‘विंचू’ अज्ञानाचा चावला...

    28-Feb-2022   
Total Views |
scorpine


महाराष्ट्रामधून नुकताच विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. मात्र, वाघ-बिबट्यांसारख्या मोठ्या जीवांभोवती आपल्या देशातील वन्यजीव संवर्धनाचे धोरण केंद्रित असल्याने विंचवासारख्या सूक्ष्मजीवांच्या संशोधनाकडे कानाडोळा केला जातो. विंचवाविषयी जाणून घेण्यासाठी ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’च्या माध्यमातून विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावणारे जळगावचे विवेक सुनील वाघेंची ही मुलाखत...


विंचवाचे पर्यावरणीय परिसंस्थेतील महत्त्व काय?
 
वाघ-सिंहांसारखे प्राणी हे अन्नसाखळीच्या उच्चतम पातळीवर असले, तरी विंचवासारख्या छोट्या जीवाचे अन्नसाखळीतील महत्व नाकारता येणार नाही. विंचू हा जैवअन्नसाखळीतील एक दुवा आहे. कारण, तो कोणाचा तरी भक्ष्य आहे, तसेच तो कोणाचा तरी भक्षकदेखील आहे. पर्यावरणीय परिसंस्थेत विंचू कीटकनियंत्रक म्हणून काम करतो. म्हणजे अळ्या, किडे किंवा छोटे कीटक खाऊन त्यांच्या वाढत्या संख्येवर रोख लावतो. उलटपक्षी फुरसे साप, लेपर्ड गेको, शतपाद हे सरपटणारे प्राणी आणि पक्षी विंचवांना खातात. त्यामुळे अन्नसाखळीत तो महत्त्वाची भूमिका बजावतो.

 
विंचवांमध्ये काही प्रकार आढळून येतात का?
 
जगभरात विंचवांच्या साधारणपणे 2,600 प्रजाती सापडतात. नोंदीनुसार भारतात जवळपास 150 प्रजाती आढळतात. भारतातील प्रजाती या सहा कुळ आणि साधारपणे 27 जातींमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ’बुथीडी’, ’हॉर्मुरीडी’, ’स्कॉर्पिनिडी’, ’रुगोडेंटिडी’, ’चेटिलिडी’, ’स्कॉर्पिओपिडी’ ही भारतात आढळणारी विंचवाची कुळं आहेत. महाराष्ट्रात विंचवाच्या जवळपास 30 प्रजाती सापडतात. महाराष्ट्रात सहज आढळणारे आणि सुपरिचित असलेले दोन विंचू आहेत. ‘भारतीय लाल विंचू’ जो जहाल विषारी आहे आणि ‘काळा विंचू’ जो सौम्य विषारी आहे. विंचवाच्या प्रजातींनुसार त्यांचा अधिवास जमीन, झाड आणि खडकांच्या कपारींमध्ये विभागला गेला आहे. जमिनीवर अधिवास करणारे विंचू हे जहाल विषारी असतात, तर झाड आणि खडकांच्या कपारींमध्ये अधिवास करणारे विंचू हे सौम्य विषारी मानले जातात. ’लाल विंचू’ हा सर्वसामान्यपणे आढळणारा विंचू आहे. ’एशियन फॉरेस्ट विंचू’ला ’काळा विंचू’ म्हणजेच ’इंगळी’ म्हटले जाते.


( संशोधक विवेक वाघे) 

vivek waghe

 
विंचवाची शरीररचना कशी असते ? त्याच्या वर्तवणुकीत काही वेगळेपण आहे का?
 
विंचू हा कीटक वर्गातील जीव आहे. दोन हात, धड, आठ पाय आणि एक शेपूट (नांगी) अशी त्याची शरीररचना असते. तो पुढच्या दोन हातांनी आपल्या भक्ष्याला पकडतो. शेपटीवरील काटा भक्ष्याच्या शरीरात घुसून त्यामध्ये विष सोडतो. विंचवांचे आयुष्य त्याच्या आकाराच्या मानाने मोठे असते. विंचवाची मादी एकावेळेस एक अशा अनेक पिल्लांना लागोपाठ जन्म देते. एकंदर पिल्लांची संख्या ही प्रत्येक प्रजातीनुसार बदलते. जन्माला आलेली पिल्ले आपल्या आईच्या पाठीवर जाऊन बसतात. म्हणून तर ’विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ अशी म्हण पडली आहे. जन्मत: या पिल्लांमध्ये अन्नाचा साठा असतो. ती मोठी झाल्यावर आईच्या पाठीवरुन उतरुन स्वतंत्रपणे जगतात. साधारणपणे असा समज आहे की, ही पिल्ले आईला खातात किंवा आई पिल्लांना खाते. कीटकांमध्ये स्वजातीय भक्षण असले तरी, नैसर्गिक अधिवासातील ‘विचवांमध्ये असे घडत नाही. बंदिस्त अधिवासात (कॅप्टिव्ह) पाळल्या गेलेल्या मादी विंचू खाद्य न मिळाल्यास आपल्या पिल्लांना खातात.
 
विंचवाचे विष घातक असते का?
 
