निसर्गदत्त चित्रकार प्रा. वसंत सोनवणी

    05-Feb-2022
Total Views | 81
 
निसर्गदत्त चित्रकार प्रा. वसंत सोनवणी
 
या वर्षीच्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या ‘व्यावसायिक कलाकार’ विभागाद्वारे, ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या भव्य प्रदर्शन कक्षात महाराष्ट्रातील कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ चित्रकार प्रा. वसंत सोनवणी यांच्या कलाविषयक योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत, कलासंचालनालयातर्फे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शासनातर्फे अशा ज्येष्ठ कलाकारांस एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येते. हा सन्मान अशा प्रदर्शनाचे औचित्य साधून दरवर्षी करण्यात येतो. मात्र, दरवर्षी महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ कलाकाराची निवड तज्ज्ञ समितीमार्फत केली जाते.
नाशिक जिल्ह्यातील निफाडचे वसंत सोनवणी यांचे शालेय शिक्षण नाशिक येथील मल्टिपर्पज सरकारी शाळेत झाले आणि एका हितचिंतकाच्या सल्ल्यानुसार ते मुंबईच्या ‘सर जे. जे. स्कूल’ येथे चित्रकलाशिक्षणाचा डिप्लोमा करण्यासाठी दाखल झाले. वास्तविक त्यांना मूर्तिकला शिकण्यासाठी मुंबईत यायचे होते. परंतु, चित्रकलेची पदविका त्यांनी उत्तम गुणांनी यशस्वी केली. ज्ञान अणि कलापिपासु वसंत सोनवणी यांनी विविध विषयांतील म्हणजे ‘म्युरल आर्ट’, ‘आर्ट मास्टर’, ‘ग्राफीक’, ‘फोटोग्राफी’ आदी विषयांतही पदविका प्राप्त केल्या आणि वांद्रे येथील ‘रहेजा स्कूल ऑफ आर्ट’मध्ये त्यांनी कलाध्यापक म्हणून सुरुवात केली.
‘गुरू-शिष्य’ परंपरेवर विश्वास असणार्‍या आणि गुरूंना श्रद्धास्थानी ठेवणार्‍या प्रा. वसंत सोनवणी यांचे कलाध्यापनाचे कौशल्य वादातीत आहे. ‘गुरुस्तु मौनं व्याख्यानम्’ हे संस्कृत वचन फार पूर्वीपासून प्रचलित आहे. ‘स्पष्टपणे न बोलताही गुरुच्या मौनाचा अर्थ शिष्यांपर्यंत पोहोचतो आणि शिष्य त्याच्या आचरणात गुरुने दिलेले संकेत आवर्जून आणतो.’ या गुरु-शिष्याच्या या मूक संवादाला प्रा. वसंत सोनवणी फार महत्त्वाचे स्थान देतात. आजचा विद्यार्थी आधुनिक तंत्रसाधनांमुळे ज्ञान मिळवित जरी असला, तरी त्याच्या बुद्धीचा खरा विकास हा त्याच्या गुरूंमुळे होत असतो.
याचं महत्त्व आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये कमी कमी होताना दिसते, असं प्रा. सोनवणी सरांना नेहमी वाटते. याबद्दलचं निरीक्षण नोंदविताना त्यांनी अनेकदा खंत व्यक्त केली आहे. यावर्षीचा त्यांचा सन्मान म्हणजे सध्या महाराष्ट्रातील सुमारे 300 कला महाविद्यालयांमध्ये प्रामाणिकपणे कलाध्यापन करणार्‍या तमाम कलाध्यापकांचा प्रातिनिधिक सत्कारच आहे.
