सध्या ३० कोटी भारतीय ‘पेटीएम’चा वापर आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी करतात, असा कंपनी दावा करते. २०१७ मध्ये ते भारतातील सर्वांत तरुण अब्जाधीश होते. ‘फोर्ब्ज’च्या मते, विजय शेखर यांची निव्वळ संपत्ती १७ हजार, ९६३ कोटी रुपये इतकी आहे. एवढा गडगंज श्रीमंत असलेला हा माणूस स्वत:चा बडेजाव मिरवत नाही. आजदेखील त्यांना रस्त्यालगतच्या टपरीवर चहा प्यायला आवडतो. सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेले की, दूध आणि ब्रेड घेऊन येतात. विजय शर्मा यांच्या आई-वडिलांना आपला मुलगा नेमका कोणता व्यवसाय करतो, हे कळत नव्हतं. जेव्हा आईने वृत्तपत्रातून विजय शर्मांच्या संपत्तीचा आकडा वाचला, तेव्हा कुतूहल मिश्रित चेहर्याने आपल्या मुलास विचारले की, “खरंच एवढे पैसे त्याने कमावले आहेत का?”
हिंदी माध्यमात शिकलेला मुलगा इंग्रजी येत नसल्याने न्यूनगंडाने पछाडला होता. इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊनसुद्धा मन रमत नव्हते. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न करता त्याने स्वत:ची कंपनी सुरू केली. कंपनीसाठी डोक्यावर आठ लाख रुपयांचं कर्ज झाले होते. व्यवसायातून फक्त दहा हजार रुपये कमावतो म्हणून लग्नाच्या स्थळाकडून नकार मिळाला. मात्र, तो हिंमत हरला नाही. त्याने एक अशी कंपनी सुरु केली की, जी आज प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये आपल्याला दिसते. आज त्यांची १७ हजार कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती आहे. ही कथा आहे ‘पेटीएम’च्या मालकाची. विजय शेखर शर्मा यांची...
विजय यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील शिक्षक, तर आई गृहिणी. 14व्या वर्षी विजय यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. हिंदी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी लिहिणे आणि वाचणे विजय यांच्यासाठी अवघड होते. त्यातून काहीशी न्यूनगंडाची भावना निर्माण झाली. महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं, तर इंग्रजी अनिवार्य आहे, हे त्याला उमजलं. इंग्रजी न येणं हे आपल्यासाठी एक आव्हान आहे, या भावनेने पाहत हे आव्हान त्यांनी स्वीकारलं. जुनी इंग्रजी मासिके ते वाचू लागले. मित्रांकडून पुस्तके आणून ती वाचण्यास सुरुवात केली. एका वेळेस ते दोन पुस्तके वाचायचे. एक इंग्रजी पुस्तक आणि त्याचा अनुवाद असलेले हिंदी पुस्तक. काही प्रमाणात त्यांची इंग्रजी भाषा सुधारलीही. दिल्लीच्या ‘इंजिनिअरिंग कॉलेज’मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. शालेय जीवनात हुशार असलेले विजय महाविद्यालयीन जीवनात मात्र सरासरी गुण मिळवू लागले. हळूहळू त्यांचा ‘इंजिनिअरिंग’मधला रस कमी होत चालला.
‘याहू’ हा विजय यांच्यासाठी आदर्श होता. ‘याहू’ सुरू झालेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात आपणदेखील शिकावे, असे त्याला वाटायचे. मात्र, पैशांचा अभाव आणि खराब इंग्रजी यामुळे विजयनी तो नाद सोडून दिला. जेव्हा विजय यांचे इतर मित्र शिक्षण पूर्ण करून नोकर्या करण्याचे स्वप्न पाहत होते, त्यावेळेस विजयनी आपल्या मित्रासोबत ‘एक्सएस कम्युनिकेशन’ नावाची ‘कंटेन्ट मॅनेजमेंट’ कंपनी सुरू केली. विशेष बाब म्हणजे, काही आघाडीची वृत्तपत्रे विजय यांच्या कंपनीचे ग्राहक होते. कंपनी चालविण्यासाठी विजयनी बँकेकडून २४ टक्के व्याजाने कर्ज घेतले. विजय आठ लाख रुपयांच्या कर्जात बुडाले. हे कर्ज फेडण्यासाठी विजयना काही काळ नोकरी करावी लागली. विजय यांच्या आयुष्यात एक आगळावेगळा किस्सा घडलेला आहे. कंपनी चालवत असताना विजय दहा हजार पगार घेत असत. विजय परिवारासह लग्नासाठी मुलगी पाहायला गेले होते. मुलीच्या घरच्यांना जेव्हा कळले की, विजय महिन्याला दहा हजार रुपये कमावतात. त्यांचा होकार किंवा नकार कळवण्यास साधा फोनसुद्धा आला नाही. (आता त्या मुलीचे पालक नक्कीच पस्तावत असतील.)