विंचवाचे विष हे पक्षाघात करणारे असते. त्यामध्ये प्रथिने, पाचक रस, अमिनो अ‍ॅसिड असते. विंचवाच्या विषातील रासायनिक तत्त्वाने एका विशिष्ट प्रकारचे मज्जातंतू उद्दीपित होतात व होतच जातात. त्या उद्दीपनाच्या अतिरेकाचा दुष्परिणाम होतो. या प्रकारच्या ऑटोनोमिक मज्जातंतूंच्या अतिरेकामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते दंशातून शरीरात किती विष गेले आहे, त्यावर अवलंबून आहे. कमी प्रमाणात गेले असले, तर दंशाच्या ठिकाणी दुखते. जास्त प्रमाणात विष शरीरात जाता शरीरभर ‘ऑटोनोमिक’ मज्जातंतूंचे अतिरेकी उद्दीपन होते. यामुळे माणसाला योग्य वेळेत उपचार न मिळल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो. भारतात आढळणार्‍या सहा कुळातील केवळ ’बुथीडी’ कुळातील विंचवांचे विष हे तीव्र असते. विंचवाच्या विषाची तीव्रता ही प्रजाती आणि प्रदेशानुसार वेगवेगळी असते. उदा. जळगावात आढळणार्‍या ‘लाल विंचवा’च्या विषाची तीव्रता फार जहाल नसते. उलटपक्षी कोकणातील ’लाल विंचू’ हे उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक विषारी असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. वेदनाशमन औषध निर्मितीमध्ये विंचवाचे विष वापरले जाते. विंचवाच्या विषावरचा उतारा (अ‍ॅण्टिसीरम) मुंबईच्या ’हाफकीन इन्स्टिट्यूट’ने तयार केला आहे. त्यांची ’ऋ(रल)2’ ही भारतातील विंचूदंशावरील ‘अ‍ॅण्टिसीरम’ आहे. महाडच्या डॉ. हिंमतराव बावस्करांनीही विंचू दंशावरील उपचार पद्धतीवर सखोल संशोधन केले आहे.
 
विंचवांचा अभ्यास दुर्लक्षित राहिला आहे का? त्यामागची कारणे काय आहेत ?
 
विंचवांवर संशोधन करणार्‍या संशोधन संस्थांचा अभाव आणि संशोधनाकरिता आवश्यक असणार्‍या परवानग्या मिळण्यामध्ये लागणारा वेळ, यामुळे विंचवांचा अभ्यास दुर्लक्षित राहिला आहे. भारतात ब्रिटिश राजवटीमध्ये विंचवांचा मोठ्या प्रमाणात अभ्यास झाला. ब्रिटिश संशोधकांनी गोळा केलेले विंचवांचे मूळ नमुने हे परदेशातील संग्रहालयात असून ते भारतात उपलब्ध नाहीत. यामुळे भारतात नव्याने सापडलेल्या एखाद्या विंचवाच्या प्रजातींच्या नमुन्याची तुलना करताना अडचणी निर्माण होतात. तसेच शास्त्रीय वर्णने ही इंग्रजी किंवा खास करून फ्रेंच आणि लॅटिन भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय साहित्याची अनुपलब्धता आणि भाषेची अडचण असल्याने अनेक संशोधक विंचवाच्या संशोधनात्मक अभ्यासाकडे वळत नाहीत. याशिवाय संशोधनासाठी आवश्यक असणार्‍या तांत्रिक साहित्याचा अभाव आहे. वाघ-बिबट्यासांरखा मोठ्या मांसभक्षी वा हत्तीसारख्या तृणभक्षी प्राण्यांच्या संशोधनासाठी मिळणारा आर्थिक पाठिंबा हा विंचवांसारख्या सूक्ष्मजीवांच्या संशोधनाकरिता मिळत नाही. शिवाय या संशोधनाला प्रसिद्धीचे वलयही नाही. मात्र, विंचवांच्या नव्या प्रजातींचा शोध लागत असल्यामुळे या संशोधनकार्यात क्षमता असूनही त्यामधील संशोधनाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हे अधोरेखित होते. परंतु, गेल्या दोन दशकांमध्ये देशात विंचवांसारख्या छोट्या जीवांवर काम करणार्‍या तरुणांची फळी तयार झाली आहे.
 

विंंचवाविषयी समाजात काही मिथक वा गैरसमज आहेत का ?
 
कर्नाटकात चेल्लमा नावाची देवी आहे. तिला ’विंचू देवी’ असेही म्हणतात. ही देवी विंचूदंशापासून वाचवते, अशी श्रद्धा दक्षिण कर्नाटकात आहे. महाराष्ट्रातील काही भागात आजही विंचूदंश झाल्यावर त्या विंचवाला मारून दंश झालेल्या ठिकाणावर हातरुमालाने बांधण्यात येते. यामुळे विषाची तीव्रता कमी होते, असा समज आहे. मात्र, हा समज चुकीचा असून योग्य उपचार घेऊनच विंचवाच्या विषाची तीव्रता कमी करता येऊ शकते. त्यामुळे अशा समजांना किंवा भोंदूबाबांच्या उपचारांना बळी न पडता योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

मुलाखत - अक्षय मांडवकर
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.