लखनऊ : “उत्तर प्रदेशमधील नागरिकांनी यंदाच्या वर्षी दोन वेळा धुळवड साजरी करण्याची तयारी केली आहे. यंदा १८ मार्च रोजी होणार्या धुलिवंदनाआधी भाजपच्या बंपर विजयाची धुळवड १० मार्च रोजी साजरी केली जाणार आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. २० फेब्रुवारी रोजी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील हरदोई येथील जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, “ज्यांनी उत्तरप्रदेशात तुष्टीकरणाचे राजकारण करत सण रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांना येथील जनता १० मार्च रोजी उत्तर देईल. होळीसारख्या पवित्र सणाचा हरदोईच्या पवित्र भूमीशी असलेला संबंध आपल्या सर्वांना माहित आहे. मात्र, असे असतानाही येथील नागरिकांना त्यांचे हक्काचे सण साजरे करण्यापासून रोखत काही जणांनी तुष्टीकरणाचे राजकारण केले. अशा राजकारण्यांना जनताच प्रत्युत्तर देईल. मला माहित आहे की, यावेळी उत्तर प्रदेशच्या लोकांनी दोनदा धुळवड खेळण्याची तयारी केली आहे. भाजपच्या बंपर विजयाची पहिली धुळवड १० मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. पण, १० मार्च रोजी धुळवड साजरी करायची असेल, तर त्याची तयारी आतापासूनच मतदान केंद्रावर, घरोघरी जाऊन करावी लागणार आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत पंतप्रधानांचा हल्लाबोल
आपल्या भाषणात अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. अहमदाबादमध्ये दोन वेळा बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. सपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या सायकलमध्ये बॉम्ब ठेवत रुग्णालयात स्फोट घडवण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली होती, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. २०१३ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा या लोकांनी शमीम अहमद नावाच्या आरोपीवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला.