नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्ध चिघळतच चालले आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले- प्रतिहल्ले होत असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रशियाच्या न्यूक्लीयर डिटेरेन्स फोर्सेसना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे हे युद्ध खरेच अणुयुद्धाकडे चालले आहे की काय? अशी भीती सर्व जगात पसरली आहे. नाटो देशांनीसुद्धा रशियाला इशारे देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुतीन यांनी हे आदेश दिले आहेत.
दरम्यान रशियाने बेलारूसमध्ये चर्चेसाठी दिलेले आमंत्रण युक्रेनने स्वीकारले असल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. युक्रेनचे शिष्टमंडळ बेलारूसला पोहोचले असल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थांनी दिली आहे. संपूर्ण जगात यामुळे तणावाचे वातावरण पसरले असून पंतप्रधान मोदी यांनीही नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.