मुंबई : मॅनहोलमध्ये उतरून काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना योग्य साधने देण्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी हि पालिकेचीच असते. परंतु पालिकेवर सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला हि साधी जबाबदारी पार पाडणं जड जात असल्याचं चित्र विलेपार्लेमध्ये पाहायला मिळालं. विलेपार्ले पश्चिम येथील शोरूमच्या बाहेर असणाऱ्या एका मॅनहोलमध्ये तीन कामगार हे हाताने मैला साफ करत होते. या तीन कामगारांना कामावर ठेवल्याबद्दल जुहू पोलिसांनी एका बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपनीच्या शोरूम व्यवस्थापक आणि मुंबई महापालिका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पालिकेवरील सत्ताधारी शिवसेनेच्या काळात विलेपार्ले एस. व्ही. रोडवरील एक मॅनहोल साफ करण्यासाठी एका मजुराला कोणतंही जरुरीचं साधन नसल्यामुळे त्या मॅनहोलमध्ये गळ्यापर्यंत खोल उतरवावं लागलं. आणि त्याचबरोबर इतर दोघे त्याला मदत करत होते. हि गोष्ट सामाजिक कार्यकर्ते बिलाल खान यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत पालिकेला सूचना दिली. त्यांनतर के - पश्चिम प्रभागातील सहायक अभियंता धीरजकुमार बांगर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याप्रकरणी जुहू पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
पालिका कर्मचारी सेल्वकुमार देवेंद्र आणि शोरूमच्या व्यवस्थापकाने आपल्याला कामावर ठेवल्याचे या तीन कामगारांनी सांगितले. जुहू पोलिसांनी बांगर यांच्या तक्रारीच्या आधारावर मलनिस्सारण वाहिनीमधून मैला साफ करण्यासाठी कामगारांना भाग पाडून त्यांची सुरक्षितता धोक्यात आणल्या प्रकरणी सेल्वकुमार देवेंद्र आणि शोरूमच्या व्यायवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु सफाई कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे सेवा योजन प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन अधिनियम २०१३ च्या कलाम ८ चे उल्लंघन हे खुद्द पालिकेकडूनच होत असल्याचेच यातून दिसत आहे.