मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोल्हापूरच्या 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मधील तिलारी नगर घाटामध्ये राजरोसपणे मृत कोंबड्यांचे अवशेष टाकण्याचे काम होत आहे. यामुळे इथला वन्यजीव अधिवास संकटात सापडण्याची शक्यता आहे. या कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाचा अधिवास आहे. अशा परिस्थितीत याठिकाणी मृत कोंबड्यांचे अवशेष टाकले गेल्यामुळे त्याव्दारे वन्यजीवांचा संसर्गाची बाधा होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर, २०२० मध्ये राज्य सरकाराने २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली होती. याठिकाणी नोव्हेंबर, २०२१ मध्ये वाघाने रेड्याची शिकार केली होती. शिवाय तिथे वाघाच्या पायाची पदचिन्हे देखील सापडलेली. व्याघ्र अधिवास असूनही याठिकाणी वन्यजीव अधिवासाचे व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने होताना दिसत नाही. कारण, कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा भाग असणाऱ्या तिलारीच्या घाटात पोल्ट्रीसाठी वाहतूक करण्याऱ्या वाहनांकडून मृत कोबड्यांचे अवेशष टाकण्याचे काम होत आहे. शिनोळी तसेच आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने तिलारीत येणाऱ्या या पोल्ट्रीच्या गाड्या रोज रात्री तिलारी घाट उतरुन गोवा आणि बेळगावकडे जातात. वाटेतल्या हाॅटेलमध्ये कोंबड्या पुरवल्या की मृत कोंबड्या व इतर कचरा हा घाटातच टाकतात.
ही बाब 'वर्ल्ड फाॅर नेचर'ने समोर आणली आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ मेलेल्या कोंबड्या आणि त्यांचे शरीरातील अवशेष घाटामध्ये पकडले. हा सर्व कचरा गाडीत पुन्हा भरुन तो नेण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने वन्यजीवांसाठी संरक्षित असणाऱ्या क्षेत्रात मृत प्राण्यांचे अवशेष टाकणे त्याठिकाणी अधिवास करणाऱ्या वन्यजीवांसाठी धोकादायक ठरु शकते. या मृत अवशेषांव्दारे वन्यजीवांमध्ये एखादा संसर्ग पसरण्याचीही भिती असते. याविषयी पाटणेचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवले यांनी सांगितले की, "या प्रकरणाची लेखी तक्रार आम्हाला प्राप्त झालेली नाही. मात्र, समाजमाध्यंमाव्दारे मिळालेल्या माहितीनुसार आम्ही या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. अशापद्धतीने कचरा टाकणाऱ्या लोकांचा आम्ही शोध घेत आहोत. तसेच त्याबाबत जनजागृती करणारे फलकही लवकरच घाट क्षेत्रात लावण्यात येणार आहेत."