बीज अंकुरे अंकुरे...

Total Views |
 
 
beej
 
 
 
गर्भधारणा होण्यासाठी आयुर्वेदानुसार चार महत्त्वाचे घटक लागतात. त्यांची प्रत (क्वालिटी) जेवढी चांगली तेवढी गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. हे चार म्हणजे ऋतू, क्षेत्र, बीज आणि अम्बु या चार घटकांबद्दल आपण टप्प्या-टप्प्याने बघूयात.
 
 
ऋतू म्हणजे गर्भधारणेचा योग्य काळ. स्त्रिया बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेत आल्या, म्हणजे रज:प्रवृत्ती सुरू झाली की, हा काळ सुरू होतो. रज:प्रवृत्ती सुरू होण्याचे हल्लीचे वय साधारणत: ११-१३ वर्षे इतके आहे. पण, शरीरातील अंग-अवयव या वयात परिपक्व झालेली नसतात. त्यांची संपूर्ण वाढ झालेली नसते. त्यांची पूर्ण कार्यक्षमता विकसित झालेली नसते. ज्या वयात रज:प्रवृत्ती सुरु होते, त्या अवस्थेला ’चशपरीलहश’ म्हणतात. काही वेळेस पहिल्या रज:प्रवृत्तीनंतर सहा-आठ महिने रज:प्रवृत्ती होतच नाही. पण यासाठी लगेच औषधोपचार सुरू करण्याची गरज नाही. शरीर जेव्हा पूर्णपणे सक्षम होते, विकसित होते तेव्हा आपसूक हे मासिकचक्र सुरळीत सुरू होते. काही वेळेस हे मासिकचक्र त्रासदायक होते. उदा. कष्टार्तव (म्हणजे रज:प्रवृत्तीच्या वेळेस खूप त्रास/कष्ट/क्लेश होणे, जसे ओटीपोटात खूप दुखणे, मुरडा येणे, मळमळणे, उलट्या होणे, चक्कर येणे, गरगरणे, कंबर-पाठ दुखणे इ.) काही मुलींमध्ये यांची तीव्रता इतकी असते की, शाळा-महाविद्यालय बुडवावे लागते. क्वचित प्रसंगी वेदनाशामक औषधांचे इंजेक्शन घ्यावे लागते. बरेचदा या बरोबरीने रज:प्रवृत्तीच्या वेळेस होणार्‍या रक्तस्रावाचेही प्रमाण अधिक असते. अशावेळेस अत्यंत मरगळ व थकवा येतो.
 
 
रज:प्रवृत्तीची अन्य एक विकृती म्हणजे ‘अत्यार्तव.’ (अतिप्रमाणात रज:प्रवृत्तीच्या वेळेस रक्तस्राव होणे म्हणजे ‘अत्यार्तव’ होय.) यात अधिक प्रमाणात रक्तस्राव असतो किंवा अधिक काळ रज:प्रवृत्ती होत असते. यामध्ये गरजेपेक्षा अधिक रक्तस्राव झाल्याने ‘अ‍ॅनिमिया’ होण्याची शक्यता खूप वाढते. थकवा येणे. गळून जाणे. धाप लागणे. पांढरे घटक पडणे. वारंवार चक्कर येणे. घसा कोरडा पडणे इ. लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. ‘अत्यार्तवा’त ही वरील सर्व लक्षणे नेहमीच असतील, असे नाही. व्यक्तीसापेक्ष लक्षणे व त्यांची तीव्रता कमी-अधिक होत राहते. रज:प्रवृत्ती/मासिकस्रावाची अजून एक विकृती म्हणजे ‘अनार्तव.’ याचा अर्थ - ‘आर्तव’/रज:प्रवृत्ती सुरू न होणे. वर सांगितल्याप्रमाणे हल्ली ’चशपरीलहश’ ११-१३ वयोगटातील मुलींमध्ये सुरू होताना दिसतो, पण १७-१८ वय वर्षे झाल्यावरही आर्तव रज:प्रवृत्ती सुरू झाली नाही, तर त्या अवस्थेला ‘अनार्तव’ म्हटले जाते. अनियमित ‘आर्तव’ प्रवृत्ती हीदेखील मासिकचक्राशी संबंधित अजून एक विकृती आहे. यामध्ये मासिकचक्र ठराविक कालावधीचे राहत नाही. एखादा महिना, २० दिवसांनी रज:प्रवृत्ती सुरू होते, तर दुसर्‍या महिन्यात ४० दिवस होऊन गेले, तरी रज:प्रवृत्ती सुरू होत नाही. प्रत्येक चक्र वेगवेगळ्या दिवसांच्या अंतराने येते. काही वेळेस रक्तस्राव अधिक असतो, तर कधी ओटीपोट खूप दुखते. चीडचीड अशा वेळेस खूप होते, अंग जड होणे, आळस येणे, काही करू नये, असे वाटणे इ. लक्षणे सुरू होतात.
 
