
मुंबई : मालाडमधील मैदानाच्या नामकरणाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. मालाडच्या मैदानाचे नाव टिपु सुलतान नव्हे तर झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान नाव देण्याचा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीत प्रस्ताव मंजूर झाला आहे.आयुक्तांच्या अभिप्रायानंतर अंमलबजावणी होणार आहे. समाजवादी पक्षाकडून या नव्या नामकरणाला विरोध होता.
मालाड येथील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून मुंबईतील राजकारण चांगलेच तापले होते. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या पी नॉर्थ विभागातील नगरसेवकांनी या उद्यानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असे नामकरण करण्याची मागणी केली. त्याबाबतचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीमध्ये मंजूर झाला असून पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर नामकरण केले जाणार आहे.
मालाड येथील कलेक्टरच्या मालकीच्या भूखंडावर उद्यान असून त्याचे सुशोभीकरण पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले. या उद्यानाला कित्तेक वर्षे टिपू सुलतान या नावाने ओळखले जात असल्याने उद्यानाच्या प्रवेशद्वारावर टिपू सुलतान उद्यान असे नाव लिहिण्यात आले. टिपू सुलतान या नावावरून वाद होत असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी झाशीच्या राणीचे नाव उद्यानाला द्यावे अशी मागणी शिवसेनेची असल्याचे म्हटले होते.