कोरोनामुळे मुंबईतील वस्त्यांवरील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

ऑनलाईन हजेरीच लागत नसल्याने विद्यार्थ्याला शाळेतून काढले ; विद्यार्थ्यांचा आरोप

Total Views |

mankhurd
मुंबई: कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणाचा सर्वाधिक फटका मुंबईतील झोपडपट्टी आणि वस्त्यांवरील मुलांना बसला. घरात मोबाईल नसल्याने ऑनलाईन हजेरीच नसलेल्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले तर कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्या पालकांच्या मुलांकडे फी भरायला पैसेच नसल्याने काही मुलांना परीक्षाच देता आल्या नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तर अनेकांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले. हीच परिस्थिती मूंबईतल्या अनेक वस्त्यांमध्ये असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ती ज्योती साठे हिने दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.
मानखुर्दमधील अण्णाभाऊ साठे वस्तीमध्ये अनेक कटुंबीय वास्तव्यास आहेत. यात प्रामुख्याने घरकाम करणाऱ्या महिला, छोटी-मोठी रोजंदारीचे काम करणारे पुरुष अशी कुटुंबीय वास्तव्यास आहेत. त्यामुळे याभागात सर्वाधिक मुलं ही शेजारीच असणाऱ्या पालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत तर काहीना शक्य असल्यास परिसरातील खासगी शाळेत शिकत आहेत. कोरोनाच्या काळात अचानक शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले.
याचकाळात ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचणी असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. मात्र याही परिस्थतीत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी ज्योती साठे ही तरुणी आशेचा किरण ठरली. ज्योतीने आपल्या वस्तीतील मुलांना वाचायला मिळावे, अभ्यास करता यावा यासाठी एका छोट्या जागेवर दिशा ज्योत फाऊंडेशनच्या माध्यमातून एक अभ्यासिका सुरु केली. सध्या याच अभ्यासिकेत मुलं वाचन, लिखाण आणि इतर अभ्यासपूर्वक खेळ आणि साहित्य अशा सर्व शालेय गोष्टींचा अनुभव घेत आहेत.
प्रशासनाला ४ प्रश्न
- ऑनलाईन शिक्षण देत असताना वस्त्यांवरील मुलांसाठी शैक्षणिक धोरण काय?
- कोरोनाकाळात अर्ध्यावर शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मूळ प्रवाहात कसे आणणार ?
- मुंबई महापालिकेचे वस्त्यांवरील मुलांच्या शिक्षणासाठीचे धोरण काय?
- मुंबई महापालिका वस्त्यांचे सर्व्हे करणार काय?
कोरोनानंतर शाळा बंद झाल्या. मी आठवीत होतो. मोबाईल नसल्याने शाळा कधी सुरु झाली कळलंच नाही. मला शाळेतून काढून टाकलं कारण माझी हजेरीच लागत नव्हती. माझ्या एका मित्राच्या फोनवर शाळेने निरोप पाठवला आणि मला शाळेत बोलावून घेतलं. मला दुसऱ्या शाळेत पाठवलं होतं. मात्र तिथल्या टीचरचा नाव मला माहित नव्हतं एक सर होते ओळखीचं त्यांच्याशी मी बोललो. त्यांनी मला सांगितलं की तू नववीत गेला आहेस. तुला टीचरच नाव माहित नव्हतं कारण ऑनलाईन मला शाळेचे तास करता आले नाही. मला त्या टीचरने शाळेत बोलवून घेतलं. मी वर्गात जाऊन बसलो तर त्यांनी मला ऑफिसात नेलं. माझी सही घेतली आणि दाखला हातात दिला. आता वर्ष झालं मी काहीच करत नाही इथे अभ्यास करत बसतो. मला शाळेत जायचं आहे.

- ओमकार पारखे, विद्यार्थी
गेल्यावर्षी मी दहावीत होते. पण कोरोनामुळे शाळा बंद होत्या. माझ्याकडे फोनही नव्हता. म्हणून मी या सेंटरवर आले. इथे आम्ही अभ्यास करत बसायचो. कोरोनाकाळात फक्त ३ महिने आम्हाला ऑनलाईन शिकविण्यात आले. यावेळी शिक्षक नसायचे. आम्हाला काहीही कळलं नाही. माझं हे वर्ष ड्रॉप आऊट झालं कारण शाळेनं सांगितलं आम्हाला पूर्ण वर्षाची फी पाहिजे. फी भरली नसल्याने माझं निकालचं शाळेनं दिला नाही. त्यामुळे यावर्षी मला कुठेही प्रवेश घेता आला नाही.
- सिमरन, विद्यार्थिनी
ऑनलाईन शाळा सुरु असताना घरात एक मोबाईल होता. पण माझे ३ मुलींचे एकाचवेळेस तास असले की कोणाला फोन द्यावा हा प्रश्न असायचा. आमची घर छोटी आहेत चाळीतली मुलांना अभ्यासच करता येत नव्हता. आमच्याकडे फोन आहे आम्हाला कळत शाळा सुरु आहेत बंद आहेत. मात्र ज्यांच्याकडे फोन नाहीत आमच्याइथे त्या मुलांचं यामुळे नुकसान होतं. त्यांना काळातच नाही शाळा सुरु आहेत की बंद आहेत. शाळेत या सांगतात आणि शाळेत शिक्षकच नसतात तेव्हा आम्ही काय करायच?
- ज्योती बल्लाळ, पालक
साडेसहा हजारांची ही वस्ती आहे. या वस्तीत स्मार्टफोन खूप कमी लोकांकडे तुम्हाला दिसेल. कोरोनाआल्यानंतर जी काही बचत होती त्यातून अनेक पालकांनी मुलांसाठी फोन घेतले. पण मुलांना काहीही कळत नव्हतं. इथे छोटी घर आणि मोठी कुटुंब असं आहे. मग सर्व घरात मुलांना मारहाण केली जायची. मुलं मानसिक तणावात जणू नये त्यांना अभ्यासाकडे वाळवावे याहेतूने मी हे सेंटर सुरु केलं. मला वाईट तेव्हा वाटलं की नववीतला मुलगा २ वर्षपूर्वी तो नववीत होता. अजूनही तो नववीत आहे आणि त्याला अचानक दाखल दिला जातो. बीएमसी शाळेत जातो तो आणि सांगतोय की माझी ऐपत नाही फोन घ्यायची त्यामुळे मी नाही हजर राहू शकलो ऑनलाईन. पण मी आता शाळेत येतो मला तुम्ही शाळेत ठेवा. तर शिक्षकांनी त्याच्या हातात दाखल दिला. आम्ही कोरोननांतर एक सर्व्हे केला ज्यातून एका घरात असणारी मुलं, शाळेत शिकणारी मुलं आणि कोरोनानंतर शाळा सोडलेली मुलं याचीमाहिती प्रत्येक घरात जाऊन घेतली. तर त्यात ४०० ते ५०० मुलांनी कोरोननंतर शाळा सोडल्या आहेत. किंवा त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. यात १ ली ते १० वीच नाहीतर उच्च माध्यमिकचे विद्यार्थीही यात आहेत. इथे एकच बीएमसी ची शाळा आहे. कोरोनानंतर पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. सरकरने याचाही बविचार करावा आणि या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करावे.
- ज्योती साठे, संचालिका, दीपज्योती फाऊंडेशन
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.