नवी दिल्ली: " बिटकॉइन, इथेरियम किंवा एनएफटी सारख्या क्रिप्टोकरन्सीला भविष्यात कधीही अधिकृत चलनाचा दर्जा मिळणार नाही " असे केंद्रीय मुख्य अर्थसचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी स्पष्ट केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भारतात सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर ३० टक्क्यांचा कर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतातील क्रिप्टोकरन्सीचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मुख्य अर्थसचिवांनी हे वक्तव्य केले आहे. क्रिप्टो ला कधीही अधिकृत दर्जा दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन लोकांमधील क्रिप्टोच्या व्यवहारांना क्रिप्टोकरन्सी असेट्स समजले जाईल. आपण सोने,हिरे, क्रिप्टो यांची खरेदी करू शकतो पण त्याला अधिकृत चलनाचा दर्जा मिळणार नाही. क्रिप्टो मधील गुंतवणूक लाभदायक ठरेलच याची कुठलीही शाश्वती नसल्याने या गुंतवणुकीत जर कुठले नुकसान झाले तर त्याला सरकार जवाबदार राहणार नाही असेही मुख्य अर्थ सचिवांनी स्पष्ट केले.
दरम्यान आरबीआय जाहीर करणार असलेले डिजिटल चलन ' डिजिटल रुपी ' हे RBI कडूनच जाहीर होणार असल्याने पूर्णपणे अधिकृत आणि सुरक्षित चलन असणार आहे. भारतात सध्या क्रिप्टोकरन्सीच्या मार्फत होणारे व्यवहार वाढलेले आहेत या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.