पूर्वी म्हणजे २०१४ पूर्वीपर्यंत दि. ५ सप्टेंबरच्या ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्ताने, कला संचालनालयाअंतर्गत असलेल्या शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कला महाविद्यालयांतील एका ज्येष्ठ प्रयोगशील कलाध्यापकाला ‘आदर्श कलाशिक्षक’ नावाने पुरस्कार दिला जायचा. नंतर ही शासकीय प्रोत्साहन परंपरा का बंद पडली, हा प्रश्न इतर अनेक प्रश्नांप्रमाणे अनुत्तरितच राहणार, हे ओघाने आलेच. तथापि प्रा. वसंत सोनवणी सरांच्या सन्मानाने, महाराष्ट्रातील प्रयोगशील कलाध्यापकांना आनंद झाला असणार, एवढं निश्चित!
प्रा. वसंत सोनवणी यांच्या कलाप्रवासाबद्दल त्यांना मागे वळून पाहताना तुम्ही काय सांगाल, असा एक ओघानेच येणारा प्रश्न जेव्हा विचारला, तेव्हा ते म्हणाले, “मी अत्यंत समाधानी आहे. माझे काही राहून गेले, असं मला वाटत नाही. कारण, कला ही माणसं बांधते. सगळं संपेल, परंतु, कला साथ देईल,” हे त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले. “कला निर्माण होते, ती स्वत:मध्ये असलेल्या सूत्रगुणांमुळे आणि अदृश्य इच्छाशक्तींमुळे. ती विविध पर्यायांच्या रुपाने दिसून येते. मीही माझ्या भावना आणि इच्छा, रंगाकार आणि पोत यांच्यामार्फत व्यक्त करीत आलो,” हे सांगताना चित्रकार प्रा. वसंत सोनवणी यांच्यातील कलाध्यापक सृजनशील कलाकार आणि सामाजिक भान जपणारा समाजसेवक प्रकट होत होता, खरं आहे. अभिजात कला आत्मसात करण्यासाठी दीर्घ प्रशिक्षणांची आवश्यकता असते. हे दीर्घ प्रशिक्षण आपणांस कळायला हवं. प्रयोगशील वृत्ती असेल, तर निसर्ग आपणांस खूप काही शिकवित असतो.
प्रा. वसंत सोनवणी यांच्या कलाकृतीतील ‘वसंत’ हा षडऋतूंच्या प्रत्येक वातावरणात फुललेला असतो. सतत आणि सातत्याने सृजन हा केवळ दैवी चमत्कारच म्हणावा. वेगवेगळ्या अमूर्तकारांची गुंफण करणार्‍या त्यांच्या रंगमालिका म्हणजे फुलणार्‍या वसंताची चाहूलच असतात. मग, भगव्या गुलमोहराचा अट्टाहास असो की, निळ्या आकाशाचा गहिरेपणा असो, कधी मातीचा तांबडा वा लालसर, तपकिरी गंध असो, वा पाण्याचा गडद हिरवा, कुठे कुठे शुभ्रतेचा पांढरा, पारदर्शकतेकडे घेऊन जाणारा... हे सारं पाहताना कलारसिक नि:शब्द असतो आणि फुललेल्या वसंताच्या पालवीचा सुगंधी दरवळ अनुभवास येत असतो.
प्रा. वसंत सोनवणी म्हणजे एक नितळ पारदर्शी आरसाच! लहान-मोठा, ओळखी-अनोळखी, गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही विशेषणाच्या दबावाखाली न येता मनमोकळ्या गप्पा करणारा, लोण्याच्या गोळ्याप्रमाणे ओघळणारा, सहृदयी-सर्जनशील, परंतु कलावंतामधील माणूसपणाला जीवंत ठेवणारा कलाध्यापक! त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणार्‍याला त्यांच्याशी खूप जुनी ओळख असल्याचा अनुभव येतो. कलाकाराच्या स्वभावाचे आणि प्रकृतीचे प्रतिबिंब हे सोनवणी सरांच्या कलाकृतीद्वारे प्रकट होताना दिसते. म्हणूनच व्यक्ती म्हणून आणि दृश्यकलाकार म्हणून ते त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून व्यक्त झालेले दिसतात.
प्रा. सोनवणी सरांसारखे चित्रकार जेव्हा निसर्गात फिरतात, जनमानसात-समाजात वावरतात, तेव्हा ते त्यांच्या निरीक्षणाद्वारे सर्व आठवणी साठवून ठेवतात. त्याचे परिमार्जन वा पडसाद त्यांच्या ‘कॅनव्हास’वर व्यक्त होतात. विविध आकारांद्वारे उमटत असतात. अगदी एखाद्या वस्तूवर पडलेला प्रकाशकिरणदेखील त्यांच्यातील चित्रकाराला प्रभावित करतो. त्याच विचारातून त्यांची कलाकृती ही जनसामान्य कलारसिकांपर्यंत संवाद साधते. वस्तूचा पोत, उचित रंगाच्या मिश्रणातून निर्माण होणारा आकार आणि मनातील भाव-भावना यांच्या त्रिवेणी संगमातून त्यांची कलाकृती न्हाऊन निघालेली असते. अशा अव्याहत, अथक प्रयोगशीलतेच्या स्वभावाच्या प्रा. वसंत सोनवणी यांच्या कलाकृतींच्या शृंखला म्हणजे दरवर्षी येणार्‍या परंतु बाराही महिने टिकून राहणार्‍या वसंताप्रमाणे नवचैतन्य निर्माण करणार्‍याच असतात.
मुंबईतील त्यांना लाभलेल्या गुरूंपैकी शंकर पळशीकर, संभाजी कदम यांच्यासारख्या त्यावेळच्या ‘जे. जे. स्कूल’मधील ज्येष्ठ कलाध्यापक आणि कला शिक्षकाचा सहवास ते आवर्जून सांगताना म्हणतात, “शिक्षकाडून काय शिकायचं, ही विद्यार्थ्यांची कसोटी असायची, पण त्यातूनच विद्यार्थी घडायचा. त्यावेळी ‘हे असं कर’ हे सांगणारे शिक्षक नव्हते. सध्याच्या ‘स्पूनफीडिंग’मुळे विद्यार्थी परावलंबी बनतात. कला हा विषय शिकवणं म्हणजे कलाकाराच्या जाणिवा जागृत करणं आहे. मग कला आपोआप आत्मसात होते आणि त्याच्या घडवलेल्या निर्माण झालेल्या जाणिवांनुसार ती रेखाटली जाते,” असे प्रा. वसंत सोनवणी सांगत होते. “माझ्या गुरूंनी ही जाणीव मला करून देण्याचे काम केलं म्हणून मी यशस्वी चित्रकार झालो. यापुढेही मीही हेच कार्य पुढे माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत करू शकतो,” अत्यंत समाधानाने सोनवणी सर सांगत होते. त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास, अनुभव कथनातील ठामपणा आणि निर्भेळआनंदी, सुसंवाद सांगून जात होता की, कलाकार असावं आणि कलाकार म्हणून जगावं, ते प्रा. वसंत सोनवणी सरांप्रमाणे!
 
त्यांनी १९७०च्या महाविद्यालयीन अध्यापन काळापासून ते २०१२ पर्यंत अनेक कलाविषयक कार्यशाळा, सेमिनार्स आयोजित केले आहेत. ते सहभागीही झालेले आहेत. १९७५ पासून २०१४ पर्यंत त्यांना अनेक प्रतिष्ठित मान-सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी’च्या पुरस्काराने प्रा. सोनवणी सरांच्या कलाप्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. १९९६ ते २०२१ पर्यंतच्या काळात ‘आर्ट कॅम्प’ आणि प्रात्यक्षिके यामुळे त्यांच्या सुसंवादी अमूर्तकलेने रसिक मनाचा ठाव घेतलेला आहे. त्यांच्या कलाकृतीदेखील अनेक प्रस्थापित संग्राहक आणि प्रतिष्ठित व्यक्तींकडे वास्तुसौंदर्य वाढवित आहेत. सुमारे पाव शतकांहून अधिक प्रमाणात एकल आणि समूह प्रदर्शने आयोजिलेल्या या महान कलाकाराच्या कलाप्रवासाचा उचित सन्मान महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. त्यांच्या पुढील कलाप्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...! 
 
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121