‘वेला’ प्रदेश म्हणजेच सागरी किनारा आणि त्या आसपासचा भरती-आहोटीच्या क्षेत्रात येणारा परिसर. या परिसरामध्ये समुद्र आणि जमीन यांची सरमिसळ असते. याच परिसरामधील एक परिसंस्था म्हणजे खाडीची. महाराष्ट्राला समृद्ध खाड्यांचा ( konkan creek ) प्रदेश लाभला आहे. यामधील काही खाड्यांची आणि त्यामधील जैवविविधतेची ओळख करुन देणारा हा लेख...
खाडी म्हणजे काय?
समुद्र किनार्यालगत, मात्र अंतर्गत जमिनीवर असणारी पाणथळ जागा म्हणजे खाडी प्रदेश. महाराष्ट्राच्या किनारपट्टीक्षेत्रात 15 नद्या, पाच मोठ्या खाड्या आणि तब्बल 30 कोंडपाणी क्षेत्र म्हणजेच ‘बॅकवॉटर’ क्षेत्र आहेत. महाराष्ट्राच्या किनार्यावर मोठ्या नद्या समुद्राला मिळत नाहीत. मात्र, कुंडलिका, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री या लहान नद्या आणि वैतरणा, वसई, ठाणे, करंजा, बाणकोट, दाभोळ, जयगड, साखरतर, भाट्ये, पूर्णगड, अन्सुरे, देवगड, आचरा व कर्ली या छोट्या-मोठ्या खाड्या आहेत. या सगळ्या नद्या आणि खाडी क्षेत्रामुळे पश्चिम दिशेला अरबी समुद्रात विसर्जित होणारे विशाल नदी क्षेत्र तयार झाले आहे. या नदीमुखांचा आणि खाड्यांचा आकार जमिनीकडे निमुळता आणि समुद्राच्या दिशेने वाढत जाणारा, अर्थात त्रिभुज किंवा त्रिकोणी आकाराचा आहे. ( konkan creek )
कोकणातील किनारी क्षेत्र
महाराष्ट्राला किनारी परिसंस्थेच्या जैवविविधतेचे वरदान मिळाले. याच परिसंस्थेमधील एक परिसंस्था म्हणजे खाडी प्रदेश. कोकणातील प्रत्येक खाडीची स्वतंत्र अशी जैवविविधता पाहायला मिळते. महाराष्ट्रातीलकिनारपट्टीचा प्रदेश अर्थात कोकणचे क्षेत्र हे जेमतेम 50 किमी रुंद मात्र तब्बल 520 किमी लांब उत्तर-दक्षिण पसरलेला एक चिंचोळा भूप्रदेश आहे. याच्या पश्चिमेला अरबी समुद्राचा विस्तार आहे, तर पूर्वेकडेपश्चिम घाट आहे. कोकणात राज्यातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकण किनारपट्टीच्या तब्बल 720 किलोमीटरपैकी अंदाजे 114 किमी किनारा मुंबई, 127 किमी ठाणे-पालघर, 122 किमी रायगड, 237 किमी रत्नागिरी आणि 120 किमी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विभागला गेला आहे. ( konkan creek )
ठाणे खाडीतले फ्लेमिंगो
मुंबई बंदाराच्या नैऋत्य दिशेला असलेल्या मुखाला ठाण्याची खाडी आहे. तब्बल 26 किमी क्षेत्रावर तिचा विस्तार आहे. ठाणे खाडीचा पूर्व किनारा ठाणे व नवी मुंबईत येतो, तर पश्चिम भाग बृहन्मुंबई जिल्ह्यात येतो. उल्हास नदीचे गोडे पाणी ठाणे खाडीला येऊन मिळते. खाडीच्या भोवती कांदळवने तसेच मिठागरे आहेत. ठाण्याची खाडी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांनी गजबजते. त्यामुळेच राज्य सरकारने 2015 साली येथील 16,905 चौ.किमी खाडीक्षेत्र ठाणे खाडी ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून घोषित केले. तसेच 48.305 चौ.किमी क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. जवळपास लाखभर ‘फ्लेमिंगो’ या अभयारण्यात स्थलांतर करतात. याव्यतिरिक्त 200 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी याठिकाणी स्थलांतर करतात. अभयारण्यात कांदळवनांच्या 12 प्रजाती आणि 39 कांदळवन सहयोगी प्रजाती सापडतात. मात्र, प्रामुख्याने ‘तिवर’ नावाची कांदळवनांची प्रजात या खाडीत मोठ्या संख्यने आढळते. ( konkan creek )
शिवडीची दलदलमय खाडी