विजयनी ‘वन ९७’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीद्वारे विजय ‘मोबाईल कंटेन्ट’ विकत असे. दरम्यान, कर्जाचा डोंगर कमी झाला होता. काही गोष्टी सुरळीत चालल्या होत्या. २०१० च्या आसपास विजय सभोवताली होणार्या बदलांना टिपत होते. याच काळात ‘स्मार्टफोन्स’चे प्रमाण वाढले होते. या ‘स्मार्टफोन्स’चा वापर करुन लोकांनी आपले आर्थिक व्यवहार सुरू केले, तर त्यांचं जगणं आणखी सुलभ होईल. या आलेल्या विचारावर विजयनी काम करण्यास सुरुवात केली. ८ जुलै, २०१० रोजी ‘पेटीएम डॉट कॉम’ ही ‘ऑनलाईन’ व्यवहार सुलभ करणारी वेबसाईट सुरू झाली. वीजबिल, पाण्याचं बिल, गॅस बिल या वेबसाईटवरून भरणं सोप्पं झालं. या सुलभतेमुळे ‘पेटीएम’ची लोकप्रियता वाढली. निव्वळ दोन वर्षांत ‘पेटीएम’ वापरणार्यांची संख्या २ लाख, ५० हजार एवढी झाली. अगदी सुरुवातीला ‘पेटीएम’ मोबाईल रिचार्ज कंपनी म्हणून ओळखली जात होती. त्वरित ‘पेमेंट’चा पर्याय असलेली भारतातील कंपनी म्हणून ‘उबर’ने नोंदणी केल्यानंतर ‘पेटीएम’ला चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली. ‘इंटरनेट वॉलेट सर्व्हिस’, २४ बाय ७ ‘कस्टमर केअर सर्व्हिसेस’ सुरु केल्यानंतर ‘पेएटीएम’ची विश्वासार्हता वाढली.
दि. ८ नोव्हेंबर, २०१६ हा दिवस ‘पेटीएम’साठी सुवर्णदिन ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. ‘पेटीएम’ने लोकांना त्वरित ‘ऑनलाईन पेमेंट’ची सुविधा पुरवली. सरकारनेदेखील ‘ऑनलाईन’ आर्थिक व्यवहारास पाठिंबा दिला. रस्त्यावरचा भाजीवाला असो किंवा मॉलमधील एखादं बहुराष्ट्रीय ‘आऊटलेट’, प्रत्येकाने ‘पेटीएम’ची सुविधा स्वीकारली. नोव्हेंबर २०१७ पर्यंत २० कोटी मोबाईलमध्ये ‘पेटीएम’ ‘डाऊनलोड’ केले गेले. अशाप्रकारे दहा कोटी अॅप ‘डाऊनलोड’ होणारे ‘पेटीएम’ हे भारतातील पहिले ‘पेमेंट अॅप’ ठरले. नोटाबंदीच्या काळात ६०० दिवसांचे काम ‘पेटीएम’ने अवघ्या ६० दिवसांत पूर्ण केले. नोव्हेंबर महिन्यात ‘पेटीएम’चा ‘आयपीओ’ शेअर बाजारात आला. १८ हजार, ७२६ कोटी रुपये मूल्य असलेला हा ‘आयपीओ’ होता. आश्चर्याची बाब म्हणजे, जगप्रसिद्ध अब्जाधीश वॉरन बफे यांच्या ‘इन्व्हेस्टमेंट पॉवरहाऊस’ कंपनीने या ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक केली. दहा कोटी रुपयांचे त्यांनी ‘शेअर्स’ विकले आणि त्यातून ११९ कोटी रुपयांचा नफा कमावला.
सध्या ३० कोटी भारतीय ‘पेटीएम’चा वापर आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी करतात, असा कंपनी दावा करते. २०१७ मध्ये ते भारतातील सर्वांत तरुण अब्जाधीश होते. ‘फोर्ब्ज’च्या मते, विजय शेखर यांची निव्वळ संपत्ती १७ हजार, ९६३ कोटी रुपये इतकी आहे. एवढा गडगंज श्रीमंत असलेला हा माणूस स्वत:चा बडेजाव मिरवत नाही. आजदेखील त्यांना रस्त्यालगतच्या टपरीवर चहा प्यायला आवडतो. सकाळी ’मॉर्निंग वॉक’ला गेले की, दूध आणि ब्रेड घेऊन येतात. विजय शर्मा यांच्या आई-वडिलांना आपला मुलगा नेमका कोणता व्यवसाय करतो, हे कळत नव्हतं. जेव्हा आईने वृत्तपत्रातून विजय शर्मांच्या संपत्तीचा आकडा वाचला, तेव्हा कुतूहल मिश्रित चेहर्याने आपल्या मुलास विचारले की, खरंच एवढे पैसे त्याने कमावले आहेत का?
विजय शर्मा यांनी २००५ मध्ये मृदूला या सुविद्य तरुणीसोबत विवाह केला. या दाम्पत्यास विवान नावाचा गोंडस मुलगा आहे. सेंट्रल दिल्लीच्या ‘गोल्फ लिंक्स’ येथे हे कुटुंब राहते.
या जगात कोणीच परिपूर्ण नाही. आपल्या कच्च्या दुवांना आव्हान समजून त्यावर मात करणे महत्त्वाचे आहे. सातत्य आणि परिश्रम करत राहिलो, तर जगात आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. विजय शेखर शर्मांचा उद्योजकीय प्रवास हाच संदेश आपल्याला देतो.