स्वतःची विस्तारवादी आणि एकाधिकारशाहीची भूमिका रेटणार्या चीनला आता कोरोना संक्रमणाचे खापर स्वतःवर फुटण्याची भीती वाटू लागली आहे. वुहान हेच कोरोनाचे उगमस्थान होते, आहे आणि राहणार याचा खुलासा वारंवार झाला. तरीही ही बाब पुसून टाकण्याचे पुरेपूर प्रयत्न चीनकडून होताना दिसत आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ज्या वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना पसरला, तिथल्या जागेच्या सुरक्षेची जबाबदारी सैन्याच्या जनरलला दिली आहे.
कोरोनाची निर्मिती किंवा विस्फोट याच ठिकाणाहून झाल्याचे विविध अहवाल वेळोवेळी जगासमोर आले. मात्र, चीनने वारंवार लपवाछपवी केली. त्याचाच भाग म्हणून आता वुहानच्या प्रयोगशाळेला लष्करी छावणीचे रुप देण्याचा प्रयत्न शी जिनपिंग करत आहेत. वुहानच्या प्रयोगशाळेत जर काहीच संशयास्पद नाही,तर तिथे तपासणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक का पोहोचले होते?
पथक पोहोचल्यावर त्यांना चौकशीसाठी परवानगी का दिली नाही? तपास पथकांच्या डोळ्यात धुळफेक का झाली? चिनी पत्रकारांना ‘लॉकडाऊन’बद्दल लिहिल्यावर तुरूंगात का डांबण्यात आले? तिथल्या प्रमुख विषाणूतज्ज्ञाला तुरूंगात का टाकले? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे की, चीन कोरोना महामारीशी निगडित तिथल्या पुराव्यांना जगापुढे कधीच येऊ देणार नाही. यापूर्वीच चीनची कोरोना प्रसाराबद्दल जी काही बदनामी झाली, ती पाहता आणखी काही वाद नको म्हणूनच हा सर्व खटाटोप. कोरोना महामारीपासून संपूर्ण जग आजही त्रस्त आहे.
लसीकरण हा एकमेव पर्याय डॉक्टरांपुढे शिल्लक होता. कोरोना विषाणूच्या बाधेमुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम हे काही तत्काळ होते, तर काही परिणाम हे दूरगामी होते. कोरोनाशी लढणे डॉक्टरांना शक्य होते. पण, एकाच वेळी जगभर पसरलेल्या या महामारीने परिस्थिती अवघड करून ठेवली होती. ऑक्सिजन तुटवडा, रेमिडेसिव्हीर तुटवडा, रक्ताचा तुटवडा ही भीषण आणीबाणी अवघ्या जगाने अनुभवली.
वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांनी आपले जीवलग गमावले होते. अनेकांनी नोकर्या गमावल्या. ‘लॉकडाऊन’मुळे अर्थचक्र रुतली. अनेकांनी मानसिक तणावात येऊन आत्महत्या केली. या सगळ्याचे मूळ आणि सुत्रधार याच वुहानच्या प्रयोगशाळेत तर नव्हते ना?, याची तपासणी जगभरातील अनेक संस्थांना करायची आहे. चीनच्या म्हणण्याप्रमाणे जर कोरोना विषाणू हा मानवनिर्मित नसून नैसर्गिक असेल, तर प्रयोगशाळेबाहेर लावण्यात आलेला हा कडेकोट बंदोबस्त कशासाठी, याचे उत्तर चीनकडे नाही.
खरं तर महासत्तेचे स्वप्नरंजन करत जैविक युद्धाचा आधार घेत चीनने ही खेळी सुरू ठेवली होती. ‘लॉकडाऊन’मध्ये गलवान खोर्यात भारतीय सैनिकांशी झटापट केली. तिथला भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केला. सीमांलगतच्या देशांची जमीन लष्कराच्या जोरावर गिळंकृत करण्याचा प्रयत्न चीन करत असतो. रशिया-युक्रेन वादामुळे जग युद्धाच्या दरीत ढकलले जाणार असल्याची भीती असताना आता चीनही त्यांच्या शेजारील तैवानवरही आपली वक्रदृष्टी कायम ठेवून असतो.
रशियानंतर आता चीनही युद्धनीतीच्या तयारीत असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. तैवानने अमेरिकेशी केलेल्या संरक्षण करारानंतर चीन खवळला आहे. अमेरिकेच्या ‘लॉकहीड मार्टिन’आणि ‘रेथियॉन टेक्नोलॉजीज्’ या कंपनीवर चीनने निर्बंध लादले आहेत. तैवानने आपल्या संरक्षण करारांमध्ये सुधारणा करण्यासाठी अमेरिकेशी 100 दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे.
अमेरिकेने तैवानला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. चीनला कोंडीत पकडण्यासाठी ही खेळी. तैवानलाही स्वतंत्र देशाचा दर्जा आहे. मात्र, ही खेळी चीन कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तिसरा मुद्दा म्हणजे, चीनमधील मानवाधिकाराची गळचेपी. चीनमध्ये असलेल्या उघूर मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात तपासालाही परवानगी नाकारली आहे.
शिनजियांग प्रांतामध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे तिबेटच्या बौद्ध धार्मिक संस्थांवर हल्ले करण्यात आले होते. या मठात तिबेटचे निर्वासित राहतात. या मठावरही पोलिसांद्वारे नजर ठेवली जात आहे. जिथे शक्य होईल तिथे हुकूमशाही, बळजबरी करण्याची एक संधीही चीन सोडत नाही, हेच यावरून दिसून येईल.