स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जीवनकार्यावर मराठीत आजवर दहा नाटके तरी रंगभूमीवर येऊन गेली. माधव खाडिलकर, मधुसुदन कालोलकरांसारख्या दिग्गजांनी सावरकरांवर आपापल्या परीने प्रकाश टाकला. बदलापूरचे प्रसिद्ध कादंबरीकार अनंत शंकर ओगले यांनी मराठीत एक वेगळाच विक्रम केला आणि तो म्हणजे एकाच महानायकावर दोन नाटके लिहिण्याचा! काही वर्षांपूर्वी ‘होय! मी सावरकर बोलतोय’ हे त्यांचेच गाजलेले नाटक.या नाटकात त्यांनी सावरकरांचे राजकारण मांडले आणि आता ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी!’ या दुसर्या नाटकामध्ये त्यांनी अराजकीय सावरकरांचे लोभसवाणे चित्रण रेखाटले आहे. माई सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कौटुंबिक, भावनिक जीवनाचे चित्रण केवळ मराठीतच नव्हे, तर पूर्ण भारतीय भाषांत ओगले यांनी प्रथमच केलेले आहे. ते केवळ असाधारण अप्रतिम आहे.
द़ृक्श्राव्य माध्यमाचा उत्तम वापर करुन हे नाटक दोन अंकांत सजविलेले आहे. संगीताचा यथार्थ उपयोग केला, तर कलाकृती किती तेजाने झळाळते, याचे हे मराठीतले पहिलेच उदाहरण. सावरकर सदनात कोण-कोण येत होते, याची यादी जरी पाहिली तरी लक्षात येते की, भारतीय राजकारणात दादरच्या या महानायकाचे किती उच्च स्थान होते! येथे डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. जयकर, राजाजी, कन्हैयालाल मुन्शी, स. का. पाटील, बाबू जगजीवनराम इत्यादी महनीय नेते येत असत. स्मरणचित्रांची उजळणी करणारे हे नाटक विनोद, कारुण्य, संगीत, दणदणीत संवाद, हृदयाला साद घालणारे विचार यांनी गच्च भरलेले आहे. तरूण पिढीला अत्यंत प्रेरणा मिळेल, अशा पद्धतीने या नाटकाची मांडणी केलेली आहे.
यातले ‘स्वातंत्र्यलक्ष्मीचा पुत्र विनायक’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘कसा होतो मी आज कसा झालो, कालच्रकाच्या सावलीत गेलो...’ ही दोन गाणी अतिशय सुंदर, आर्त झालेली आहेत. तरुण, गुणी संगीतकार अनुराग गोडबोले याची ही कर्तबगारी आहे. गीत आणि संहिता खुद्द अनंतराव ओगले यांची आहे.या नाटकाचे नेपथ्य हा कौतुकाचा विषय ठरेल. मराठीत तरी असा हा पहिलाच प्रयोग ठरेल. ‘फोल्डिंग सेट’, कमीत कमी पात्र योजना, मनाला भिडणारे पार्श्वसंगीत यांच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम अभिनेते, दिग्दर्शक यतिन मधुकर ठाकूर यांनी केलेले आहे. त्यांना माईच्या भूमिकेतल्या दीप्ती भागवत या गुणवतीने उत्तम साथ दिलेली आहे. हे नाटक पाहिल्यावर प्रख्यात राजकारणी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक म्हणाले की, “अप्रतिम नाटक आहे हे. केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदीतही त्याचे रूपांतर झाले पाहिजे.” हे त्यांचे अवलोकन म्हणजेच यशाची रसिकमान्य पावती आहे. नाटककार अनंतराव ओगले, दिग्दर्शक यतिन ठाकूर आणि ‘मधुबिंब’ या संस्थेचे पुन्हा एकदा अभिनंदन...!