
निर्बंधांना महत्व देणार नसल्याची पुतीन यांची गर्जना
नवी दिल्ली, पार्थ कपोले : युक्रेन विरुद्ध रशियाने केलेल्या लष्करी कारवाईमुळे अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसह रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. यामध्ये आर्थिक, व्यापार आणि तंत्रज्ञानविषयक निर्बंधांचा समावेश आहे. त्याविशयी व्हाईट हाऊसने सविस्तर निवेदन जारी केले आहे. अर्थात, कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांना रशिया जुमानणार नसल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
अमेरिकेद्वारे करण्यात आलेली कारवाई
• तब्बल २५ सहाय्यक कंपन्या असलेली स्बेरबँक (Sberbank) ही रशियाची सर्वांत मोठी वित्तीय संस्था आहे. अमेरिकेने या संस्थेसोबत सर्व प्रकारचे आर्थिक संबंध तोडले आहेत. यामुळे स्बेरबँकला डॉलरमध्ये होणाऱ्या व्यवहारांमध्ये सहभाग घेता येणार नाही. जागतिक आर्थिक व्यवस्थेसोबत जोडलेली ही रशियातील सर्वांत मोठी बँक आहे. रशियाच्या बँकींग क्षेत्रातील एकुण मालमत्तेपैकी एक तृतियांश मालमत्ता याच बँकेमध्ये आहे, हे विशेष.
• रशियातील दुसरी सर्वांत मोठी वित्तीय संस्था असलेल्या व्हिटीबी बँकेची पूर्णपणे नाकेबंदी करण्यात आली आहे. या बँकेशी २० उपकंपन्या संलग्न आहेत. रशियातील एकुण बँकींग मालमत्तेपैकी एक पंचमांश मालमत्ता व्हिटीबीकडे आहे. त्याचप्रमाणे ओटक्रिटी बँक, सोवकॉम बँक आणि ओजेएससी या आर्थिक संस्थांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
• रशियातील १३ महत्वाचे उद्योग आणि संस्थांवर नवे कर्ज आणि इक्विटीविषयक निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्व आर्थिक व्यवहारांवर बंदी, १४ दिवसांपेक्षा जास्त मुदतीच्या नवीन कर्जामध्ये वित्तपुरवठा करण्याची तरतूद आणि इतर व्यवहार आणि स्बेरबँक, अल्फाबँक क्रेडिट बँक ऑफ मॉस्को, यासह तेरा रशियन राज्य-मालकीच्या उपक्रम आणि संस्थांवर हे निर्बंध लागू असतील. सुमारे १.४ ट्रिलियन डॉलरची मालमत्ता असलेल्या या कंपन्यांना आता अमेरिकी भांडवली बाजारातून निधी उभारता येणार नाही.
• रशियातील प्रभावशाली कुटुंबांवरही आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये युक्रेनवरी आक्रमणास पाठिंबा देणारे आणि त्यासाठी आवश्यक ती संसाधने उपलब्ध करून देणारे रशियातील सत्तेतील उच्चपदस्थ, आर्थिक व्यवस्थेतील उच्चपदस्थांचा समावेश आहे.
• रशियन सैन्यावर व्यापक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये रशियन संरक्षण मंत्रालयाचाही समावेश आहे. अमेरिकी संरक्षण उत्पादने, सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान यांचा वापर रशियाला करता येणार नाही.
• अर्थव्यवस्थेसाठी महत्वाच्या असणाऱ्या तांत्रिक वस्तूंची आयात, वीजनिर्मिती प्रकल्प सुरु करण्याच्या रशियाच्या क्षमतेवर बंदी लादण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रशियावर सेमीकंडक्टर, दूरसंचार, एन्क्रिप्शन सुरक्षा, लेझर, सेन्सर्स, नेव्हिगेशन, एव्हिओनिक्स आणि सागरी तंत्रज्ञानविषयक बंदी लादण्यात आली आहे.
• रशियाविरोधात अशाचप्रकारचे कठोर निर्बंध लादणाऱ्या अन्य देशांना अमेरिका आयात आणि व्यापारविषयक सूट प्रदान करणार आहे.
रशियन अर्थव्यवस्थेवर असा होईल परिणाम
आता रशियाला र्थव्यवस्थेवरील तीव्र दबावाचा सामना करावा लागेल. जागतिक आर्थिक व्यवस्थेपासून, जागतिक व्यापारापासून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून दूर राहिल्यामुळे रशियाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. यामध्ये रशियाची सर्वात मोठी बँक अमेरिकेच्या आर्थिक व्यवस्थेपासून वेगळे करणे समाविष्ट आहे. हा निर्णय रशियाच्या जागतिक व्यापाराच्या कार्यक्षमतेसाठी एक मोठा धक्का असेल., जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्याची, गुंतवणूक आकर्षित करण्याची आणि अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार करण्याची रशियाची क्षमता नष्ट होईल.
गत आठवड्यात रशियन अर्थव्यवस्थेला तीव्र दबावाचा सामना करावा लागला आहे. गुरुवारी त्यांचा शेअर बाजार साडेचार वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला होता, त्याचप्रमाणे रुबल या रशियन चलनाचेही मोठे अवमूल्यन झाले होते. अशा परिस्थितीमध्ये रशियन अर्थव्यवस्थेची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कर्जामध्ये वाढ, चलनवाढ आणि परिणामी औद्योगिक व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
भारताची भूमिका काय असेल ?
भारत आणि रशिया जागतिक राजकारणामध्ये परस्परांचे महत्वाचे भागिदार आहेत. २०२१ मध्ये रशियाची भारतातील निर्यात ६.९ अब्ज डॉलर होती. त्यात प्रामुख्याने खनिज तेल, खते आणि हिरे यांचा समावेश होता. त्याच वेळी, भारताने २०२१ मध्ये रशियाला ३.३३ अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात केली. त्यामुळे प्रामुख्याने औषधी उत्पादने, चहा आणि कॉफी याचा समावेश होता. मात्र, आता रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भारताला आता रशियासोबत डॉलरमध्ये व्यवहार करता येणार नाही. मात्र, रशियासोबत व्यापार सुरळीत राखण्यासाठी रुपयामध्ये व्यवहार करण्याच्या (रुपी पेमेंट मेकॅनिझम) मार्गांचा विचार भारत करू शकतो. अशा प्रकारच्या खात्यांमध्ये ठेवलेला निधी दोन्ही देशांमधील व्यापाराच्या देवाणघेवाणीसाठी देयकाची हमी म्हणून काम करतो.