माहुल-शिवडी आणि ट्रॉम्बे खाडीतील दलदलीचा प्रदेश अरबी समुद्राला मिळालेला आहे. एकंदरीत हा पट्टा भरती-ओहोटीच्या दलदलीचा भाग आहे. या परिसरातील जमिनीकडील बाजूला सर्वत्र कांदळवने पसरलेली आहेत. एकूण विस्तार दहा किमी लांबी आणि तीन किमी रुंदी असलेला हा दलदलीचा पट्टा उत्तर गोलार्धातून स्थलांतर करून येणार्या हजारो पक्ष्यांचे हिवाळी आश्रयस्थान बनतो. त्यात विशेष करून चिखलपायट्या पक्ष्यांचा समावेश असतो. येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक रसायनांचे प्रदूषण असूनसुद्धा पक्षी येथे येतात आणि मुक्काम करतात. येथे स्थलांतर करून येणार्या पक्ष्यांची एकूण संख्या 50 हजार असावी, असे अनुमान केले जाते. याठिकाणी हजारो चिखलपायटे पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, सध्या या दलदलीपासून नवी मुंबईला जोडणारा ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ प्रकल्पाअंतर्गत सागरी पूल बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. अशाही परिस्थितीत ओहोटीच्या वेळेस हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो आणि इतर पाणपक्षी बांधकाम सुरू असलेल्या दलदलीवर अन्नग्रहण करताना दिसतात. याठिकाणी ‘तिवर’ नावाची कांदळवनाची प्रजात पाहायला मिळते. ‘सोनचिप्पी’ ही कांदळवनाची प्रजातही सापडते. इथला दलदलीचा प्रदेश समृद्ध आहे. कारण, अनेक प्रकारच्या गोगलगाईच्या प्रजाती या दलदलीवर आढळून येतात. गोगलगाईंच्या प्रजातीमधील ’बकावान रोटुंडाटा’ या प्रजातीच्या जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या प्रजननासाठी आलेल्या एकत्रीकरणाची नोंद संशोधकांनी याठिकाणाहून केली आहे. ( konkan creek )
बाणकोटच्या मगरी
रायगड आणि रत्नागिरीला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्यासाठी बाणकोट खाडी ओळखली जाते. या खाडीच्या पात्रालगत पडवे, उंबरशेत, पंदेरी, निगडी, गोठे, उमरोली, शिपोळे, वेसवी आणि बाणकोट ही लहान गावे आहेत. साठच्या दशकात आंबेतमार्गे वेसवीपासून मुंबई अशी जलवाहतूक होती. मात्र, रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यानंतर ही जलवाहतूक बंद झाली. महाबळेश्वरामध्ये उगम पावणार्या सावित्री नदीच्या मुखाशी बाणकोटच्या खाडीचे विशाल क्षेत्र पसरलेले आहे. खाडीतला मगरींचा अधिवास हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ‘मार्श क्रोकोडाईल’ प्रजातीच्या मगरी खाडीच्या ‘बॅकवॉटर’मध्ये सापडतात. अशा परिस्थितीत मगरींचा अधिवासाशी छेडछाड न करता इथल्या स्थानिकांनी मानव-मगर सहजीवनाचे नाते जपले आहे. कांदळवनाचे दाट जंगल आपल्याला या खाडीच्या दोन्ही किनार्यांवर दिसते. कांदळवनामधील ‘रायझोफोर मुक्यॉनाटा’ म्हणजेच लाल कांदळांची प्रजात बाणकोट खाडीत मोठ्या प्रमाणात आढळते. या प्रजातीच्या पसरलेल्या मुळांना आधारमूळ म्हणतात आणि ती एखाद्या पुष्पगुच्छासारखी दिसतात. या कांदळवनाच्या झाडाला दुरून पाहिल्यानंतर ते चालत असल्याचा आभास निर्माण होतो म्हणून त्याला ‘वॉकिंग मँग्रोव्ह’ असेदेखील म्हटले जाते. ‘ब्लॅक कॅप किंगफिशर’ या दुर्मीळ पक्ष्याचे बाणकोटची खाडी हे हक्काचे घर आहे. ( konkan creek )
दाभोळ खाडीतला काळा बगळा
