ही अटळ! सायबरयुद्धाच्या या नव्या युद्धनीतीमध्ये, तर शत्रूची अपरिमित ‘डिजिटल’ हानी करण्याचे सामर्थ्य! त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नख लावण्याचे उद्योग सायबर युद्धखोरांमार्फत सध्या जोमात आहेत. याला बलाढ्य रशियाही अपवाद नाही आणि युद्धग्रस्त युक्रेनही. दोन्ही देशांच्या सायबर फौजांनी युद्धारंभ झाल्यापासून सायबर हल्ल्यांनीही एकमेकांना चोख प्रत्युत्तर देण्याची रणनीती अवलंबलेली दिसते. त्यामुळे यापूर्वीचे जागतिक संघर्ष आणि सध्याचे रशिया-युक्रेन युद्ध यामध्ये हा मूलभूत फरक म्हणावा लागेल.
 
२१व्या शतकातला हा काही पहिला संघर्ष नक्कीच नसला तरी आता विखुरलेल्या सायबर हल्ल्यांनी आकृतीबद्ध सायबर युद्धाचे स्वरुप धारण केलेले दिसते. त्यामुळे गेल्या वर्षी उद्भवलेला इस्रायल-पॅलेस्टाईन वाद असेल अथवा आर्मेनिया-अझरबैजान यांच्यातील संघर्षाचे सायबर हल्ल्यांपलीकडे जाऊन सायबरयुद्धात मात्र रुपांतर झाले नव्हते. पण, यंदा परिस्थिती पूर्णत: भिन्न असून, रशिया आणि युक्रेनला या अदृश्य सायबरयुद्धातून ‘डिजिटल’ संवेदनशील माहितीचे, संपत्तीचे आणि एकूणच देशाच्या ‘डिजिटल’ व्यवस्थेवर अवलंबून सर्व घटकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान ‘आ’ वासून उभे आहे. रशियाने युक्रेनची सरकारी संकेतस्थळे, सैन्याची संकेतस्थळ, बँका, आर्थिक संस्था, सरकारी माध्यमे आणि इंटरनेट पुरवठादारांना प्रथमदर्शनी लक्ष्य केले. यामुळे युक्रेनचे आधीच जमिनीवर उद्ध्वस्त झालेले जनजीवन ‘डिजिटल’ विश्वातही ‘शटडाऊन’ करण्यासाठी रशियाने कसूर सोडली नाही. खरं तर रशियाच्या ‘ग्रू’ या सरकारी समूहाने यापूर्वी असे बरेच सायबर हल्ले करून युक्रेनची डोकेदुखी वाढवली होती. २०१७ सालीही ‘नॉटपेट्या’ नावाचे मालवेअर युक्रेनला अद्दल घडविण्यासाठी निर्माण केले गेले. पण, त्याचे दुष्परिणाम युक्रेनसह जगालाही भोगावे लागले. या मालवेअरमुळे त्यावेळी दहा अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे कालांतराने समोर आले. त्यामुळे कमी खर्चात आणि अजिबात आमनेसामने न येता लढल्या जाणार्‍या या सायबरयुद्धामध्ये इतर युद्धांप्रमाणेच मोठे नुकसान करण्याची क्षमता नक्कीच आहे. त्यामुळे रशियाच्या सायबरयुद्धाला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनने आता ‘आयटी आर्मी’ उभारण्याची घोषणाही केली. त्याअंतर्गत लाखो युक्रेनवासीयांना रशियाच्या तथाकथित ‘हॅकर्स’कडून येणारे संशयित ई-मेल्स अजिबात न उघडता थेट डिलीट करण्याचा सल्लाही दिला आहे.
 
या सगळ्या प्रकारामुळे युक्रेनमधील विविध सोईसुविधा डिजिटली पुरवणार्‍या कंपन्यांचे कारभार जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये प्रामुख्याने युक्रेनमधील इंटरनेट सेवा पुरवठादारांचा समावेश असल्याने एकदा का युक्रेनमधील इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली की, आपसुकच बाहेरच्या जगाशी संपर्काची माध्यमेही कमी होतात. म्हणूनच एलन मस्क यांनी ‘स्टारलिंक’च्या माध्यमातून युक्रेनला सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट पुरवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे जर आणखीन काही दिवस हे युद्ध असेच पेटते राहिले, तर युक्रेनची संपर्क यंत्रणा कोलमडल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की! युक्रेननेही रशियाच्या सरकारी दूरचित्रवाहिनीचे संकेतस्थळ आणि इतर सरकारी आस्थापनांच्या संकेतस्थळांना लक्ष्य जरुर केले. पण, सायबरयुद्धाच्या बाबतीत रशिया हा अमेरिका, युके यांच्याही नाकीनऊ आणणारा देश असल्याने युक्रेनचा या सायबरयुद्धात निभाव लागणे तसे कठीणच! त्यामुळे एकूणच काय तर कुठल्याही देशाला आता केवळ अधूनमधून होणार्‍या सायबर हल्ल्यांना परतावून लावणारी तुटपुंजी यंत्रणा पुरेशी नाही, तर यापुढे पारंपरिक सैन्यादलाला तुल्यबळ, आधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंपूर्ण ‘सायबर सेना’ ही काळाची गरजच म्हणावी लागेल.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची