भारतविरोधी भूमिका घेणार्‍या ‘ह्युंदाई’ला अद्दल घडवायलाच हवी!

    07-Feb-2022   
Total Views |

hyundai-controversy
 
 
 
ज्या देशामध्ये ‘ह्युंदाई’ कंपनी दरवर्षी पाच लाख मोटारींची विक्री करते, त्या कंपनीच्या पाकिस्तानमधील कंपनीस ‘काश्मीर सॉलिडॅरिटी डे’चा पुळका का आला? ‘ह्युंदाई’ला लक्षात राहील अशी अद्दल भारत कधी घडविणार, याकडे भारतीयांचे आता लक्ष लागले आहे.
 
 
मोटारींची निर्मिती किंवा विक्री करणार्‍या उद्योगाने आपली मर्यादा सोडून वागता कामा नये, तसेच ज्याच्याशी आपला काही संबंध नाही अशा गोष्टींमध्ये नाक खुपसू नये, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. पण, सगळ्यांच्या ते लक्षात येतेच असे नाही, तर काही लक्षात येऊनही मुद्दाम तसे वागतात. मग असे ‘उद्योग’ करणार्‍यांना त्याची किंमत मोजावीच लागते. ‘ह्युंदाई पाकिस्तान’ या कंपनीच्या बाबतीत असेच घडले. या कंपनीने दि. ५ फेब्रुवारी रोजी विविध समाजमाध्यमांवर काश्मीर भारतापासून वेगळे करण्याची मागणी केली. एवढ्यावरच ही ‘मोटार’ कंपनी थांबली नाही, तर या कंपनीने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या अतिरेक्यांना पाठिंबाही देऊ केला. पाकिस्तान हा देश दि. ५ फेब्रुवारी या दिवशी ‘काश्मीर सॉलिडॅरिटी डे’ पाळत असतो. त्यानिमित्ताने काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न त्या देशाकडून होत असतो. पण, त्यामध्ये ‘ह्युंदाई पाकिस्तान’ या कंपनीनेही पडावे? फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर संदेश टाकून, काश्मीरमधील लढ्याच्या मागे आपण उभे राहिले पाहिजे, त्या लढ्यास पाठबळ द्यायला हवे, असे या कंपनीने म्हटले आहे.
 
 
 
या कंपनीने ट्विटरवर टाकलेल्या आपल्या संदेशामध्ये, “आपल्या काश्मिरी बांधवांनी जे बलिदान दिले त्याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. ते स्वातंत्र्यासाठी लढत असून त्यांच्या पाठीशी आपण उभे राहायला पाहिजे,” असे म्हटले आहे. ‘ह्युंदाई पाकिस्तान’ ‘काश्मीर सॉलिडॅरिटी डे’, असे या संदेशात शेवटी म्हटले आहे. ‘ह्युंदाई पाकिस्तान’ने जो खोडसाळपणा केला आहे, त्याची तीव्र प्रतिक्रिया भारतात, तसेच नेटिझन्समध्ये उमटली. ज्या अतिरेक्यांनी अनेक वीर जवानांची आणि निरपराध नागरिकांची हत्या केली, त्यांच्यामागे ‘ह्युंदाई’ कंपनी कशी काय उभी राहते, असा प्रश्न करुन ‘ह्युंदाई इंडिया’ वर संपूर्ण बहिष्कार टाकायला हवा, अशी मागणीही समाजमाध्यमांवरून करण्यात आली. ‘हिंदू युवा वाहिनी’, गुजरातचे प्रभारी योगी देवनाथ यांनी ‘ह्युंदाई’ कंपनीचे हे वर्तन सहन करता कामा नये, असे म्हटले आहे. ‘आझाद काश्मीर’चा ही कंपनी पुरस्कार करीत आहे. आमच्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणार्‍या या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या कंपनीला भारतातून बाहेर काढा. त्यांना पाकिस्तान समवेतच व्यापार करु द्या, असेही ‘हिंदू युवा वाहिनी’च्या या नेत्याने म्हटले आहे. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदरसिंग बग्गा यांनी ‘ह्युंदाई’वर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे.
 
 
 
‘ह्युंदाई’ ही कंपनी भारतामध्ये दरवर्षी पाच लाख मोटारींची विक्री करते, तर पाकिस्तानात फक्त आठ हजार मोटारींची विक्री करते. भारतात एवढ्या मोठ्या संख्येने ‘ह्युंदाई’ मोटारींची विक्री करणार्‍या या कंपनीस एवढी मस्ती कोणाच्या जीवावर आली? ‘ह्युंदाई’ने समाजमाध्यमांवर जे संदेश टाकले आहेत, ते मागे घ्यावेत आणि झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केली आहे. ‘ह्युंदाई’ कंपनीस या प्रकाराबद्दल भारतात जबर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. एवढा सर्व प्रकार घडल्यानंतर ‘ह्युंदाई इंडिया’ कंपनीने आपला या प्रकाराशी काहीच संबंध नसल्याचा आव आणून समाजमाध्यमांवर जी चर्चा सुरु आहे, त्याबद्दल तकलादू स्पष्टीकरण केले आहे. ‘ह्युंदाई पाकिस्तान’च्या वार्ताबद्दल या कंपनीने काही स्पष्टीकरण दिले नाही किंवा झाल्याप्रकारबद्दल दिलगिरीही व्यक्त केली नाही. “आम्ही भारतामध्ये २५ वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करीत आहोत. राष्ट्रीयत्वाचा आदर राखण्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. या संदर्भात ‘ह्युंदाई मोटर्स इंडिया’च्या संदर्भात जी चर्चा होत आहे ती अप्रस्तुत, अनाठायी आहे. ‘ह्युंदाई’साठी भारत हे दुसरे घर आहे. असंवेदनशील माहितीबाबत ‘ह्युंदाई’चे शून्य सहिष्णुता धोरण आहे. आम्ही अशा दृष्टिकोनाचा तीव्र निषेध करतो,” असे या कंपनीने म्हटले आहे. पण, काश्मीरबाबत ‘ह्युंदाई पाकिस्तान’ने समाजमाध्यमांवर जे आक्षेपार्ह संदेश टाकले आहेत, त्याबद्दल भारतातील ‘ह्युंदाई’ला काहीच स्पष्टीकरण द्यावेसे वाटले नाही. ज्या देशामध्ये ‘ह्युंदाई’ कंपनी दरवर्षी पाच लाख मोटारींची विक्री करते, त्या कंपनीच्या पाकिस्तानमधील कंपनीस ‘काश्मीर सॉलिडॅरिटी डे’चा पुळका का आला? ‘ह्युंदाई’ला लक्षात राहील अशी अद्दल भारत कधी घडविणार, याकडे भारतीयांचे आता लक्ष लागले आहे.
 
 
 
हिजाबविरोधी आंदोलन पसरू लागले!
कर्नाटकमधील उडुपी येथे मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाबसह वर्गामध्ये प्रवेश देण्यास नकार दिल्यावरून काँग्रेस, काही मुस्लीमधार्जिण्या संघटना यांनी त्याविरुद्ध आवाज उठविला असला तरी हिजाबला विरोध करणार्‍या आंदोलनाचे लोण राज्यातील अन्य भागांमध्ये पसरत असल्याचे दिसून येत आहे. विजयपूरमधील ‘शान्तेश्वर एज्युकेशन ट्रस्ट’ या शिक्षण संस्थेमधील काही विद्यार्थी हिजाबला विरोध करण्यासाठी भगवी उपरणे घालून आली. हे पाहून सदर शिक्षण संस्थेने वर्गांमधून शिक्षण देणे थांबविले. सर्वांना समान वागणूक देण्याचे शासनाचे धोरण स्वागतार्ह आहे. ते लक्षात घेऊन आमच्या भावा-बहिणींना पाठिंबा देण्यासाठी आम्ही भगवी उपरणे घालून आल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. हिजाबचा आग्रह धरणार्‍यांना विरोध करण्यासाठी कर्नाटकातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी भगवी उपरणी घालून आपल्या शिक्षण संस्थांमध्ये जात आहेत. दरम्यान, उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील शासकीय पी यु महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींची, हिजाबसह आपल्याला वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा, ही मागणी कायमच आहे. कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी, वर्गामध्ये भगवी उपरणी वा हिजाबला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कर्नाटकचे एक अन्य मंत्री व्ही. सुनील कुमार यांनी, “शासकीय शिक्षण संस्थांच्या परिसरासाठी जी समान पद्धती आहे, त्याचे प्रत्येकाने पालन करावयास हवे,” असे म्हटले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या वादात उतरुन, हिजाबवर निर्बंध आणून तुम्ही मुलींना शिक्षणापासून वंचित करीत आहेत, असे वक्तव्य केले होते, तर मुस्लीम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा हिजाबला विरोध करण्यामागील उद्देश असल्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
 
 
 
पण, कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी पत्रकारांशी बोलताना जे सांगितले तेही महत्त्वाचे आहे. यापूर्वी कोणी हिजाब परिधान करून येत नव्हते. गेल्या २० दिवसांपासून हा वाद सुरु झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याच दरम्यान, ‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक असलेला मुहम्मद जमीर हा हिजाब/बुरखा यासंदर्भात चुकीची, खोटी माहिती देऊन लोकांना भडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिक्षण संस्थांच्या परिसरात हिजाब परिधान करण्याच्या अधिकारासंदर्भात केलेल्या याचिकेवर आज कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
 
 
स्वरसम्राज्ञीचे वृत्त देताना ‘कद्रूपणा!
भारतातील आघाडीच्या वृत्तसंस्थांपैकी ‘पीटीआय’ ही एक. बातम्या देताना या वृत्तसंस्थेला कोणाचा जास्त पुळका येईल आणि कोणाची बातमी दिल्याचा केवळ सोपस्कार पार पाडला जाईल, हे काही सांगता येत नाही. याबाबतचे ताजे उदाहरण म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त. दि. ६ फेब्रुवारी या दिवशी लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त देताना ‘पीटीआय’ने जे ट्विट केले, त्यावरून समाजमाध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ‘पीटीआय’ने जे ट्विट केले त्यामध्ये, ‘लता मंगेशकर इज डेड, सिस्टर उषा मंगेशकर टेल्स पीटीआय’ असे म्हटले होते. ‘पीटीआय’ने हे ट्विट करताना जी भाषा वापरली ती पाहता, या वृत्तसंस्थेला या महान गायिकेबद्दल काहीच आदरभाव नसल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटली. ‘एनडीटीव्ही’चे कार्यकारी संपादक आशिष शर्मा यांनी इंग्रजी भाषा एवढी संवेदनाशून्य, दरिद्री आहे का, असे ट्विट यासंदर्भात केले. अनेकांनी ‘पीटीआय डेड’ असे ट्विट करुन उत्तर दिले आहे. बातमी देताना ‘पीटीआय’ने पक्षपातीपणा केल्याचे या ट्विटवरून दिसून येते.
 
 
 
ही वृत्तसंस्था कसा पक्षपातीपणा करते ते अन्य एका उदाहरणावरून दिसून येते. गेल्या वर्षी पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांच्या निधनाचे ट्विट करताना ‘पीटीआय’ने या पाकिस्तानी व्यक्तीची भरपूर स्तुती आपल्या ट्विटमध्ये केली होती. ‘पाकिस्तानी आण्विक कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे ए. क्यू. खान यांचे इस्लामाबाद येथील रुग्णालयात अल्पशा आजारानंतर निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते,’ अशा आशयाचे ट्विट ‘पीटीआय’ने केले होते. लतादीदी यांच्या निधनाचे वृत्त देताना जी भाषा वापरली गेली, त्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली. हे वृत्त देताना जी भाषा वापरली, ती लता मंगेशकर यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी मुळीच नव्हती, असे मत काहींनी समाजमाध्यमांवर व्यक्त केले.
 
 
 
दि. १५ जून, २०२० रोजी गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षानंतर भारताची बाजू जगापुढे मांडण्याऐवजी या वृत्तसंस्थेने चिनी राजदूतासाठी आपल्या वृत्तसंस्थेचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. भारताविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी चिनी राजदूताने या संधीचा पुरेपूर फायदा उठविला. ‘पीटीआय’ने भारतातील चिनी राजदूताची मुलाखत प्रसिद्ध केली. त्या मुलाखतीमध्ये चिनी राजदूताने गलवान संघर्षास भारतच जबाबदार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन भारताकडूनच झाले, असा आरोपही या चिनी राजदूताने आपल्या मुलाखतीत केला होता. ‘पीटीआय’ ही भारतीय वृत्तसंस्था. त्या वृत्तसंस्थेने भारताची बाजू भक्कमपणे मांडायचा प्रयत्न करायचा की चीनला लाभदायी ठरेल, अशी त्या देशाच्या राजदूताची मुलाखत प्रसिद्ध करायची? लतादीदींचे वृत्त ज्या कोरडेपणे ‘पीटीआय’ने दिले, त्यावरून पूर्वीच्या काही घटनाही पुढे आल्या. आपल्या अशा वर्तनात बदल केला तरच आपली विश्वासार्हता टिकून राहील, हे अशा वृत्तसंस्थांच्या लक्षात कधी येणार?
 
 
९८६९०२०७३२
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.