दाभोळ खाडीची लांबी 70 किलोमीटर इतकी असून ही खाडी दापोली, चिपळूण, खेड, गुहागर या तालुक्यांमधून वाहते आणि पुढे या खाडीचा वाशिष्ठी नदी सोबत संगम होतो. वाशिष्ठी ही तिवरे गावातून 900 मी. इतक्या उंचावरून वाहते आणि दाभोळ खाडीत समाविष्ट होते. दाभोळ खाडी विस्ताराने खूप मोठी आहे आणि तिच्या विस्ताराइतकीच तिची जैवविधता सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. दाभोळची खाडी ही कांदळवनाच्या प्रजातींसाठी सर्वात श्रीमंत खाडी म्हणून ओळखली जाते. त्याचे कारण म्हणजे तिथे आढळणार्या कांदळवनाच्या प्रजाती. जवळपास 45 किमी एवढा खाडीचा काठ हा कंदळवन प्रजातींनी बहरला आहे. दाभोळ खाडीअंतर्गत येणारी गावे जसे की, नवसे, ओणी, भाटी, उसगाव, साखरी, कारूळ, उंबरघर, भोपण, पेवे, पांगारी, वडद आणि भडवळे येथे कांदळवनांची 10 ते 15 मी उंच अशी दाट वृक्ष पहायला मिळतात. दाभोळ खाडीमध्ये प्रामुख्याने आढळणारा पक्षी म्हणजे समुद्री काळा बगळा म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला ’थशीींशीप ीशशष हशीेप’ म्हणतात. ढोर बगळा, राखी बगळा, खरबा बगळा, मध्यम बगळा, कवड्या खंडया असे अनेक पक्षी या भागात सापडतात. दाभोळ खाडी लगत राहणारे लोक हे भोई, खारवी, कोळी समाजाचे आहेत. या लोकांचे प्रमुख व्यवसाय हा मासेमारी. त्यामुळे हे लोक संपूर्णपणे खाडी वर अवलंबून आहेत. खाडीमध्ये कांदळवनाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे या खाडीमध्ये भरपूर प्रमाणात मासेमारी होत असे. मात्र, आता सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे खाडीतले मासेमारीचे प्रमाण घटले आहे. ( konkan creek )
अणसुर्याची खाडीतील उपजिवीका
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर रत्नागिरीपासून अंदाजे 70 किमी. अंतरावर आदमासे साडेसहा किलोमीटर लांब आणि 250 ते 300 मी. रुंद अणसुर्याची खाडी आहे. जैवविविधतेने अतिशय समृद्ध, दलदल जमीन आणि खारफुटींकरिता ही खाडी विशेषत: तिचा उत्तर किनारा प्रसिद्ध आहे. ‘कांदळ’ आणि ‘कॅण्डेलिया कॅण्डल’ प्रजातीच्या कांदळवनाची वृक्ष या खाडीत आपल्याला मोठ्या संख्येने आढळून येतात. या खाडीच्या किनार्यांवर वसलेल्या गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समितींची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांच्या माध्यमातून स्थानिकांना प्रशिक्षण देऊन काही उपजीविकेच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खेकडा पालन, कालवे पालन आणि जिताडा पालनासारख्या योजनांचा समावेश आहे. ही खाडी जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावी, शिवाय महत्त्वाच्या किनारी आणि सागरी जैवविविधता क्षेत्रांच्या सूचीमध्ये सामील व्हावी, याकरिता स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. ( konkan creek )
आचरा खाडीतील देवराई
आचरा नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी कणकवली व देवगड तालुक्यांतून साधारण पूर्व-पश्चिम अशी वाहते. या नदीच्या मुखाशीही छोटीशी खाडी तयार झाली असून ती आचर्याची खाडी म्हणून ओळखली जाते. ही नदी कणकवली व मालवण तालुक्यांमधून वाहणार्या गड नदीला साधारण समांतर आहे. आचरा खाडीत समृद्ध असे कांदळवनाचे जंगल आहे. लाल कांदळ प्रजातीचे झाडे याठिकाणी प्रामुख्याने आढळत असली, तरी दुर्मीळ अशी लाल चिप्पीची झाडे या खाडीत आढळतात. या खाडीतला कांदळवनाचा काही भाग गावकर्यांनी देवराई म्हणून जपला आहे. या खाडीत कांदळवनाची सफरदेखील करता येते. स्थानिकांकडून आपल्याला या खाडीच्या जैवविविधतेचे दर्शन घडवण्यासाठी बोटीने सफर घडवली जाते. ( konkan creek )
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.