औरंगाबाद: वेरूळ लेण्यांच्या समोर उभारण्यात आलेला कीर्तिस्तंभ हटवण्यास जैन समाजाने विरोध केला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने वेरूळ लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलेला जैन कीर्तीस्तंभ हटवण्याची सूचना केली होती. ही मागणी मागे घेतली गेली नाही तर आंदोलनाचा इशारा जैन समाजाने दिला आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे की वेरूळच्या लेण्यांमध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध या तीनही समाजाच्या लेण्या आहेत. कीर्ती स्तंभ मात्र जैन धर्माचेच प्रतिनिधित्व करतो. आम्ही या जागेचं सर्वेक्षण केलेलं असून हा विनापरवानगी उभारण्यात आला असल्याची माहिती आम्हांला मिळाली आहे. तसेच हा स्तंभ मुख्य प्रवेशद्वारावरच असल्याने तेथे फेरीवाले, अतिक्रमणे यांचा त्रास होतो असे पुरातत्व सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे.
जैन सदस्यांच्या मते भगवान महावीरांच्या २५०० व्या निर्वाण महोत्सवाबद्दल १९७४ मध्ये हा स्तंभ उभारण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. 'जिओ और जिने दो' असा संदेश या स्तंभावर कोरला आहे. या स्तंभावर वेळ आणि तापमान सांगणारे घड्याळ बसवण्यात आले आहे. "जैन धर्मातील या स्तंभाची देखभाल करतात. महावीर जयंतीला आम्ही येथे जमतो उत्सव साजरा करतो हे केवळ शांततेचे प्रतीक आहे. ते का काढायचे आहे किंवा हलवायचे आहे याची आम्हांला माहिती नाही." असे वेरूळच्या श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलचे अध्यक्ष वर्धमान पांडे म्हणाले. महाराष्ट्र भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थ संरक्षण महासभेचे सरचिटणीस महावीर ठोले म्हणाले, “हे पाऊल जैन समाज तसेच इतर नागरिक स्वीकारणार नाहीत. हे स्मारक शांतता आणि अहिंसेचा संदेश देते आणि वेरुळ येथे परदेशी पर्यटक येत असल्याने ते जगभरात पोहोचते. आम्ही विरोध करू आणि ते सध्याच्या जागेवरून काढू देणार नाही.”
पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून जिल्हा प्रशासन आणि जैन समुदायाशी चर्चा चालू आहे असे सांगण्यात आले आहे.