 
 
‘कष्टार्तवा’मध्ये मुख्यत्वे करुन वाताची दृष्टी असते. बहुतांशी वेळेस अशा मुलींमध्ये मलबद्धतेचीही तक्रार असते. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली याची चिकित्सा जर केली, तर उत्तम प्रकारे रज:प्रवृत्ती सुरळीत व नियमित होते. ‘अत्यार्तवा’मध्ये मुख्यत्वे करून पित्ताची दृष्टी असते. त्या-त्या दोषांनुसार चिकित्सा बदलते, तसेच व्यक्तीसापेक्ष औषधांची मात्राही कमी-जास्त करावी लागते. पित्त वाढू नये म्हणून तिखट-मीठ खाण्यातून कमी ठेवावे. अतिचीडचीड, उद्विग्नता टाळावी. रात्री जागरण करु नये. शेंगदाणे, मिरची, चिंच, दही, तूरडाळ, लोणची, पापड इत्यादींचा अत्याधिक वापर टाळावा. ‘कष्टार्तवा’मध्ये पोटातून दूध, तूप, एरंडेल सुरु करावे. नियमित व्यायाम करावा. अतिचिंता करणे सोडून द्यावे. ज्यांच्यामध्ये अनार्तव व अनियमितार्तवाची तक्रार असते, अशांमध्ये शिळंपाकं खाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासाअंती लक्षात आलेले आहे. दिवसा झोपणे, आळस अधिक प्रमाणात असणे, शरीराची अत्यल्प हालचाल व व्यायामाचा अभाव हे प्रामुख्याने आढळून येतो. रज:प्रवृत्ती नियमित असणे, स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. हल्ली ’चशपरीलहश’ लवकर येत असल्याचे जाणवत आहे. याची काही महत्त्वाची कारणे खालील प्रमाणे - बाल्यावस्था हरपणे हल्ली खूप लवकर होते. मोठ्यांसारखी वेशभूषा करणे, अतिनटणे, मोठ्यांच्या सीरियल बघणे, खाण्यातून लहान वयातच अतितिखट चमचमीत खाण्याची सुरुवात करणे, लोणचं, चाट, चायनीज, चीज इ.पदार्थांचा अतिवापर करणे. व्यायाम, मैदानी खेळांचा अभाव, लहानपणीच मोठ्यांशी स्पर्धा करणे इ. अनेक कारणं आहेत.
 
 
 
काही कारणे आपण वेळीच बदलू शकतो, थोपवू शकतो. बालपण लवकर हरपल्याने तारुण्यावस्था साहजिकच आपसूकपणे लवकर येते. शरीर, मन, बुद्धी तेवढी परिपक्व नसते. त्यांची निगा घेणे, संवर्धन करणे गरजेचे आहे. काही माहिती त्या-त्या वयातच मिळणे योग्य असते. अनियमित रज:प्रवृत्ती व अन्य अनियमित (कष्टार्तव, अनार्तव, अत्यार्तव) आर्तव प्रवृत्ती काही वेळेस लाक्षणिक असते. दोन-चार महिन्यांनी त्याची तीव्रता, प्रखरता आपसूक कमी होऊ लागते. पण, सहा महिन्यांच्या वर ही लक्षणे तशीच राहिली किंवा वाढली, तर मग चिकित्सा सुरू करायला लागते. काही वेळेस अन्य कारणांमुळे रज:प्रवृत्तीवर परिणाम होतो. वर सांगितलेल्या विकृती या प्राथमिक स्वरुपाच्या आहेत. त्यात अन्य कुठली विकृती कारणीभूत नसते. त्या-त्या दोषांच्या दृष्टीनुसार चिकित्सा केली की, यश प्राप्त होते. पण, काही ठराविक अन्य आजार (हायपर थायरॉईड, हायपोथायरॉईड, पीसीओडी) असल्यास त्याचा परिणाम रज:स्रावाच्या मासिकचक्रावर पडतो/होतो. ही विकृती ‘सेकंडरी’ प्रकारची आहे. यामध्ये जे प्रमुख कारण आहे त्याची आधी चिकित्सा करावी लागते. ते नियंत्रित झाले की, रज:स्रावाचे नियमित चक्रसुद्धा सुरळीत सुरु होते. ‘सेकंडरी कॉझेस’ने जेव्हा रज:प्रवृत्तीच्या नियमिततेमध्ये अडथळा येतो, तेव्हा बहुतांशी वेळेस आधी रज:प्रवृत्ती नियमित व सुरळीत असते. हळूहळू त्यात बिघाड होऊ लागतो. अंत:स्रावी ग्रंथींचा व त्यांच्या स्रोतांचा रज:प्रवृत्तीवर लगेच परिणाम होतो. या ग्रंथी म्हणजेच Endocrine gland होय. यांच्या स्रावाचा व मानसभावाचा खूप घनिष्ट संबंध असतो. मानसिक अस्वस्थता (राग-चीडचीड, चंचलता, भीती, दु:ख, उद्विग्नता असुया, ताण, इर्षा इ.) असल्यास व अधिक काळ टिकल्यास त्याचाही परिणाम रज:स्रावच्या मासिकचर्येवर पडतो/होतो. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सगळ्या अवस्था यशस्वीरित्या चिकित्सल्या जाऊ शकतात. त्याला मात्र आहार, व्यायाम व मानसिक स्थैर्याची जोड देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वैद्य कीर्ती देव

लेखिका बी.ए.एम.एस (मुंबई), बी.ए. (योगशास्त्र) असून आयुर्वेदिक चिकित्सा आणि पंचकर्म क्षेत्रात मुंबई व ठाणे येथे २० वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ वैद्यकीय अनुभव आहे. त्वचाविकार आणि आयुर्वेदिक चिकित्सा, आयुर्वेद आणि सौंदर्यशास्त्र तसेच अरोमा थेरेपीचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. आयुर्वेद सिद्धांत, चिकित्सा, औषधे आदी विषयांमध्ये विपुल लेखन करीत असून आयुर्वेद व्यासपीठाद्वारे वैद्यकीय चर्चासत्रे व परिसंवादातही सक्रीय सहभाग.